छायाचित्रांची  १८ पुस्तके आणि अमेरिकेच्या तीन राज्यांतील एकंदर पाच विद्यापीठांकडून मानद ‘डॉक्टरेट’ पदव्या, अशी ख्याती मागे ठेवून मारी एलेन मार्क यांनी २५ मे रोजी जगाचा निरोप घेतला. त्या छायाचित्रकार होत्याच, पण म्हणजे केवळ छायाचित्रणाचे तंत्र आणि कला यांवर त्यांची हुकमत होती, एवढेच मात्र नव्हे. अशा हुकमतीइतकेच जगाबद्दलचे त्यांचे कुतूहल आणि माणसाबद्दलची त्यांची आस्था हे गुण त्यांना छायाचित्रणकलेच्या इतिहासात एक स्थान देणारे ठरले.
पेनसिल्व्हानिया विद्यापीठातून रंगकला व छायाचित्रण शाखेतील पदवी (१९६२) मिळवल्यानंतर त्यांनी वृत्तछायाचित्रण शाखेतच पदव्युत्तर पदवी (१९६४) मिळवली होती. तोवर हेन्री कार्तिए ब्रेसाँसारखा महायुद्ध आणि भारताची फाळणी टिपलेले छायाचित्रकार किंवा अमेरिकेतील महामंदीचे परिणाम टिपणारी डोरोथी लँग यांचे काम हे ‘वृत्तछायाचित्रणा’ला नवी उंची देणारे ठरले होते. १९६०च्या दशकातील बंडखोरीचे वारे अमेरिकेतही घुमत होते; पण या बंडखोरीचा काही जणांनी चुकीचा अर्थ घेतल्याने तरुणांत व्यसनाधीनता वाढली होती. हे सारे मेरी यांना जाणवू लागले. व्यसनी तरुण-तरुणींची आणि रुग्णाईत वृद्ध, कुष्ठरोगी अशांची त्यांनी टिपलेली छायाचित्रे ही काहीशी धक्कादायक, पण मानवी स्थिती सांगणारी- छायाचित्रातून मानवी भावविश्वापर्यंत पोहोचणारी ठरली. कलावंत म्हणून आपले निराळेपण हेच आहे, अशी खूणगाठही एरवी ‘व्होग’, ‘लाइफ’ आदी मासिकांसाठी छायाचित्रणाची कंत्राटे घेणाऱ्या मेरी यांनी बांधली. भारतात त्या अनेकदा आल्या. जेनिफर व शशी कपूर या अभिनय क्षेत्रातील दाम्पत्यासह, अनेक मित्र त्यांना येथे मिळाले. यातून ‘फॉकलंड रोड’, ‘कलकत्ता’ अशी पुस्तके तयार झाली. दैन्य- दारिद्रय़ ‘दाखवण्याचा बाजार’ मांडल्याचा आरोप त्यांच्यावर निर्बुद्धपणेच करायचा तर ती पुस्तके पाहण्याची गरज नाही; परंतु ही पुस्तके पाहिल्यावर समाजाची स्थिती मेरी एलेन किती आत्मीयतेने मांडत याचे प्रत्यंतर येते. ‘इंडियन सर्कस’हे पुस्तकही, सर्कशीमागचे जग दाखवताना बिचारेपणाची नव्हे तर मेहनतीवर विश्वास असलेल्या संघर्षशील आयुष्यांची गाथा गाणारे आहे. या पुस्तकातील विदूषक पाहताना प्रेक्षक गलबलतो. मेरी मात्र या प्रतिक्रियांचे काय करायचे, याचाही विचार करीत आणि त्यातून नवे विषय शोधीत. पण एका व्यसनाधीन (ड्रग अ‍ॅडिक्ट) तरुणीचे आयुष्य मात्र त्यांनी वारंवार टिपले. तिच्यावर  चित्रपटकार (दिग्दर्शक) पती मार्टिन बेल यांच्यासह चित्रपटही काढला. हे काम समाजशास्त्रीय म्हणावे, असे आहे.