गोव्यामध्ये पुढच्या आठवडय़ात होत असलेला चौथा अखिल भारतीय हिंदू-संघटना मेळावा, गेल्या काही दिवसांपासून येत असलेली अयोध्येतील राम मंदिर उभारणीसंबंधीची विविध उजव्या नेत्यांची वक्तव्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘यूएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून संघाच्या नेत्यांना दिलेल्या कानपिचक्या या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी परवा मुस्लिमांच्या शिष्टमंडळाला दिलेल्या दिलाशाकडे पाहणे गरजेचे आहे. ‘रात्री बारा वाजता दरवाजा ठोठावा, आपण तुमच्या मदतीसाठी धावून येऊ,’ असे त्यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. त्यांचे हे म्हणणे आजच्या वातावरणात अत्यंत अर्थवाही असे आहे. भाजपचे सरकार आल्यानंतरच्या एका वर्षांत देशामध्ये जे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे आपणास असुरक्षित वाटू लागले असल्याची भावना ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या धडाडीच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली असून ती प्रातिनिधिक मानता येईल, अशी परिस्थिती आहे. प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून आलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जाता जाता याच भावनेची दखल घेत मोदी सरकारला युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या होत्या. तेव्हा कोणी कितीही नाकारले तरी या गोष्टींचा परिणाम आपल्या विकास कार्यक्रमांवर झाल्याशिवाय राहणार नाही हे मोदी यांच्यासारख्या नेत्याच्या लक्षात आले नसते तर नवलच. येथील मतदारांनी आपल्या हाती जी भरभरून कमळे ठेवली ती काही धर्मातर आणि ‘लव्ह जिहाद’ आणि राम मंदिर या कार्यक्रमांमुळे नव्हे, तर केवळ आणि केवळ आर्थिकदृष्टय़ा प्रत्येकाला चांगले दिवस येतील या आश्वासनामुळे, याची जाणीवही मोदींना आहेच. अर्थात आज मोदी ज्या कट्टर उजव्यांना कानपिचक्या देत आहेत त्याच मंडळींबरोबर त्यांची निवडणुकीपूर्वी ऊठबस होती हे विसरले जावे अशी मोदीप्रेमींची अपेक्षा असली, तरी येथील असंख्य नागरिकांना ते विसरणे शक्य नाही. मोदी यांची अडचण झाली आहे ती त्यामुळेच. ‘अत्र न परत्र’ अशी काहीशी भूमिका त्यांना राजकीय व्यावहारिक शहाणपणातून घ्यावी लागत असून, मंगळवारची त्यांची मुस्लिम शिष्टमंडळाशी भेट ही त्या व्यवहारवादी राजकारणाचाच भाग आहे. ही भेट पूर्वनियोजित असल्याने, तिच्या तोंडावरच मोदी यांनी संघाला कानपिचक्या दिल्या हासुद्धा याच राजकारणाचा भाग. मोदी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इल्यासी यांच्यासह ३० जणांचा समावेश होता. त्यांच्याशी बोलताना मोदी यांनी पुन्हा एकदा आपला बहुसंख्याक कार्ड, अल्पसंख्याक कार्ड या गोष्टींवर विश्वास नसून आपले कार्ड भारत हे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर ‘विरोधक करीत असलेली टीका ऐकून माझ्याबद्दल मत बनविण्याऐवजी माझी कामगिरी पाहा,’ असेही मोदी यांनी त्यांना ऐकविले. मोदींचे हे म्हणणे रास्तच आहे. प्रश्न फक्त या बाबतीतील कामगिरीचा आहे. ती जाहिरातींपुरतीच दिसते. एरवी अल्पसंख्याकांविरुद्ध मोदींचे मंत्रीसुद्धा द्वेषमूलक विधाने करीत असतात आणि मोदी त्यावर गप्प असतात. अशा गोष्टींमुळे अल्पसंख्याक अस्वस्थ आहेत. अल्पसंख्याकांनी आधी काय केले, आधीच्या सत्ताधाऱ्यांनी काय केले हे प्रश्न आता गैरलागू ठरतील. इथे प्रश्न थेट मोदींविषयीच्या ‘परसेप्शन’चा, लोकदृष्टिकोनाचा, जनभावनेचा आहे. म्हणूनच मोदी यांची वक्तव्ये ज्या पाश्र्वभूमीतून येतात ती महत्त्वाची ठरते.