पंजाबमध्ये कापूस पिकवणाऱ्या पट्टय़ाला कर्करोगाचा विळखा पडला आहे..समृद्धीचे व्यवस्थापन चुकले की कर्करोगाचे पीक  कोठेही येऊ शकते.. कधी जमिनीतून तर कधी हवेतून..
फिरोजपूर ते मानसा हा पंजाबमधील कापूस पट्टा. पंजाबचा शेतकरी मेहनती. मेहनतीला रासायनिक खतांची जोड मिळाली आणि कापसाचे एकरी पीक वधारले. शेतकरी मातब्बर झाला. मात्र त्यापाठोपाठ उत्पन्न वाढविण्यासाठी जमिनीवर अत्याचार सुरू झाले. खतांचा व पाण्याचा अतोनात वापर होत गेला. माणसाला पोसण्याच्या कैफात जमिनीच्या पोषणाकडे दुर्लक्ष झाले. खतांमुळे जमीन आणि नंतर पाणी दूषित होत होते. पाणी कमी पडू लागल्यावर जमिनीत खोलवर विंधण विहिरी खणल्या गेल्या. हे पाणी क्षारयुक्त होते. ते पिकाबरोबर पिण्यासाठीही वापरले गेले. पाण्यात युरेनियमचे प्रमाण वाढले असल्याचा धोका गुरू नानक विश्वविद्यालयाने ९५साली लक्षात आणून दिला, पण श्रीमंतीच्या मस्तीत त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. प्रदूषित पाण्याची लोकांना फिकीर नव्हती, कारण पीक चांगले येत होते. सरकार प्रथम झोपले होते. त्याला जागे केले दक्षिण आफ्रिकेतील संशोधकाने. फरिदकोट जिल्ह्य़ातील मुलांच्या केसांमध्ये युरेनियमचे प्रमाण अतोनात वाढल्याचे केरीन स्मिथने दाखवून दिले. मात्र तोपर्यंत कर्करोगाने पंजाबच्या या पट्टय़ाला विळखा घातलेला होता.
शेतीतून सुबत्ता मिळविणाऱ्या पंजाबच्या या पट्टय़ात आज कर्करोगाचे पीक फोफावले आहे. प्रत्येक गावात, गावांतील प्रत्येक घरात कर्करोगांच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. दर दिवशी १८जण कॅन्सरने मरण पावतात. सरकारने घरोघर जाऊन पाहणी करण्यास सुरुवात केली तेव्हा धक्कादायक आकडे हाती आले. मग यंत्रणा कामाला लागली. रुग्णांना मदत दिली जात आहे, रुग्णालये अद्ययावत करण्यात येत आहेत. आरोग्य चाचण्यांवर भर दिला जात आहे. लोकांमध्ये कर्करोगाबद्दल जनजागृती सुरू करण्यात आली आहे.
तथापि ही जनजागृती उपचारांबद्दल आहे, कर्करोगाच्या कारणांबद्दल नाही. शेती करण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे कर्करोग पसरत आहे याकडे कुणी लक्ष देत नाही. पंजाबमध्ये आधुनिक शेती आली, पण त्याबरोबर आधुनिकता आली नाही. यामुळेच कर्करोगाची कारणे शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धत वापरली जात नाही. उलट आजही अतार्किक पद्धतीने लोक विचार करतात आणि कॅन्सरचा संबंध इराकमधील युद्धाशी जोडतात. तेथील युद्धातील धूळ पंजाबपर्यंत आली म्हणून मुलांच्या केसांमध्ये युरेनियम सापडते,असल्या अंधश्रद्धा तेथे रुजल्या आहेत. रासायनिक खतांचा अतोनात वापर करताना आपण पिकाबरोबर कर्करोगही रुजविला हे शेतकऱ्यांना कोणी सांगत नाही आणि कोणी सांगितले तरी ऐकण्याच्या मन:स्थितीत शेतकरी नाही.
याचे कारण त्याचे जीवन फक्त कापसाच्या शेतीवर आहे. पीक कमी आले तर पैसे कमी. जगणेच इतके महाग झाले आहे की पीक थोडेही कमी येऊन चालतच नाही. पीक वाढविण्याचा हमखास मार्ग म्हणजे आणखी खते जमिनीत ओतणे आणि आधी जमीन व त्यामागोमाग पाणी क्षारयुक्त करणे. ते पाणी शेतीबरोबर पिण्यासाठीही वापरणे आणि कर्करोगाला शरीरात वस्ती करू देणे. तो शरीरात फोफावला तरी आर्थिक चणचण भागविण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करीत काम करणे आणि शेवटी अकाली मृत होणे. पंजाबच्या तीन जिल्ह्य़ांमध्ये हे रहाटगाडे सुरू आहे.
विकासाच्या वृक्षाला विषाचीच फळे यावीत का, सांपत्तिक स्थिती सुधारण्याचा मार्ग, वैभवाचा राजरस्ता होण्याऐवजी काटय़ांचे कुरण व्हावे अशीच नियती असते का? शुद्ध पर्यावरणवादी असेच म्हणतील व महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्यकडे चला म्हणतील. तो मार्ग शाश्वताचा असला तरी त्यावर चालण्याची हिंमत बहुसंख्यांमध्ये नसते. तो बहुसंख्यांचे पोट भरत नाही. बहुसंख्यांना समृद्धीची फळे द्यायची तर आधुनिकतेची कास धरावीच लागते. विज्ञानाचा अवलंब करावा लागतो. मात्र त्यासाठी सर्वागीण आधुनिकता किंवा वैज्ञानिकता लागते. पंजाबमध्ये तसे झाले नाही.
पंजाबमध्ये हरित क्रांती झाली असली तरी खतांचे व्यवस्थापन व आर्थिक व्यवस्थापन या दोन पूरक मुद्दय़ांकडे दुर्लक्ष झाले. खतांची मर्यादा ठरविली गेली नाही आणि पिकांतून मिळालेल्या पैशाची योग्य गुंतवणूक झाली नाही. अशी गुंतवणूक नसल्यामुळे एखाद्या वर्षी सुट्टी घेऊन जमिनीला स्वत:चे पोषण करू देण्याचा अवकाश शेतकरी देऊ शकला नाही. जमीन थकली तरी रासायनिक उत्तेजकांचा वापर सुरू राहिला. कापसाशिवाय अन्य पिकांतूनही पैसा मिळू शकतो हेही शेतकऱ्यांना कुणी सांगितले नाही. अजूनही तसे सांगितले जात नाही. पिकात बदल करीत शेती करावी हे शास्त्र आपल्याकडे विकसित झालेले नाही. तेव्हा पर्यावरणाचा प्रश्न हा मूलत: व्यवस्थापनाचा आहे. जगण्याच्या व्यवस्थापनाचा आहे. विवेकशक्ती वापरण्याचा आहे. इथे सरकारची भूमिका महत्त्वाची ठरते. विकासाला गळफास लागेल असे पर्यावरणाचे कायदे असू नयेत, परंतु असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याचबरोबर अप्रिय होण्याचा धोका पत्करून एकांगी विकासाच्या दुष्परिणामांबद्दल जनतेला सतत जागरूक केले पाहिजे. यासाठी प्रसंगी कठोर उपाय अवलंबिण्यात आले तरी हरकत नसावी. याचे कारण निसर्गसंपत्तीचे शुद्धीकरण ही केवळ अतोनात खर्चीक बाब नसते तर कित्येक वेळा ती अपरिवर्तनीय असते. चीनला याचा अनुभव आला आहे. समृद्धीच्या शर्यतीत नेटाने उतरल्यावर तेथील नद्या प्रदूषित होत गेल्या. आज चीनकडे भरपूर पैसा आहे. तंत्रज्ञान आहे. पण पैसा व तंत्रज्ञान ओतूनही नद्या स्वच्छ होत नाहीत असे आढळले. म्हणजे तेथे समृद्धीचे पाणी खारटच असणार आहे. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून आधी पैसा मिळवू आणि मग त्या पैशातून पुन्हा पर्यावरण सुधारू हा मार्ग निसर्गाला मंजूर नाही.
हा धडा लक्षात घेऊन आपण आजपासूनच काळजी घेतली पाहिजे. प्रश्न फक्त पंजाबपुरता मर्यादित नाही. हवेच्या प्रदूषणाने भारतातील कित्येक शहरांना वेढले आहे. शहरांतील दर पाचवा मृत्यू हा प्रदूषित हवेमुळे होत असतो. २०००साली प्रदूषणाला बळी पडलेल्यांची संख्या एक लाख होती. २०१०मध्ये ती साडेसहा लाखांवर गेली. मुंबई, पुणेच नव्हे तर विकासाची बेटे म्हणून पुढे येत असलेल्या लहान शहरांमधील हवा अत्यंत धोकादायक झाली. चिपळूणजवळील लोटे असो वा बदलापूर, उल्हासनगर. ही विकासाची नव्हे तर प्रदूषणाची बेटे झाली आहेत. अनेक जीवघेण्या आजारांना आमंत्रण इतकाच प्रदूषणाचा परिणाम नसतो. जे आजारी नसतात त्यांनाही प्रदूषण दमविते. जगण्याची उमेद घालविते. आयुष्य रडतखडत ओढण्याची वेळ आणते.
हे प्रदूषण रोखणे आपल्या हातात आहे. प्रदूषणाला जबाबदार आहे ती गरज नसतानाही गाडय़ा उडविण्याची आपली जीवनशैली, र्निबध झुगारणारी उत्पादनशैली आणि अशास्त्रीय बांधकाम. म्हणजे प्रश्न पुन्हा व्यवस्थापनाचाच आला. समृद्धीचे व्यवस्थापन. ते चुकले की कर्करोगाचे पीक पंजाबमध्येच नव्हे, कोठेही येऊ शकते.. कधी जमिनीतून तर कधी हवेतून.