मुंबईतील भर गर्दीच्या वांद्रे टर्मिनस येथे कुणा ‘अज्ञात व्यक्ती’ने केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्यामुळे  महिनाभर रुग्णालयात झुंज देणाऱ्या प्रीती राठी हिला अखेर मृत्यूने गाठले आणि पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर आणखी एक ठपका बसला. या हल्ल्यातील एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दिल्लीतील सामूहिक बलात्कार घटनेनंतर महिलांवरील अत्याचाराबाबत देशभर फक्त चर्चा होत राहिली आहे. या चर्चाचा प्रत्यक्ष गुन्हेगारांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे गेल्या काही महिन्यांत अनुभवाला येत आहे. आरोपी सापडत नाही, याचे कारण पोलिसांकडे माहिती मिळविणारी कार्यक्षम यंत्रणा नाही. जी गुप्तहेर यंत्रणा आहे, ती वळचणीला असल्याने पोलिसांना कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यानंतरच जाग येते. नयना पुजारीच्या प्रकरणातही नेमके हेच घडले. साडेतीन वर्षांपूर्वी पुण्यातील नयना पुजारी या युवतीवर बलात्कार करून तिचे तुकडे करणाऱ्या आरोपीला २० महिन्यांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. प्रीती राठीवर अ‍ॅसिडचा हल्ला कशासाठी झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत एकशेतीसहून अधिक जणांना अटक केली, परंतु प्रत्यक्ष हल्लेखोर अद्यापही बेपत्ता आहे. महिला घराबाहेर पडू लागल्या, स्वत:च्या पायावर उभ्या राहू लागल्या आणि स्वत:चे निर्णय घेऊ लागल्या, तरीही त्यांच्यावर हल्ले करण्याचे पुरुषांचे धैर्य कमी झालेले नाही. स्त्री अबला असते, असे म्हणून तिच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यापेक्षा समाजात असे का घडते, याच्या मुळाशी जाणे अधिक आवश्यक आहे. देशातील सामाजिक सुरक्षितता किती धोक्यात आहे, याचे हे एक ढळढळीत उदाहरण आहे. गेल्या शंभर वर्षांत झालेल्या प्रगतीचा निर्देशांक काढायचा ठरवले, तर सामाजिक क्षेत्रात तो अधोगतीकडे जात असल्याचे दिसेल. केवळ शिक्षेने सारे प्रश्न सुटणार नाहीत, असा समाजशास्त्रीय दृष्टिकोन चर्चेसाठी मान्य केला तरी, महिलांवरील अत्याचार अधिक हिंसक होतात, याचे कारण तसे करणाऱ्यांना कडक शिक्षा होत नाही, हे उघड आहे. शहरे किंवा ग्रामीण भागांत ही सामाजिक सुरक्षितता वाढीस लागण्यासाठी आवश्यक असणारी पोलीस यंत्रणा इतकी तकलादू झालेली आहे की, केवळ अधिकाऱ्यांची हुजरेगिरी आणि गैरमार्गाने पैसे मिळवण्याची स्पर्धा यामध्ये ती मश्गूल झालेली आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात गेलात, तरी तेथे पोलीस दिसणे ही दुर्मीळ बाब झालेली आहे. पोलिसांची संख्या वाढवायला हवी असे प्रत्येक वेळी म्हटले जाते, परंतु पोलीस हे अनुत्पादक असतात, अशा बावळट कल्पनेमुळे त्यासाठी खर्च करण्यास सरकार तयार होत नाही. समाजात कायद्याचा धाक असणे आवश्यक असते. तो धाक बऱ्याच प्रमाणात गुन्हेगारीला आळा घालू शकतो. प्रीती राठीवर अ‍ॅसिड फेकणाऱ्या किंवा नयना पुजारीचा खून करून तिचे तुकडे करणाऱ्या गुन्हेगाराला आपण लपून राहू शकतो, याचा आत्मविश्वास वाटतो, कारण येथील सुरक्षा व्यवस्था अतिशय अकार्यक्षम आहे. सामाजिक सुरक्षेचा प्रश्न प्रत्येक वेळी ऐरणीवर येतो, तेव्हा त्याबद्दल फक्त चर्चा होते. आता कृती करण्याची वेळ आली आहे.