एखाद्या गोरगरीब अल्पभूधारकाला जमीन कसताना त्रास असेल, कोणी त्याचे घर बळकावत असेल, तर त्याला विश्वासाने कुठे हा अन्याय सांगून दाद मागावी अशी सोयच नाही. तो जर गावातल्या या तारणहाराकडे गेला, तर त्याला न्याय मिळतोच, पण आधीच्या होणाऱ्या अन्यायापेक्षा जास्त चटके देणारा..
कोणत्याही गावाच्या फाटय़ावर नजर टाका. सगळीकडे फलकच दिसतात. त्यावर झळकणाऱ्या छब्यांची नाना रूपे. कोणी चालताना दिसतोय, तर कोणी दोन हातांची घडी करून उभा आणि चेहऱ्यावर ओळखीचे हसू, तर कुठे कानाला लावलेला मोबाइल. कुठे अभिवादनासाठी उंचावलेला हात, तर कुठे दोन्हीही हात जोडून समोर दिसणारी आणि अंगावर येणारी विनयशीलता. कोणाच्या मनगटात रुळणारे सोन्याचे ब्रेसलेट, कोणाच्या गळ्यात रुळणारी व शर्टाच्या एका गुंडीबाहेर आलेली सोन्याची साखळी.. प्रत्येकाची विशेषणंही वेगवेगळी. कोणी ‘कार्यसम्राट’, कोणी ‘मुलुखमदानी तोफ’, तर कोणी ‘बुलंद आवाज’. या सगळ्यांकडे पाहताना ‘बघतोस काय रागानं, काम केलंय वाघानं’ असा शब्दांतून प्रकटणारा धाकही असतो. त्यातच ‘बघतोस काय, मुजरा कर’ यांसारख्या दटावणीने भानावर येतो आपण. आजचे खेडय़ापाडय़ातले राजकारण कोणत्या वळणावर येऊन उभे आहे त्याचा फाटय़ावर दिसणारा हा ‘एक्स-रे’च जणू.
निवडणुकांची धामधूम सुरू झाली की, हे राजकारण तापू लागते. पाहता पाहता सगळा माहोल बदलू लागतो. कार्यकत्रे झटू लागतात. पूर्वी साधने नव्हती, आता वातानुकूलित गाडय़ा आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रचारात फिरताना घाम येत नाही. ‘डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, पायाला ‘भिंगरी’अशी जुन्या कार्यकर्त्यांची ओळख सांगितली जायची. आताही बर्फ लागतोच, पण तो डोक्यावर ठेवण्यासाठी नाही आणि आम जनतेसाठी तर ‘भिंगरी’ असल्याशिवाय प्रचाराला गती आलीय असे वाटतच नाही. काळ बदललाय. राजकारणाचा पोतही बदललाय. आता निवडणुकीच्या आधी पंचक्रोशीत अखंड हरिनाम सप्ताहांचे आयोजन दणक्यात केले जाते. गावोगाव काही ना काही वाटप सुरू असते. गावातल्या तरुणांसाठी क्रिकेटचे साहित्य, भजनकर्त्यांच्या पथकासाठी टाळ, मृदंग, वीणा असे सगळे ‘जो जे वांच्छिल तो ते लाहो’प्रमाणे सुरू. कुठे मंदिरापुढे सभामंडप, तर कुठे मंदिराचाच जीर्णोद्धार अशी उभारणी चाललेली असते. आचारसंहितेच्या काळात पंगती उठवताना एखाद्या देवाला अभिषेक केला जातो किंवा कोणाची तरी जयंती-पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने पंचक्रोशीतले लोक गोळा होतात. हे दिवस फार महत्त्वाचे, त्यामुळे डोळ्यांत तेल घालूनच राखण केली जाते आपआपल्या पिकांची.
..कधीकाळी निवडणुकीच्या प्रचारासाठी येणारा उमेदवार गावातल्या एखाद्या मातब्बर असामीकडे यायचा. त्याच्याकडेच बठक व्हायची आणि मग सगळ्या प्रचाराच्या दोऱ्या याच ठिकाणाहून हलायच्या. अख्खा गाव एखाद्याच्याच मुठीत. साधारणपणे ‘गाय वासरू, नका विसरू’ असा तो काळ. जसजसे शिक्षणाचे प्रमाण वाढले तसतसा बदल घडत गेला. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी मग गावोगाव ‘वाघ’ आला तो एक वादळ घेऊनच. ज्यांना कोणतीच घराणेशाहीची पाश्र्वभूमी नाही अशा फाटक्या माणसांनी गावोगावचे सरंजामी वाडे लोळवले ते याच वादळात. ‘अबबबब.. ही काय गोष्ट, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा देताना गळ्यावरच्या शिरा स्पष्ट ताणलेल्या दिसायच्या एवढा जोर होता या घोषणेत. उपाशीपोटीही गावातल्या मातब्बराला आव्हान देण्याची धमक होती. पाहता-पाहता भाकरी फिरली. कालपरवापर्यंत रस्त्यावर दिसणारी माणसे कुठल्या कुठे जाऊन पोहोचली. कालांतराने ज्यांना डोक्यावर घेतले त्यांचेच ओझे जाणवायला लागले, मग तरुण पोरांना, आपण पायताण झिजेपर्यंत मरमर करतोय, पण आपले आयुष्य बदलायचे नावच नाही हे कळायला बराच काळ जावा लागला. ज्यांनी गावोगाव भाकरी फिरवल्या त्यांना त्या भाकरीचा घास मिळालाच नाही. त्यातूनच मग ‘करा कष्ट, खा उष्टं अन् म्हणा जय महाराष्ट्र’ असा उपहास तोंडून यायला लागला. ‘त्यांच्या’ जागी ‘हे’ आले, पण आपण जिथल्या तिथेच. शिवाय ‘त्यांच्यात’ आणि ‘यांच्यात’ फरक काहीच नाही. यांना लपवावे आणि त्यांना काढावे असेही रस्त्यावरच्या माणसाला वाटू लागले. राजकारणाची कूस बदलली, पण सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या डोक्यावरचे फाटके छप्पर तसेच राहिले आणि हे केवळ एखाददुसऱ्या गावाचेच नाही, तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावातले चित्र.
..आधी गोरगरिबांचे, दुबळ्यांचे राजकारण करणारी माणसे होती. ज्यांच्यामागे कोणीच नाही अशांना त्यांचा आधार वाटायचा. स्वत:बद्दलच्या अन्यायालाही जिथे वाचा फुटत नव्हती आणि आपल्यावरचा अन्याय माणसे निमूटपणे सहन करायची, तिथे समूहाचा शब्द बोलणारी अशी माणसे होती. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात फरक नसायचा. जिथे अन्याय दिसेल तिथे ही माणसे तुटून पडायची. मग अशा माणसांसाठी गोरगरिबांना आपला जीव ओवाळून टाकावासा वाटायचा. घटना दहा-बारा वर्षांपूर्वीची असावी. उभी हयात चळवळीत घालविणाऱ्या आणि संघर्षांसाठी कधीही सजग असणाऱ्या एका वयोवृद्ध लोकप्रतिनिधीच्या नागरी सत्कारासाठी एका बठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यातला हा प्रसंग आहे. मराठवाडय़ातल्या कळमनुरी या डोंगराळ तालुक्याचे चार वेळा प्रतिनिधित्व करणारे आमदार विठ्ठलराव नाईक यांचा सत्कार करावा असे त्या भागातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना, जनतेला वाटले. एक स्मरणिका प्रसिद्ध करावी, कार्यकर्त्यांनी गोळा केलेल्या जाहिरातींमधून जी रक्कम जमा होईल ती या नागरी सत्कारात थलीच्या रूपाने द्यावी अशी कल्पना होती. कोण कोण कशी कशी मदत करणार याची चर्चा चालू असताना हातातल्या बोचक्यासह एक रापलेल्या चेहऱ्याची बाई उठली. म्हणाली, ‘ज्यो माणूस आपल्यासाठी इतकं झटतो त्याच्यासाठी मी जास्ती तर कायी करू शकत न्हायी, पण इथं येतानी गळ्यातले चार सोन्याचे मनी मोडलेत. या समारंभासाठी मपला तितकाच वाटा,’ असे बोलून बोचक्यातले दोन हजार रुपये त्या बाईने बठकीत काढून दिले. अर्थात या कार्यक्रमाच्या निमित्ताने गोळा झालेली रक्कमही नाईकांनी स्वीकारली नाही, ती सगळी सामाजिक कामांना दिली. आता कितीही हुडकले तरी सत्तेच्या परिघात अशी माणसे दिसतील काय?
..मग आता गावावर सत्ता कोणाची? तशी ती कोणत्याच पक्षाची नाही. गावोगाव गेल्या दहा वर्षांत उदयाला आलेले कंत्राटदार, नदीच्या पात्रात हैदोस घालणारे वाळूमाफिया, गोरगरिबांच्या धान्याला काळा बाजार दाखविणारे साठेबाज (िपड फुकाचे गिळू नका, गोरगरिबांना छळू नका असे शिधापत्रिकेवर असले तरी काही फरक पडत नाही.) अशांचा धाक असतो गावावर. या सगळ्यांना आपले धंदे पार पाडण्यासाठी एखाद्या राजकीय नेत्याचा आश्रय लागतो. आपल्या नेत्याच्या निवडणुकीत त्यांनी जिवाचे रान करायचे, आपआपला गाव सांभाळायचा, मग नेते त्यांना पाच वष्रे सांभाळणार, असा हा अलिखित करार. एखाद्या गोरगरीब अल्पभूधारकाला जमीन कसताना त्रास असेल, कोणी त्याचे घर बळकावत असेल, तर त्याला विश्वासाने कुठे हा अन्याय सांगून दाद मागावी अशी सोयच नाही. तो जर गावातल्या या तारणहाराकडे गेला, तर त्याला न्याय मिळतोच, पण आधीच्या होणाऱ्या अन्यायापेक्षा जास्त चटके देणारा. त्याला सांगितले जाते, ‘तू जमीनच सोडून दे, मी बघतो पुढच्याचे काय करायचे ते. त्याला मीच दाखवतो. तुझ्यासारख्या माणसाला त्रास देतो म्हणजे काय? वा रे वा! गरिबाने राहायचेच नाही की काय.’ अशा माणसाला निमूटपणे हाती जे पडेल त्यावर समाधान मानून आपल्याच मालमत्तेवरचा हक्क सोडावा लागतो. अशा माणसांना धीर देण्यासाठी काका, दादा, तात्या, आबा, भय्या, अण्णा असा नवा गोतावळा सध्या गावोगावी उदयाला आला आहे. दुबळा माणूस पाहिला की यांचे काळीज तीळतीळ तुटते. पान्हाच फुटतो त्यांना पुतना मावशीसारखा! हा पान्हा कधी आटेल?