झटपट धनप्राप्तीचे किंवा मोठय़ा बचतीचे, किफायतीचे आमिष दाखवणाऱ्या सरसकट सर्वच योजनांना ‘पाँझी स्कीम’ म्हटले जाते.. पण या पाँझीच्या अगोदरही असे वित्तीय गुन्हे झाले होते. तरीही पाँझीचेच नाव या गुन्ह्यच्या प्रकाराला मिळाले, कारण त्याने केलेली फसवणूक आंतरराष्ट्रीय होती!  त्या धूर्तपणाचा इतिहास सांगतानाच माणसे फसतात कशी, याचाही वेध घेणाऱ्या मालिकेचा हा पहिला टप्पा..
एखाद्या व्यवसायातील किंवा विषयातील कार्यपद्धती किंवा शैली कुण्या व्यक्तीच्या नावाने ओळखली जाणे हा विशेष सन्मान मानला जातो. उदाहरणार्थ न्यूटनचे नियम, शिरोडकरी ‘टाका’. तसा बहुमान गुन्हेगारी जगातसुद्धा असतो! वित्तीय गुन्हेगारीमध्ये फसवणूक करण्याच्या एका धाटणीला ‘पाँझी स्कीम’ ऊर्फ पाँझी मायाजाल म्हणून ओळखले जाते. या धाटणीला आपल्या नावाचे बिरूद देणारा ‘कर्ता’ पुरुष ‘पाँझी’ मूळचा इटालियन होता. ही रीत पाँझीने प्रथम वापरली असे मुळीच नाही.  इंग्रजीत ‘पीटरच्या लुबाडणुकीतून पॉलची भर’ अशी म्हण आहे, तिचे मूळ एका व्युत्पत्तीनुसार सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस घडलेल्या घटनेमध्ये आहे. लंडनमधल्या सेंट पॉलच्या चर्चची डागडुजी करायची होती. ती फार खर्चिक होती. तो खर्च भागवण्यासाठी वेस्ट मिन्स्टरमधल्या सेंट पीटर चर्चची जमीन विकली गेली. ‘अ’कडून पैसे प्यायचे. फेडायची वेळ आली की ‘ब’ कडून उधार घेऊन ते फेडायचे. ‘ब’ची  उधारी चुकवायला ‘क’ कडून घ्यायचे. असे हे चक्र अव्याहत चालू ठेवायचे. यामध्ये व्याजाचा हिशोब धरला तर प्रत्येक टप्प्याला उधारीने उभी करायची रक्कम फुगत फुगत जाते. व्याजाचा दर मोठा मजबूत आणि आकर्षक असेल तर भुरळणाऱ्यांची संख्या चांगलीच बळावू शकते. पॉन्झीच्या अगोदर बॉस्टनमध्ये एका अविवाहित अशिक्षित स्त्रीने ही किमया १८८० मध्येच करून दाखविली होती. या कल्पक स्त्रीचे नाव होते ‘सारा होव्ह’.
तिने बॉस्टन पोस्ट या दैनिकात जाहिरात दिली. ‘‘फक्त ‘एकटय़ा’ तरुण किंवा वृद्ध स्त्रियांसाठी बँक ठेवीची रक्कम २०० डॉलर किमान आणि १००० डॉलर कमाल. दरमहा व्याजदर दर शेकडा ८ डॉलर. रविवार सोडून कुठल्याही दिवशी ठेव परत मिळेल. स्वत:च्या मालकीचे घर असणाऱ्यांकडून ठेव पत्करली जाणार नाही.’’
सदर श्रीमती सारा होव्ह यांचा छोटे मोठे गुन्हे करून फसवण्याचा दीर्घ अनुभव होता. त्याकरिता त्यांना अनेकदा शिक्षा झाली होती. एवढेच नव्हे तर वेडगळ अर्धवटांसाठी असलेल्या उपचार केंद्रातही त्यांना दाखल केले गेले होते. पण ही जाहिरात छापून येताच त्यांच्याकडे ‘एकटय़ा’ स्त्रियांची रीघ सुरू झाली. हजारच्या आसपास एकटय़ा स्त्रियांनी पाच लाख डॉलर सारा होव्ह यांच्या हवाली केले. त्यातली काही रक्कम सारा होव्हनी स्वत:च्या चैनीखातर आणि जमीनजुमला बाळगण्याच्या हौसेखातर वापरली. उरलेली रक्कम वेळ ओढवेल तशी परतफेडीसाठी वापरत राहिल्या. अर्थातच चढय़ा व्याजाच्या बोजापोटी देणी फुगत होती. या फसवाफसवीची कुणकुण फुटली आणि ठेवी परत घेणाऱ्यांची रीघ लागू लागली. सारा होव्हना पोबारा करायचा होता. पण त्याआधीच त्यांना अटक झाली.
याच धाटणीचा प्रयोग पुन्हा एकदा अवतरला तो ‘पाँझी’च्या कर्तृत्वाने. पाँझी मूळचा इटालियन. इटली, पोर्तुगीज देशात नातवाला मातुल आणि पित्रृल आजोबांची नावे देण्याची प्रथा असते. त्यानुसार त्याचे अधिकृत दफ्तरी नाव कालरे पिएत्रो जिओव्हा गुगलिएल्मो तेबाल्दो पाँझी. जन्म ३ मार्च १८८२. वडील मूळ मध्यमवर्गीय हॉटेल चालविणाऱ्या घराण्यातले. पण पोस्टात नोकरी करायचे. आई तुलनेने उच्चभ्रू सरंजामी घराण्यातील म्हणजे ‘दॉन’ किंवा ‘दॉन्ना’ किताब मिरविणाऱ्यांपैकी. (उदा. दॉन जिओव्हानी दॉन्ना तेरेसा इ.) एकुलता एक म्हणून त्याच्या भवितव्याबद्दल नाना स्वप्ने आणि कल्पना आईच्या डोळ्यासमोर तरळायच्या. वडील अचानक निवर्तले. मुलाचे शिक्षण उत्तम व्हावे म्हणून पॉन्झीला रोम विद्यापीठात दाखल केले. पण पाँझीला रोममधल्या हौसे मौज करणाऱ्या श्रीमंताच्या जगण्याची इतकी भुरळ पडली की पार ‘हातचा गेला’! त्याचे उधळे गुण आणि कर्जबाजारी अवस्था पाहून एका जवळच्या मामाने त्याला अमेरिकेत जाऊन नशीब कमावण्याचा कानमंत्र दिला. त्या काळी ही जणू रुढीच झाली होती. जो तो समजायचा की अमेरिका म्हणजे रस्तोरस्ती सोन्याची पखरण! फक्त वाकून ते सोने उचलण्याची तसदी घ्यायची. त्या झपाटय़ात श्रीयुत पाँझी ३ नोव्हें. १९०३ रोजी व्हानकुअर नामक बोट धरून बॉस्टनला निघाले.
झपाटय़ाने संपत्ती मिळाली पाहिजे, अचानक मोठा खजिना गवसला पाहिजे या ध्यासाने पाँझी झपाटला होता. बॉस्टनमध्ये अनेक इटालियन होते; पण कष्टकरी वर्गातले. पाँझीने हरतऱ्हेच्या नोकऱ्या धरल्या. केल्या त्यापैकी  एक बँकेत कारकुनीची होती. या बँकेत झालेल्या अफरातफरीत तो अडकला आणि थोडी तुरुंगाची हवा खाऊन आला. तिथे त्याचा काही अट्टल गुन्हेगारांशी संपर्क आला. त्यांच्याशी मैत्री झाली. पण पाँझीला वित्तसंस्था, बँका या विश्वाचे मोठे स्वप्नील आकर्षण वाटत राहायचे.  एक उद्योग सुरू करण्यासाठी बँकेकडे त्याने अर्ज केले. त्यांनी त्याचा अर्ज फेटाळला आणि बाहेरचा रस्ता दाखविला. एकीकडे छोटे मोठे गुन्हे करणारे बेडर आणि दुसरीकडे नोकरी किंवा ‘एजंटगिरीमधून संपर्कात येणारे मालदार बँकर याच्यात दोलायमान रमणारा पाँझी एखादी संधी चालून येते का याची सतत चाचपणी करत होता आणि एक दिवस हा घबाडदिन उगवला. पाँझीच्या डोक्यात आपण आयात- निर्मात व्यापाराचे दलाल म्हणून काम करावे असा निश्चय पक्क होता. पण त्याला मध्यस्थ म्हणून पत्करणार कोण? त्याने अनेकांना छापील पत्रे लिहून संपर्क करण्याची मोहीम आखली. पण तसे करण्यासाठी देखील पुरेसा खर्च येणार होता. म्हणजे त्याला मिळणारे कमिशन पण या छपाई खर्चाच्या पासंगाला पुरणार नव्हते. मोठय़ा विदेश व्यापाराच्या नियतकालिकात जाहिरात करावी तरी तीच पंचाईत. मग त्याने स्वत:च एक ट्रेड गाईड म्हणजे व्यापारसूची छापून त्यातूनच पैसा कमवू असा महत्त्वाकांक्षी आराखडा योजायला सुरुवात केली.
निरनिराळ्या देशातल्या व्यापार मंडळींशी संपर्क करायचा, त्याची माहिती मिळवायची, अन्य कुणाला ती पाठवून व्यापार मिळतो का याची चाचपणी करायची उभयपक्षी गरजा जुळल्या तर ‘मध्यस्थ’ वर्गणी आहेच! पण त्यासाठी करावी लागणारी पत्रव्यवहार, छपाई आणि टपालखर्च देखील दांडगा होता. देशादेशामधली व्यापारी देवाणघेवाण तर बळावत होती. पण त्यातल्या अडचणी व खर्चाची  पातळी चिंतनीय भासू लागल्या होत्या. समजा अमेरिकेतला वकिलाला पॅरिसमधल्या कंपनीच्या दिवाणजीकडून एखादा महत्त्वाचा दस्तऐवज मागवून घ्यायचा आहे. तर तो आपल्या पत्रासोबत स्वत:च्या पत्ता घातलेले पाकिट आणि लागणारे ‘पोस्त’ तिकिटे लावून पाठवू शकतो. पण फ्रान्समधला दिवाणजी जेव्हा ते पाकीट दस्तऐवज घालून पाठवेल तेव्हा त्याला वकिलाने पाठविलेले अमेरिकन पोस्ट स्टँप वापरून काय उपयोग? त्याला फ्रेंच पोस्टाने छापलेले फ्रेंच पोस्ट स्टँप लावायला हवेत. ते खरेदी करायचा खर्च पडणार फ्रेंच दिवाणाच्या खिशातून. मग तो का तसदी घेणार? मग तो दस्तऐवज पाठवायचा खर्च या मुद्यांवर हा व्यवहार अडखळणार. समजा अमेरिकन वकिलाने अमेरिकन स्टँपऐवजी अमेरिकन डॉलर नोटा पाठविल्या तर? तरी फ्रेंच दिवाणला त्या डॉलरचा उपयोग नाही. ते विकून त्याचे फ्रेंच फ्रांक करण्याचे सव्यापसव्य करावेच लागणार!
या अडचणींवर मात करण्यासाठी ६६ देशांनी शोधलेल्या उपायातून पाँझीने आपला झटपट-मार्ग शोधला. तो कसा, हे पुढील भागात

The report of the National Human Rights Commission condemned the violation of human rights under the message
संदेशखालीत मानवाधिकारांचे उल्लंघन! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालात ठपका
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
neeraj chpra
ऑलिम्पिक ध्वजवाहकाच्या नियुक्तीवरून वाद कायम! शरथ कमलऐवजी नीरज चोप्राकडे जबाबदारी देण्याकडे वाढता कल
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान