इस्लामी अतिरेक्यांचे पाकिस्तानात ज्यांच्यावर हल्ले होतात, ते सारेच जण इस्लामविरोधी, पाकिस्तानविरोधी आणि देशद्रोही किंवा गद्दार आहेत यावर आपोआप शिक्कामोर्तब होत असते. पाकिस्तानातील पत्रकार हामिद मीर यांच्यावर शनिवारी संध्याकाळी झालेल्या हल्ल्यात त्यांच्या शरीरात घुसलेल्या तीनही गोळ्या जिकिरीच्या शस्त्रक्रियेमुळे आता निघाल्या असल्या, तरी हामिद हे जणू स्वत:च्या देशापेक्षा उपखंडातील शांततेचा विचार अधिक करणारे होते, असे उदात्तीकरण आता होत राहील, असे दिसते. पाकिस्तानने मुंबईत घडवून आणलेल्या २६/११ हल्ल्याच्या वेळी शांततेतच पाकिस्तानचेही भले आहे हे हामिद मीर यांनी जिओ टीव्हीवर वारंवार सांगितले. जोधपुरातील कुठल्याशा संस्थेने दिलेला ‘भारतीय’ पुरस्कार हामिद यांनी स्वीकारला किंवा आपल्यावर ‘भारताचा हस्तक’ असल्याचा आरोप कसा नेहमीच होत असतो हे हामिद यांनीच कसे सांगितले एवढय़ाचीच आठवण अशा वेळी दिली जाईल. याच हामिद यांनी, पाकिस्तानातील ‘ईश्वरनिंदा विरोधी कायदय़ा’चे समर्थन केले होते आणि हा कायदा आहे म्हणून शांतता राहील, असे म्हटले होते, हे अशा वेळी नेमके विसरले जाते. गुलाबी किंवा काळाकुट्ट अशा दोनच रंगांत माणसांची चित्रे रंगवण्याची खोड भारतीय उपखंडाला आहे आणि या उपखंडाचाच भाग असलेला पाकिस्तानही त्याला अपवाद नाही, हेच हामिद यांच्यावरील हल्ल्यामुळे पुन्हा दिसून आले. अशा एकारलेल्या भूमिकांना नाकारून मिश्र रंगसंगतीचे वास्तव मांडत राहणे, हे पत्रकारांचे काम. तालिबानप्रमुख ओसामा बिन लादेनची मुलाखत हामिद यांनी घेतली, तेव्हा ते काम त्यांनी केले होते.  हामिद यांनी ज्या ईश्वरनिंदाविरोधी कायद्याचे समर्थन केले, त्याच कायद्यावर टीका केली म्हणून पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे प्रांतपाल सलमान तासिर यांना जिवास मुकावे लागले, तेव्हा सलमान तासिर यांच्या मृत्यूचे दु:ख कुणालाही कसे नाही, याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करणाऱ्यांत हामिद हेच अग्रेसर होते. पत्रकारितेची नायकत्ववादी शैली एरवीही अहंमन्य असणाऱ्यांना शोभते, त्यापैकी हामिद हे एक. त्यामुळे तासिर यांच्या हत्येचा शोकही नाकारणाऱ्यांना हामिद यांनी सुनावलेले खडे बोल किंवा थेट ओसामापर्यंत त्यांनी मारलेली मुसंडी हे कर्तृत्वदेखील त्या शैलीमुळेच दिसले असे मानावे काय, हा वादाचा मुद्दा आहे. एक मात्र खरे की, प्रागतिक विचारांचे भारतमित्र पाकिस्तानी पत्रकार रझा रूमी यांच्यावर तीनच आठवडय़ांपूर्वी- २८ मार्च रोजी झालेल्या हल्ल्याला मिळाली, त्यापेक्षा किती तरी अधिक प्रसिद्धी हामिद यांच्यावरील हल्ल्याला मिळते आहे. हामिद यांच्यावरील हल्ला आयएसआयनेच घडवून आणला, असे  हामिद यांचे बंधू  आमिर यांचे म्हणणे. हामिद शनिवारी कराचीत असणार आहेत, ही माहिती आयएसआय या गुप्तहेर संघटनेखेरीज कुणाकडे असूच शकत नव्हती, हा आमिर यांच्या या आरोपाचा आधार आहे. स्वत: हामिद यांनीही आपण आयएसआयचे लक्ष्य ठरू, अशी भीती पाकिस्तानी पत्रकारांच्या संघटनेकडे व्यक्त केली होती, अशी माहिती आता दिली जात असल्यामुळे या आरोपाचे गांभीर्य वाढले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडून ‘गंभीर दखल’, तर लष्कराकडून इन्कार, असे या आरोपाचे पडसादही उमटत आहेत. परंतु राजकीय नेते आणि प्रशासन यांच्यापेक्षा आयएसआय आणि तालिबान यांचेच प्राबल्य असलेल्या देशात या आरोपांनाही अन्य अधिकाधिक प्रसिद्धी मिळवण्याखेरीज काही किंमत राहील का? लष्कराच्या एका कुटिल संघटनेने स्वत:च्याच देशातील अतिप्रसिद्ध पत्रकाराविरुद्ध कारस्थान रचले, हा आरोप धसाला लागेल का? तसे होणार नाही आणि हल्ल्यानंतर हामिद यांचा नायकत्ववाद अधिकच उचल घेईल, अशी शंका आहे.