‘दारिद्रय़ पाचवीला पुजलेले’ आणि ‘चंद्रमौळीचे सुख’ यासारख्या किती तरी गोष्टी आपल्या शब्दसृष्टीत असतात.. दुखाचा डोंगर आणि दारिद्रय़ाची भुयारे आपल्याला गोठवून टाकतात पण आपल्याला तिथेच थबकता येत नाही. त्यातून सुटण्याचा मार्ग दिसला पाहिजे. त्यापुढे जगण्यातला प्रकाश आहे, उद्याच्या दिवसाचा उजेड आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवासही मानवी जगण्याला अर्थवत्ता प्राप्त करून देत असतो.
कोण कुठे जन्माला येईल हे आपल्या हाती थोडेच असते. पुढचा सगळाच काळ मात्र आपल्या हाती असतो. आपल्याला प्राप्त झालेला अवकाश आणि आपण वावरतो तो काळ यांची सांगड घालून आपण नवे काही साकारू शकतो. कुठेही जन्म झाला, कितीही खातेऱ्यात झाला तरी जगणे सजवता येऊ शकते. आपल्याकडे काही शब्दांना कमालीचे सौंदर्य बहाल करण्यात आले आहे आणि त्यात कृतक अशी कारागिरीही आहे. अशा शब्दांवरचा आपला लळा काही कमी होत नाही. अशा शब्दांवर आपला जीव कायमचा जडलेला आहे. ‘दारिद्रय़ पाचवीला पुजलेले’ आणि ‘चंद्रमौळीचे सुख’ यांसारख्या किती तरी गोष्टी आपल्या शब्दसृष्टीत असतात.
गरिबी, दारिद्रय़ या गोष्टी वेगवेगळ्या शब्दांच्या कोंदणात बसवण्यापेक्षा त्यातून सुटण्याची जी धडपड आहे ती जास्त उत्कट असते. आयुष्य घडविणाऱ्या, चांगल्या पहाटेची आस बाळगणाऱ्या असंख्य लोकांना ज्या ऊर्मीने झपाटलेले असते ती ऊर्मीही तितकीच महत्त्वाची. झोपडीला चंद्रमौळी म्हटल्याने तिचा महाल होत नाही. दारिद्रय़ कायम पाचवीलाच पुजलेले असते असे नाही, कधी तरी त्याची तेरवीही घातली गेली पाहिजे. गरिबी हे आभूषण नाही, तो अलंकार नाही. आपल्याभोवती असलेली बेडी कोणतीही असेल, ती आपल्या मार्गक्रमणाला अडसर ठरतेच. म्हणून ही बेडी निखळावी, गळ्याभोवती जे काही पाश असतील ते दूर व्हावेत, श्वास मोकळा व्हावा, आकाश खुले व्हावे या दिशेने होणारा कोणाचाही प्रवास असो, तो जितका आश्वासक तितकाच स्वागतशीलही असायला हवा.
बेडी कुठली का असेना, ती गळून पडली पाहिजे. भलेही ती कुणाला आभूषण वाटत असेल. सोन्याची सरी गळ्यात बांधून मुक्तीचा मार्ग नाही चोखाळता येत. तसेच सोन्याची सुरी असली म्हणजे ती कोणी काळजातही खुपसून घेत नाही. िपजरा मग तो कोणताही असो, अगदी सोन्याचा असला तरीही त्यातला जिवाचा कोंडमारा हा असह्य़च असणार. आपल्याभोवतीचा िपजरा भेदण्याचा, पायातली बेडी तोडण्याचा कोणताही प्रयत्न हा म्हणूनच एक आश्वासक अशी नोंद असतो.
एकीकडे पराकोटीचे दारिद्रय़ आणि गरिबी दिसत असताना त्यावर मात करण्याचे काही प्रयोग दिसतात. अखंड अशी धडपड या माणसांची चाललेली असते. आपल्या वाटय़ाला जे काही आलेले असते ते प्राक्तन म्हणून स्वीकारण्याऐवजी आपण ठरवू तो आपला काळ आणि आपण चालू ती आपली दिशा, या भावनेतून अशा माणसांचा प्रवास चाललेला असतो. अशा वेळी जगण्याची जबर आकांक्षा आणि परिस्थितीवर पाय रोवून उभे राहण्याची जिद्द ही स्तिमित करायला लावणारी असते. यातून बरेच काही शिकण्यासारखे असते. अनुकूल अशी परिस्थिती लाभूनही ज्यांना काहीच करता येत नाही अशा नाकर्त्यांनाही बराच काही धडा त्यातून मिळू शकतो. कुठे बरड माळरानावर नंदनवन फुलवल्याच्या कहाण्या येतात, कुठे दोघा नवराबायकोनेच शेतात विहिरी खोदल्याची बातमी येते, कुठे एखाद्या कोरडवाहू शेतकऱ्याने आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन यशस्वी केल्याची घटना समोर येते, कुठे झोपडपट्टीत राहून विजेचा दिवाही घरात नसताना रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून काळोखावर तेजाची लेणी खोदणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यांची जिद्दही लाखमोलाची असते, कुठे कोणतेच व्यावसायिक शिक्षण नसताना एखाद्या शेतकऱ्याने आपले उत्पादन कुठल्या तरी दूरच्या बाजारात पोहोचविलेले असते, कुठे असंख्य अडथळ्यांवर मात करीत काही बेरोजगार तरुणांनी एखादा उद्योग सुरू केलेला असतो, कुठे एखाद्या निराधार-परित्यक्ता महिलेने आपल्या मुलाबाळांना जिद्दीने घडवलेले असते, कुठे ‘कमवा आणि शिका’ योजनेत काम करून एखाद्या युवकाने आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरविलेली असतात. असे काही काही आपल्याभोवती घडत असते. जिथे पायाखालची जमीनही आपली नाही आणि आपल्या डोक्यावरच्या आभाळाच्या तुकडय़ाचा भरवसा नाही, हक्काचे छप्पर तर नाहीच नाही, अशा ठिकाणाहून येणारी माणसेही आयुष्यात असे काही झोकदार वळण घेतात, की आपण शहारतो. त्यांचा खाचखळग्यांचा प्रवास अचानक नव्या सफाईदार वळणावर येऊन ठेपतो. घनघोर अशा काळोखानंतर कधी तरी प्रकाश घेऊन येणारी पहाट अवतरते. हा फक्त एखादा सुविचार नाही, तर ते समाजातल्या अनेक ठिकाणी घडणारे सुखद असे चित्र आहे.
त्यामुळे दारिद्रय़ आणि गरिबीच्या कहाण्या कितीही करुण असल्या, काळजाला पाझर फोडणाऱ्या असल्या तरीही आश्वासक अशा जगण्याबद्दलच्या आणि परिस्थितीला आपल्या कर्तबगार हातांनी वाकवणाऱ्या कहाण्या त्यापेक्षाही महत्त्वाच्या असतात, कारण त्यात जगण्यातले शाश्वत सत्य असते. जीवनासाठी लागणारा चिवट असा संघर्ष असतो.
विपन्नावस्था हे वास्तव आहे आणि ते कुठल्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करतेच, पण ही विपन्नावस्था आपण त्यागली पाहिजे, असा विचार आणि चांगल्या जगण्याविषयीचा लसलसता कोंभ ज्याच्या मनात असतो त्याच्या जिद्दीला सलाम केला पाहिजे आणि त्याचे जगणेही नोंद करून ठेवले पाहिजे. जे कोणी खितपत असतील, परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत असतील, कोंडवाडय़ातून बाहेर येण्यासाठी धडका देत असतील, सूर्यही दिसणार नाही अशा जंगलातून आपली हरिणवाट शोधत असतील, त्यांच्याबद्दल म्हणूनच आपल्या मनात काही तरी जागा असली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याभोवती असलेली बेडी, मग ती कुठली का असेना, आपण त्यागली पाहिजे याची विलक्षण तडफ संबंधितांकडे असली पाहिजे आणि आपल्या स्वातंत्र्याची असीम अशी तहानही असलीच पाहिजे.
भोवतालातूनच आपण आपले माणूसपण शोधले पाहिजे आणि आपल्या जगण्याचे स्रोतही मिळवले पाहिजेत. दु:खाचा डोंगर आणि दारिद्रय़ाची भुयारे आपल्याला गोठवून टाकतात, पण आपल्याला तिथेच थबकता येत नाही. त्यातून सुटण्याचा मार्ग दिसला पाहिजे. त्यापुढे जगण्यातला प्रकाश आहे, उद्याच्या दिवसाचा उजेड आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवासही मानवी जगण्याला अर्थवत्ता प्राप्त करून देत असतो. अशा किती तरी आशादायी कहाण्या आपल्याला गावोगाव सापडू शकतात. हे सगळे ठिपके आहेत, या ठिपक्यांची रांगोळी जर आपण करून पाहिली तर नक्कीच एका चांगल्या पहाटेची अपेक्षा आपण करू शकतो.

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…