मोदी सरकारची वर्षपूर्ती म्हणजे देशातीलच नव्हे, तर परदेशातीलही अनेकांसाठी राष्ट्रीय सणासारखीच. तेव्हा ती मोठय़ा मनोभावे व उत्साहाने साजरी होणार यात अणुमात्र शंका नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने मंत्रीस्तरीय जाहिरातबाजीच्या उत्साहावर पाणी ओतले नसते तर विविध मंत्रीवर्यानी वृत्तपत्रांतून, वृत्तवाहिन्यांवरून आपापल्या खात्यांमार्फत स्व-छबीयुक्त जाहिरातींच्या पताका फडकवल्या असत्या. परंतु न्यायालयाने त्याला मनाई केल्याने अनेकांचा हिरमोड झाला. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीयुक्त संदेशपत्राच्या छबीदार जाहिरातींनी त्याची सुयोग्य भरपाई केली. त्या दिवशी अनेक वृत्तपत्रांतून मोदी यांच्या कारकीर्दीचे पवाडे गाणारी सरकारी वाणाची डीजीपीआर जाहिरात प्रसिद्ध झाली. ही जाहिरात, तिची मांडणी, रंगसंगती हा खरे तर धक्कादायकच प्रकार होता. परंतु त्या दिवशी भाजपच्या प्रचार व प्रसिद्धिप्रमुखांनाच नव्हे, तर वृत्तपत्रांच्या कोटय़वधी वाचकांनाही खरा धक्का दिला तो वेगळ्याच- तामिळनाडूच्या ताज्या व ‘निर्दोष’ मुख्यमंत्री पुराच्ची तलइवी जे जयललिता अम्मा यांच्या जाहिरातीने. वर म्हटल्याप्रमाणे २७ मे हा दिवस नमोसत्ताकाच्या वर्षपूर्तीचा. त्या दिवशी पेपरांच्या मुखपृष्ठी माध्यमांच्या व डीजीपीआरच्या अलिखित कायद्यानुसार मोदींचीच जाहिरात असायला हवी होती. परंतु तेथे दिसल्या त्या आपर्ण अम्मा. अलीकडेच जयललिताम्मांना हवा तस्सा न्याय मिळाला. त्यांची सगळी शिक्षा, त्यांच्यावरची सगळी किटाळे न्यायालयाने दूर केली आणि त्या दोषमुक्त असल्याची द्वाही दिली. त्यामुळे निसर्गाच्या नियमांनुसार जे जयललिता या त्यांच्या पक्षाच्या सरकारच्या मुख्यमंत्री बनणे क्रमप्राप्तच होते. ते गेल्या २३ तारखेला घडले. आता ही घटनाही काही साधीसुधी नव्हती. खरे तर ऐतिहासिकच. परंतु जे जयललिता जे काही करतात ते सारेच ऐतिहासिक असल्याने प्रत्येक गोष्टीचे महत्त्व लोकांना सांगणे भागच पडते. लोकहिताच्या या भावनेतूनच अम्माजींच्या सरकारने आपला ‘चार वर्षांचा देदीप्यमान कारभार’ मांडणारी आणि ‘अम्माजींची सत्ता अनंतकाळ’ चालणार असल्याची ग्वाही देणारी जाहिरात प्रसिद्ध केली. एका नव्हे, तर देशभरातील अनेक महत्त्वाच्या आणि प्रामुख्याने आंग्ल भाषेतील दैनिकांतून ही जाहिरात झळकली. पहिले पान, दुसरे पान आणि अखेरची दोन पाने असा त्या जाहिरातीचा पसारा होता. आता यातही तसे काही विशेष नाही. मूर्तिपूजा आणि विभूतिपूजा संपूर्ण भारतातच प्रचलित आहे. विशेष होता तो जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी अम्माजींनी शोधलेला नेमका वर्षपूर्तीचा मुहूर्त. या जाहिरातींसाठी तामिळनाडू सरकारला किती तरी कोटी रुपये नक्कीच मोजावे लागले असतील. अर्थात अम्माजींपुढे या लक्ष्मीची काय पर्वा! या एवढय़ाशा किती तरी कोटी रुपयांतून छोटीशी ‘पीआर कसरत’ करून अम्माजींनी मोदी यांच्या प्रसिद्धीतंत्रावर जी मात केली तिचे मोल काय किरकोळ कवडय़ांत मोजणार? तरी बरे हल्ली अम्माजी मोदीजींवर खूश आहेत. तामिळनाडू हे राज्य राज्यसभेतील बहुमतासाठी उपयुक्त असल्याने मोदीजीही अम्माजींवर मेहेरबान आहेत. एकमेकां खूश करू अवघे धरू सुपंथ असे काहीसे वचन तामिळ-गुजराती भाषांत आहे की नाही माहीत नाही. परंतु ते नक्कीच असावे. त्यामुळेच अम्माजींनी महत्त्वाच्या आंग्ल दैनिकांतूनच ही जाहिरात दिली. हे वचन नसते, तर मोदींच्या वर्षपूर्तीची काही खैर नव्हती. अम्माजींच्या जाहिराती अगदी ‘पिंपळगाव टाइम्स’ आणि ‘वडगाव हेरल्ड’मध्येसुद्धा दिसल्या असत्या. अखेर ‘प्रसिद्धीची कसरत’ आणि त्यातून वाढीव व्यक्तिस्तोम हेच राजकारण मानण्याच्या खेळातील अम्माजी या जुन्या खेळाडू आहेत, अगदी मो
दींपेक्षाही जुन्या.