‘फाशीनंतरचा फास’ हा अग्रलेख अत्यंत अचूक आणि कुणाचीही भीड न ठेवता लिहिलेला, परंतु तरीही अत्यंत संयमित असा आहे. त्याबद्दल अभिनंदन! परंतु या पत्राचे प्रयोजन आपले अभिनंदन करणे एवढय़ापुरतेच मर्यादित नाही. अफझल गुरूच्या फाशीमुळे ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री संतप्त झाल्याबद्दल पहिल्याच पानावरची बातमी ही अत्यंत उद्वेगजनक आहे. हा उद्वेग- सकारण आहे. हिंदू-मुस्लीम या पारंपरिक संघर्षांचे बीज यात नाही.
मला सवय आहे, मी काम करतो तिथल्या भोवतालची शक्य त्या सर्व बाजूंनी माहिती करून घेतो. खोऱ्यात बर्फ धुमसायला सुरुवात होण्याआधीपासून मी काश्मीरला जात आलो आहे. शेवटचा गेलो तो १९९०च्या एप्रिल-मेचा सुमार होता. खोरे हळूहळू शांत होत होते. १९८९ पर्यंत तर धुमश्चक्रीच चालू होती. १९९०मध्ये काश्मीर खोऱ्याचं दुख, संताप, दैन्य मला जवळून पाहाता, अनुभवता, ऐकता आलं. १९७५ मधलं खोरं आणि १५ वर्षांत बदललेलं खोरं हा एक भयानक आणि दुखद अनुभव होता. मूलत: काश्मिरी मुसलमान हा अत्यंत शांतताप्रिय, आदरातिथ्यशील असा होता हा माझा अनुभव आहे. हवे तर त्याला माझा समज म्हणा, परंतु हा माणूस आज आहे तसा का झाला याची कारणं शोधण्यासाठी मी स्वत तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना भेटलो आहे. तसेच सामान्य काश्मिरी माणसालाही भेटलो आहे. बीएसएफच्या (सीमा सुरक्षा दल) तत्कालीन कमांडिंग ऑथॉरिटीजनाही भेटलो आहे. त्यांच्यापैकी जे प्रमुख होते (नाव आता आठवत नाही) ते पुढील काही महिन्यांतच आपल्या कुटुंबासह अतिरेक्यांच्या हल्ल्यात स्वर्गवासी झाले. बीएसएफच्या कॉपरेरल्सनाही भेटलो. दाल सरोवरात डझनावारी बोटी असलेल्या श्रीमंतांना भेटलो आणि रस्त्यावर टोप्या विकणाऱ्या गरीब विक्रेत्यालाही भेटलो, एवढेच नव्हे शरण आलेल्या अतिरेक्यांनाही भेटलो. काम करत होतो त्या ठिकाणच्या आसपासच्या काश्मिरी मुसलमान कुटुंबांना भेटलो, या सर्वाशी बोलून माहिती मिळाली ती भयानक आहे. शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या पिलावळीबद्दल काश्मिरी जनतेला पराकोटीची चीड आहे, सर्व काश्मिरींचे म्हणणे एकच आहे- या खानदानाने काश्मिरी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. सत्यानाश केला आहे. त्यांचे ते म्हणणे असत्य असते तर फारुख अब्दुल्लांना २४ तास कमांडोंच्या गराडय़ात वावरण्याची गरज पडली नसती. मी माझ्या डोळय़ांनी पाहिले की, जून १९९० मध्ये तिथून निघताना दिवसाढवळय़ा, सकाळी नऊ-दहा वाजता श्रीनगरच्या रस्त्यांवर काश्मिरी तरुण शेख अब्दुल्ला यांचे पुतळे/पोस्टर यांची जाळपोळ करत होता.
तत्कालीन पंतप्रधानांनी पोखरणाला यशस्वी अणुस्फोट केल्यानंतर आणि भारत अण्वस्त्रसज्ज झाल्याची बातमी सांगितल्यानंतर श्रीनगरात फारुख अब्दुल्लांचे भाषण ऐकण्यास सातव्या-आठव्या रांगेत मी हजर होतो. तेव्हा श्रोत्यांच्या प्रतिसाद टाळ्यांचा कडकडाट होता, परंतु तो बातमीसाठी होता. मुख्यमंत्र्यांसाठी नव्हे.
विस्ताराने लिहिण्याचे कारण हे की, ओमर म्हणतात तसे काश्मिरी तरुणांना प्रश्न केवळ आज नव्याने पडलेले नाहीत. ते १९७०च्या दशकापासूनचे प्रश्न आहेत. काश्मिरी तरुण अस्वस्थ आहे. त्याच्या मागण्या अत्यंत मूलभूत आहेत. सुखसोयींची मागणी तो करत नाही, तो नोकरी मागतो आहे, रोजीरोटी मागतो आहे, अत्यावश्यक नागरी सुविधा मागतो आहे, दिवसचे दिवस उपाशी असणाऱ्या शरणागत अतिरेक्यांना मी स्वत आमच्या युनिटमध्ये जेवायला घातले होते त्यावेळचे त्यांच्या डोळ्यांतले अश्रू मी विसरलेलो नाही. ‘साब, काश्मीरके पुराने मंदिरों को खडा करते वक्त हमने अपने इन हाथोंसे पत्थर लगाये है, पहले हमारा राजा हरीसिंग था, अब जो कुछ भी हो रहा है, उसका हम क्या बयान करे। और आग्र करे भी तो कौन सुनता है?’ हे माझ्याच वयाच्या एका कुटुंबवत्सल काश्मिरी मुसलमानाचे शब्द आहेत. तेव्हा ओमरना कुणीतरी सांगायला हवे की, काश्मिरी तरुणाला जे प्रश्न पडत आहेत ते अफजलच्या फाशीमुळे नाही तर अब्दुल्लांच्या खानदानामुळे पडत आहेत आणि आज नाही तर गेली साडेतीन-चार दशके पडत आहे. हे अतिरेकी इंजिनीअर, डॉक्टर, सीए या पातळीवरचे आहेत पण त्यांना हातात बंदुका घ्याव्या लागण्याची कारणे ओमर अब्दुल्लांनी लक्षात घेतली आणि कृती केली तर अफजलच्या फाशीसंदर्भात  काश्मिरी तरुणाला उत्तरे देण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. पण शेवटी राजकारणी ते राजकारणीच! त्या वेळी फारुख अब्दुल्ला भाजपचा जयजयकार करत नाचत होते, आता काँग्रेसचा उदोउदो चालू आहे. जखम कुठे झाली हे माहीत असूनही ती कधीच बरी होऊ नये यासाठीच्या प्रयत्नात केवळ इस्लामाबादच दोषी नसून दिल्लीही तितकीच दोषी आहे. अफजल गुरूने केलेला गुन्हा गंभीर आहे, परंतु कसाबएवढा भयानक नाही. त्यामुळेच असा गुन्हा करण्याकरिता अफजल का प्रवृत्त झाला आणि पाकिस्तानात जाऊन दहशतवादाचे धडे घ्यावेसे त्याला का वाटले, याचा ओमर आणि दिल्लीने जरा गांभीर्याने विचार करावा म्हणजे काश्मिरींना जे प्रश्न पडतात त्यांची उत्तरे त्यांना देता येतील.
– विक्रम गोखले  

सुरक्षितता, आरोग्य या मुद्दय़ांवर न चालणारी ‘जादू’
‘जैतापूरची जादू’ हा अग्रलेख वाचला. ‘अणुऊर्जा ही सुरक्षित नाही. अणुऊर्जा प्रकल्प चालू असतानासुद्धा त्याच्या सभोवताली राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याबाबतीत गंभीर समस्या उद्भवतात. प्रकल्पात अपघात झाल्यास परिसरातील लोकांच्या आरोग्यास, जीवितास त्याचप्रमाणे पर्यावरणास मोठय़ा प्रमाणात धोका उत्पन्न होतो. यास्तव आम्हाला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परीस्थित नको,’ ही स्थानिक जनतेची ठाम भूमिका आहे. अणुऊर्जेच्या सुरक्षिततेबद्दल सरकार कितीही ग्वाही देत असले तरी थ्री माइल आयलंड, चेर्नोबिल आणि फुकुशिमा येथे झालेल्या अपघातांनंतर तेथे काय हाहाकार माजला आणि आजच्या घडीला तेथे काय परिस्थिती आहे हे आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात स्थानिक जनतेस पूर्णपणे ठाऊक आहे. तारापूर येथील देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाकरिता देशप्रेमाने प्रेरित होऊन आपल्या जमिनी प्रकल्पास देणाऱ्यांची आज काय दुर्दशा झाली आहे हेही त्यांना पुरते ठाऊक आहे. आपल्या पुढच्या पिढय़ांच्या आरोग्याकरिता, जीविताच्या सुरक्षेकरिता जैतापूरवासीयांना अणुऊर्जा प्रकल्प नको आहे.
अग्रलेखात उल्लेखिलेल्या फिनलंड आणि फ्रान्समधील अरेव्हाच्या प्रकल्पांची २०१२ मधील किंमत मूळच्या किमतीपेक्षा दुपटीहून अधिक वाढून अनुक्रमे ८ अब्ज युरो आणि ८.५ अब्ज युरो झाली आहे. रुपयांमधील यांची किंमत अनुक्रमे ५७, ७७६ कोटी आणि ६१,३८७ कोटी इतकी प्रचंड होते. एवढय़ा प्रचंड किमतीच्या प्रकल्पांची कंत्राटे मिळवून स्वत:च्या पुढच्या ७० पिढय़ांचे कल्याण करण्याचा उद्देश, स्थानिक जनतेचा विरोध न जुमानता हा प्रकल्प पुढे रेटण्यामागे असावा.
– डॉ. मंगेश सावंत

दुष्काळ पाण्याचा की नियोजनाचा?
साधारणत: एक एकर उसासाठी १० हजार घनमीटर (एक कोटी लीटर) पाणी लागते. या पाण्यामध्ये सरासरी ४५ टन प्रती एकर उसाचे उत्पन्न घेतले जाते. म्हणजेच एक टन उसासाठी २२२ घनमीटर पाणी लागते तर १ किलो उसासाठी २२२ लीटर पाणी लागते.
नांदेड विभागात जानेवारी अखेपर्यंत ६३.०४ लक्ष टन उसाचे गाळप झाले आणि ऊस उत्पादनासाठी १४० कोटी ०८ लाख घनमीटर पाणी वापरले गेले. तर ऊस उत्पादकांनी १ लाख ४० हजार एकर जमिनीवर उसाचे उत्पादन केले.
जनतेला प्रतिदिन ८० लीटर पाणी वर्षभर द्यावयाचे असेल तर २९.२ घनमीटर (२९ हजार २०० लीटर) पाण्याची गरज असते. याचाच अर्थ १ लाख ४० हजार एकराच्या जमीनमालकांनी ४ कोटी ७८ लक्ष ९७ हजार लोकांच्या पाण्याच्या हक्कावर अतिक्रमण केले आहे.
अमर्त्य सेन यांच्या विचारांप्रमाणे दुष्काळ पाण्याचा नसून त्याचा सदोष वापर आणि वितरण पद्धतीचा आहे असे समजायचे का?
-मिलिंद बेंबळकर

‘पापं नाशयति’ ?
‘डुबकीने पाप जाते का?’ हा दा. कृ. सोमण यांचा लेख (१३ फेब्रु.) नक्कीच विचार करायला लावणारा व अस्वस्थ करणारा आहे. अनेक स्तोत्रांमध्येही असे म्हटलेले आहे की ‘हे स्तोत्र सकाळी वाचल्यावर रात्री केलेली पापे नाहीशी होतील व रात्री वाचल्यावर दिवसभरात केलेली पापे नाहीशी होतील.’ अशा गोष्टींचा खेद होतो.
जाणूनबुजून केलेल्या पापाला जर शिक्षा नसेल तर देवाची भीती कोणालाच वाटणार नाही. गंगास्नानाबद्दल वाचलेली  एक गोष्ट आठवली- एखादा माणूस जेव्हा गंगेत स्नान करायला जातो, तेव्हा पाप घाबरून काठावर बसते आणि तो माणूस बाहेर आला की परत त्याच्या मानगुटीवर बसते.
    – अभय दातार, केनेडी ब्रिज, मुंबई</strong>