वर्षभर वाचकांच्या मागे लागून लागून आपल्या पुस्तकांच्या विक्रीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समस्त मराठी प्रकाशकांनी यंदाच्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य, याची चर्चा करण्याचे खरे तर कारण नाही. ज्या हेतूसाठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते तो हेतू घुमान येथे संमेलन भरवून साध्य होणार आहे की नाही, याबद्दलच साशंक वातावरण असताना, पदरमोड करून घुमानवासीयांना मराठी पुस्तके विकत घेण्याची गळ घालण्याचे कष्ट मराठी प्रकाशक कशासाठी करतील? संत नामदेव महाराजांचे वास्तव्य झालेल्या या गावामध्ये भाषेचा अभिमान आणि त्याबद्दलचे कौतुक मोठय़ा प्रमाणात असेल, यात शंका नाही. परंतु ज्यांची मातृभाषा मराठी नाही, जेथे महाराष्ट्रातून आलेल्या मराठी भाषकांची संख्या अक्षरश: नगण्य आहे, तेथे मराठी सारस्वतांच्या शब्दकळेचे धन, धन देऊन विकत घेण्याची शक्यता फारच कमी. यापूर्वी महाराष्ट्राबाहेर झालेल्या संमेलनांमध्ये रायपूरचे संमेलन विशेष गाजले होते. केवळ संमेलनाध्यक्ष गंगाधर गाडगीळ होते म्हणून नव्हे, तर तेथे मराठी भाषेबद्दल जिव्हाळा आणि प्रेम असणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात असल्याने मिळालेला प्रतिसाद हे तेव्हाचे वैशिष्टय़ ठरले होते. मराठीने आपली पंचक्रोशी सोडून दुसऱ्यांचे उंबरे ओलांडायला हवेतच, परंतु त्यासाठी उंबऱ्यापलीकडूनही स्वागताचा उत्साह असायला हवा. त्यासाठी त्या भाषेचा वापर करणाऱ्यांची संख्या भरीव हवी की नको? घुमान येथे अ. भा. साहित्य संमेलनाचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आयोजकांनी हे व्यावहारिक शहाणपण का वापरले नाही, असा प्रश्न आता उपस्थित करून काहीच उपयोग नाही. काही कोटी रुपयांच्या ग्रंथविक्रीचे नवे मानदंड गेल्या काही वर्षांत संमेलनांमध्येच निर्माण होत आहेत. गेल्या काही दशकांत मराठी ग्रंथांची पहिली आवृत्ती अकराशे प्रतींच्या पुढे सरकली आहे. काही दिवसांतच दुसऱ्या आवृत्तीसाठी धावाधाव करावी लागणाऱ्या प्रकाशकांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. हे सारे घडते आहे, याचे कारण केवळ साक्षरता हे नाही किंवा खिशात चार पैसे आहेत, हेही नाही. पुस्तकांची बाजारपेठ वाढते आहे, याचे कारण विविध विषयांवरील अनेक पुस्तके वाचकांना सहजगत्या मिळण्यासाठीची एक यंत्रणा निर्माण होते आहे. या पाश्र्वभूमीवर एकूणच व्यवसायाचा विचार करता घुमान येथे पुस्तके घेऊन जाणे हे फारसे किफायतशीर नाही आणि म्हणून तेथे जाणे परवडणारे नाही, हा युक्तिवाद बिनतोड आणि पटू शकणारा आहे. मात्र प्रकाशक जेव्हा बहिष्काराची भाषा करू लागतात, तेव्हा त्यामागे निषेधाचा सूर उमटायला लागतो. हा निषेध कुणाचा किंवा कोणत्या कारणांसाठी आहे, हे प्रकाशक जाहीर करण्यास तयार नाहीत. साहित्य महामंडळाने विश्वासात घेतले नसल्याची चर्चाही कुजबुजीच्या रूपात करत राहणे आणि संमेलनाच्या काळात मुंबईत ग्रंथप्रदर्शन भरवणे हा काही मराठी स्वभाव नव्हे. मराठी प्रकाशकांनी बहिष्कार टाकल्याने घुमानवासीयांची फार काही कुचंबणा होईल, असे वाटण्याचे कारण नाही. मराठी पुस्तकांची एक हुकमी बाजारपेठ यंदापुरती बंद झाली आणि त्यासाठी प्रकाशकांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे, असे मात्र म्हटले पाहिजे.