आजचा जमाना तयार अन्नपदार्थाचा आहे. अगदी भाज्या, पराठे, बिर्याणी हेसुद्धा गरम केले, की अन्न तयार होते; पण हे सगळे शक्य होते ते अन्न अभियांत्रिकीमुळे. सियाचेनसारख्या अतिउंचावरील भागात काम करणारे जवान, गिर्यारोहक व अवकाशवीरांसाठी टिकाऊ अन्नपदार्थ तयार करण्यासाठी तंत्रज्ञान शोधण्यात आले. पुढे त्याच्याच मदतीने दैनंदिन जीवनातही खाण्यास तयार (रेडी टू इट) असे पदार्थ तयार करण्याची पद्धत रूढ झाली. आता नासाने मंगळावर अवकाशवीर पाठवण्याचे ठरवले आहे, त्यांचे अन्न तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे कंत्राट भारतीय वंशाच्या कृषी व अन्न तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय वैज्ञानिकाला देण्यात आले आहे. त्या वैज्ञानिकाचे नाव आहे आर. पॉल सिंग. त्यांना ‘ग्लोबल कॉन्फेडेरेशन फॉर हायर एज्युकेशन फॉर अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड लाइफ सायन्सेस’ या परिषदेने जागतिक कृषिवैज्ञानिक पुरस्कार जाहीर केला आहे.
गेली चाळीस वर्षे सिंग हे अन्न अभियांत्रिकीच्या क्षेत्रात काम करीत आहेत. डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात ते अन्न अभियांत्रिकीचे मानद प्राध्यापक आहेत. पंजाब विद्यापीठातून त्यांनी कृषी अभियांत्रिकीत १९७० मध्ये पदवी घेतली व नंतर संशोधनासाठी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात गेले. औद्योगिक पातळीवर जेव्हा शीतपेये किंवा अन्नपदार्थ साठवले जातात, तेव्हा त्यासाठी मोठे प्रशीतक (रेफ्रिजरेटर) वापरले जातात. त्यांच्या वीजवापराचा खर्च मोठा असतो, त्यामुळे हा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी संगणकीय आज्ञावलीच्या माध्यमातून प्रशीतक यंत्रे चालवण्याचे प्रयोग यशस्वी केले आहेत. शीतकरण, ऊर्जा संवर्धन व अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानाचे मोठय़ा प्रमाणावर हस्तांतर, हंगामानंतर शेतमालाची साठवणूक या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. त्यातून भाजीपाला व फळे सडून होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.  सिंग यांनी त्यांचे अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान भारत, ब्राझील, पेरू, पोर्तुगाल, थायलंड या देशांना उपलब्ध करून दिले आहे.  सध्या ते प्रक्रिया केलेले अन्न अधिक पौष्टिक कसे करता येईल यावर संशोधन करीत आहेत. त्यांच्या नावावर तीन अमेरिकी पेटंट, १५ पुस्तके व २६० शोधनिबंध आहेत. त्यांना यापूर्वी सॅम्युएल केट पुरस्कार, इन्स्टिटय़ूट ऑफ फूड टेक्नॉलॉजिस्ट पुरस्कार, किशिदा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, फॅरल यंग एज्युकेटर पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले आहेत. इंटरनेट माध्यमासाठी त्यांनी सहा हजार तासांचे अन्न प्रक्रिया अभ्यासक्रम तयार केले आहेत.