सोनिया गांधी या नायजेरियन म्हणजे वर्णाने काळ्या असत्या तर काँग्रेसने त्यांना अध्यक्षपदी स्वीकारले असते का, हा केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी एका विश्रामगृहावर रात्री आपले दरबारी आणि काही बातमीदार यांच्याशी गप्पा मारताना विचारलेला वाहय़ात प्रश्न म्हणजे केवळ सोनिया गांधी यांच्याबद्दलची टिप्पणी नाही. याचा अर्थ गिरिराज सिंह यांना सोनियांबद्दल फार आदर आहे अशातला भाग नाही. सोनियांचा वर्ण आणि त्यांची जन्मभूमी हा सर्वच भाजप नेत्यांनी टीका-द्वेषाचा विषय मानला. गिरिराज सिंह यांच्या ताज्या वक्तव्यालाही तो दरुगध आहेच. तेव्हा हा विषय राजकीय पटलावर आला आणि त्यावरून काँग्रेसने गिरिराज सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी वगैरे केली तर त्यात काहीही गैर नाही. ही आपल्याकडील राजकीय रीतच आहे. मात्र या विधानाला राजकारणाच्या पलीकडचाही एक अर्थ असून, तो थेटच भारतीय म्हणून गौरविल्या जाणाऱ्या संस्कृतीशी निगडित आहे. तेव्हा गिरिराज सिंह यांचा वा काही दिवसांपूर्वी त्यांच्याप्रमाणेच वर्णवाचक आणि लैंगिकतावादी वक्तव्य करणारे संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांचा पक्ष कोणता हे फार महत्त्वाचे नसून, त्यांच्या विधानांचा विचार करताना आपल्या बुरसटलेल्या सांस्कृतिक जाणिवा आणि वैचारिक विसंगती यांकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या देशातील बहुसंख्य नागरिक कृष्णवर्णीय आहेत, जेथील लोकप्रिय देवतांचा वर्णही काळा आहे, त्या देशाच्या संस्कृतीमध्ये काळा रंग अपवित्र मानला जातो, हीच एक मोठी विसंगती आहे. या वर्णवर्चस्वाच्या भावनेचे मूळ वर्गजाणिवांमध्ये शोधावे लागेल. काळ्या मातीत राबून, उन्हात कष्ट करून काळे पडलेले श्रमिक हे पांढरीतल्या उजळ माथ्याच्या नगरजनांना क्षुद्र आणि शूद्र वाटणे यातून असले वर्णवर्चस्व निर्माण झाले असण्याची शक्यता आहे. गौरवर्णीय पाश्चात्त्यांमधील वर्णवर्चस्वाच्या भावनेला वांशिक श्रेष्ठत्वाचीही किनार असते. विशेष म्हणजे पाच हजार वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा गोडवा गाणाऱ्या देशातही हे वांशिक श्रेष्ठत्व लपून राहिलेले नाही. ते गोरे, उंचेपुरे, घारे आर्य आणि काळे द्रविड अशा चौकटी करून आपण पाळतो. वर्णद्वेषाच्या या रंगपटलावरही एक तरतमभाव दिसून येतो. गोऱ्या पाश्चात्त्यांच्या दृष्टीने आपण तपकिरी काळे असतो आणि आपल्या दृष्टीने आफ्रिकी लोक काळे असतात. हा गंड विकृत आणि टाकाऊ खरा, पण जातीप्रमाणे तोही आपल्या मनाला चिकटलेला आहे. गिरिराज सिंह यांचे विधान हा त्याचाच नमुना आहे. या विकृत भावनेमुळे येथील लाखो तरुणींचे भावजीवन उद्ध्वस्त झालेले आहे. आता आपल्याकडे सगळ्यांच्याच मनात रंगभेद असतो असे म्हणून गिरिराज सिंह यांना दोषमुक्त करता येणार नाही. ते नेते आहेत. नेत्यांनी समाजाचे पुढारपण करायचे असते ते समाजाला भडकवून आपली सत्तालालसा पूर्ण करण्यासाठी नव्हे. मात्र गिरिराज सिंह यांचा इतिहास पाहता त्यांना समाजनेता म्हणणे चूकच ठरेल. ते केंद्रीय मंत्री झाले ही त्यांच्या मोदीनिष्ठेची बक्षिसी. यापूर्वीही अनेकदा अशीच वादग्रस्त वक्तव्ये करून मोदी यांना अडचणीत आणूनही ते मंत्रिमंडळात टिकून आहेत ते याच निष्ठेच्या बळावर. अशा निष्ठावानांचा, ते कलंकित असले तरी राजीनामा घेतला जात नसतो. तेव्हा ते यापुढेही मंत्रीच असतील. त्यासाठी त्यांच्या जिभेला झालेला अस्थिभ्रंश हा उलट साह्य़भूतच असेल.