लागोपाठचे पराभव, गमावलेला फॉर्म यामुळे नामोहरम झालेल्या क्रिकेटपटूने प्रदीर्घ काळानंतर खेळपट्टीवर उतरावे आणि पाहता पाहता चौकार-षटकारांची आतषबाजी करावी. अशा वेळी उपस्थित प्रेक्षकांना जो आश्चर्याचा धक्का बसेल, अगदी त्याच जातकुळीचा धक्का काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशवासीयांना दिला आहे. राहुल गांधी हे काही सभा जिंकणारे वक्ते नव्हेत. महाविद्यालयीन पातळीवरील वादविवाद स्पर्धेत एखाद्या नवख्या वक्त्याने आत्मविश्वासाचा आव आणून तावातावाने बोलावे तशा प्रकारची त्यांची भाषणे हा अनेकदा विनोदविषय झाला आहे. जाहीर सभांचा फड मारण्यासाठी अंगी वेगळीच गारुडकला असावी लागते. ती राहुल यांच्याकडे खचितच नाही. पण दूरचित्रवाणीच्या स्टुडिओमध्ये जाऊन तडफेने बोलण्याचे कसबही त्यांच्याकडे नसल्याचे        देशाने पाहिले आहे. अभ्यास नसलेला, आत्मविश्वासाचा अभाव असलेला, बोलताना गांगरणारा, श्रोत्यांच्या काळजाला कदापि हात घालू न शकणारा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याच पुढारपणाबद्दल अजिबात गांभीर्य नसलेला नेता अशी राहुल यांची प्रतिमा होती. परवा लोकसभेत त्यांनी केलेल्या भाषणाने त्या प्रतिमेला नक्कीच तडा दिला आहे. एका भाषणाने ती प्रतिमा बदलणार नाही आणि या एका भाषणाच्या शितावरून पुढचा भात रुचकर असेल असे सांगताही येणार नाही. उलट या एका भाषणाचे, त्यातील अभ्यासाचे, उत्स्फूर्तपणाचे, जिवंतपणाचे, त्यातील टोले आणि चिमटय़ांचे एवढे कौतुक झाल्यानंतर आता खरी राहुल यांची        परीक्षा सुरू होणार आहे. ती खरोखरच ‘जीवन-मरणाची’ असणार आहे. याचे कारण त्यातून काँग्रेसला नेता मिळतो की न मिळतो हे त्या परीक्षेतून ठरणार आहे हे नसून, येथे प्रभावी विरोधी पक्ष निर्माण होतो की नाही हे त्यातून कळणार आहे, हे आहे. राहुल यांचे भारतीय राजकारणातील नेमके स्थान अद्याप नक्की व्हायचे आहे. पण आजघडीला ते काँग्रेस या सर्वात व्यापक अशा पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्या पक्षातील अनेक नेते त्यांच्याकडे भावी पक्षाध्यक्ष म्हणून पाहत आहेत. असा भावी अध्यक्ष असणारा नेता मुखदुर्बळ असणे, राजकारण हे अर्धवेळ काम असल्यासारखे त्याने वागणे यातून तो पक्ष तर दुर्बश होतोच, परंतु त्याने राजकारणातील विरोधी प्रवाहच नामशेष होण्याची भीती निर्माण होते. लोकशाहीचा गाडा केवळ सत्ताधारी पक्ष चालवू शकत नाही. त्याने तसा तो चालवला तर त्याला लोकशाही म्हणत नाहीत. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सशक्त विरोधी पक्ष हवाच असतो. तो नसतो ती जमीन फॅसिझमच्या टारफुल्यासाठी सुपीक मानली जाते. मोदी लाटेमध्ये देशातील काँग्रेससह सर्वच पक्ष भुईसपाट झाल्यामुळे येथे विरोधी पक्ष म्हणून कोणी अस्तित्वात असेल की नाही असे भय निर्माण झाले होते. परंतु राहुल यांचा बदललेला अवतार आणि त्यामुळे काँग्रेसच्या किमान काही खासदारांमध्ये निर्माण झालेले चैतन्य पाहता यातून काँग्रेस एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावू शकेल अशी चाहूल लागत आहे. ती हूल ठरणार की कसे, हे आता राहुल स्वत:ला आणि राजकारणाला किती गांभीर्याने घेतात यावरच ठरणार आहे.