स्वातंत्र्यपूर्व काळात सिन्नर तालुक्यातील पाडळीसारख्या एका लहान गावातील शेतकऱ्याचा मुलगा शिक्षणाचा ध्यास घेतो. त्याकरिता भटकंती करतो. शिकतानाच स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतो. नंतर जनसामान्यांच्या हक्कांकरिता मार्क्‍सवादाच्या दिशेने प्रवास करतो. या साऱ्या प्रवासात तुरुंग, पोलिसांचा छळ सहन करत नंतर मात्र आपला मार्ग बदलून स्वातंत्र्यानंतर समाजसेवा व शिक्षणासाठी आयुष्य समर्पित करतो. अशा प्रकारचे ध्येयवादी जीवन जगलेले व्यक्तिमत्त्व, ही रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक विधिज्ञ रावसाहेब शिंदे यांची ओळख होती. त्यांच्या चारित्र्यसंपन्न व तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्वातून या ध्येयवादाची साक्ष मिळत असे.
देशाच्या हरितक्रांतीतील एक भागीदार असलेले माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे ते धाकटे भाऊ असले तरी त्यांची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली. दोघेही भाऊ हे लहानपणापासून बुद्धिमान होते. विद्यार्थिदशेतच त्यांचा १९४०मध्ये साने गुरुजींशी संपर्क झाला. राष्ट्र सेवा दलाच्या कार्यात ते सहभागी झाले. त्यातून वाचनाचे संस्कार निर्माण झाले. या काळात ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. सुरुवातीला भूमिगत राहून काम केल्यानंतर पुढे ते उघडपणे सक्रिय झाले. दोन वेळा त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटलाही भरण्यात आला. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते मार्क्‍सवादाकडे आकर्षित झाले. त्यामुळे सरकारने त्यांना पकड वॉरंट काढून १० हजारांचे बक्षीस ठेवले. तसेच ते सापडत नाहीत म्हणून दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेशही निघाले होते. मात्र यशवंतराव चव्हाणांमुळे शिंदेबंधू, भाऊसाहेब थोरात, पी. बी. कडू यांच्यासह अनेक नेत्यांनी पुरोगामी विचार स्वीकारला. वैचारिक भूमिका बदलल्यानंतर थोरातांनी सहकाराचा रस्ता धरला, तर अण्णासाहेब शिंदे हे राजकारणात आले. केंद्रात मंत्री झाले. रावसाहेबांनी मात्र त्यांच्यामागे पाठबळ उभे केले. शिक्षण व समाजकार्यात स्वत:ला झोकून दिले. त्यांनी वकिलीही मानवतावादातून केली. गरीब शेतकरी कुटुंबांचे खटले स्वखर्चाने लढवून त्यांना जमिनी मिळवून दिल्या. त्यांना राज्यपालपद व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाकरिता विचारणा झाली, पण त्यांनी नम्रपणे त्याला नकार दिला. कूळ कायदा तसेच शेतजमिनीचे अनेक कायदे करताना त्यांनी सरकारला मदत केली. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी आपले आयुष्य रयतच्या कामाला झोकून दिले. त्यामुळेच त्यांना संस्थेचे कार्याध्यक्ष करण्यात आले. त्यांनी रयतमध्ये वशिलेबाजीवरील शिक्षकांच्या नेमणुका बंद करून त्या परीक्षेच्या माध्यमातून घेण्यास प्रारंभ केला. मॅनेजमेंट कोटा नावाचा प्रकार बंद केला. विद्यार्थ्यांना संगणक व इंग्रजीचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी ज्ञान महामंडळाची तसेच विज्ञान शिक्षणासाठी होमी भाभा केंद्राची मदत घेतली.
टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून देशातील पहिले कॉल सेंटर श्रीरामपूरच्या बोरावके महाविद्यालयात सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच अर्धवेळ नोकरी करून पैसे कमविण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रकल्पाचे देशभर कौतुक झाले. त्यांनी नेहमीच वैचारिक, तत्त्वनिष्ठ भूमिका स्वीकारून चारित्र्याचा आग्रह धरला. रावसाहेबांच्या समविचारींचा गोतावळा मोठा. पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, व्यंकटेश माडगूळकर, राजाभाऊ मंगळवेढेकर, यदुनाथ थत्ते यांच्यासह अनेक साहित्यिकांशी त्यांचा स्नेह होता. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्याशी त्यांची मैत्री झाली. अहमदनगर जिल्हय़ात सत्काराऐवजी सत्कार्य मोहीम राबवून त्यांनी आनंदवनला देणग्या मिळवून दिल्या. या मदतीचा ‘श्रीरामपूर पॅटर्न’ म्हणून उल्लेख केला जातो. त्यांच्या निधनाने ध्येयवादी समाजकारण्यांच्या माळेतील एक हीरा निखळला आहे.