मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी मराठी (मुंबईकर) माणसांनी रक्त सांडले. मात्र त्याच मुंबईतून मराठी माणूस घटत चालला आहे. याची फिकीर कोणत्याही राजकीय पक्षाला नाही. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे श्रेय घेण्यासाठी अहमहमिका लागली आहे. कुणी म्हणते शिवाजी पार्कवरच झाडाखाली स्मारक होऊ द्या, कुणी म्हणते दादर स्टेशनचे नाव बदला तर कुणी म्हणते प्रस्तावित शिवडी- न्हावा शेवा लिंकला नाव द्या.
मुंबईतील मराठी माणूस मुंबईत राहिला, तरच खरेतर बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला शांती मिळेल. तेच बाळासाहेबांचे खरे स्मारक शोभेल. याबाबत शिवसेना आणि राज्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करावा, असे वाटते.
डॉ. हिरालाल खरनार, खारघर.

स्मारके उभारा, पण पक्षाच्याच निधीतून
मुंबईत श्वास घेण्यापुरत्या मोकळय़ा जागा उरलेल्या आहेत. मात्र महान नेत्यांच्या स्मारकांबद्दल सध्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विशिष्ट जागेचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटत असते. आजकाल पक्षीय कार्यकर्ते आपापल्या नेत्यांचे वाढदिवस, नियुक्त्या, निर्वाण अशा निमित्ताने फलक- जाहिरातींवर लाखो रुपये खर्च करत असतात.
या कार्यकर्त्यांनी पक्षाच्याच निधीतून स्मारके उभी केल्यास कार्यकर्त्यांच्या श्रमाचे आणि निष्ठेचे चीज होईल.
गिरीश भागवत, आंबेडकर मार्ग दादर, मुंबई.

What Sharad Pawar Said About Raj Thackeray?
‘राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याने सामान्य माणूस संभ्रमात’, शरद पवार म्हणाले, “मी पण सामान्य माणूस”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
chetan narke, kolhapur lok sabha, chetan narke shivsena
हातकणंगलेतून लढण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावाला नकार; कोल्हापुरात लढणारच – डॉ. चेतन नरके
Vijay Shivtare
शिवतारे गरजले, “बारामतीमधून पवार यांची हुकूमशाही संपविण्यासाठीचे माझे धर्मयुद्ध..”

हीसुद्धा धूळफेक ठरू नये..
सिंचन घोटाळ्यामध्ये श्व्ोतपत्रिकेची धूळ पुरेशी वाटली नाही म्हणून की काय आता स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे.
जलतज्ज्ञ माधव चितळे याचे प्रमुख आहेत. ज्यांनी पूर्वीच सिंचन विभाग समाधानकारक काम करत आहे, असा निर्वाळा दिला आहे. गमतीचा भाग असा की ज्या चितळ्यांच्या बौद्धिक क्षमतेबद्दल राष्ट्रवादीचे नेते भरभरून बोलत आहेत त्याच चितळ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाच्या असंख्य शिफारशी याच सरकारने बासनात गुंडाळून ठेवल्या आहेत. एसआयटी ही शोध घेणारी हवी. केवळ तांत्रिक अहवाल यातून अपेक्षित नाही, त्यामुळे या पथकाची स्थापना करताना यात अनियमितता, प्रशासकीय ढिसाळपणा, भ्रष्टाचार आणि पर्यावरणाचा ऱ्हास यासंदर्भातही शोध घेणे गरजेचे आहे. याचा कार्यकाळही निश्चित केला गेला पाहिजे आणि विशिष्ट काळात हे काम पूर्ण झाले नाही, तर न्यायालयाच्या हस्तक्षेपाची तरतूद यात असायला हवी.
केवळ श्व्ोतपत्रिकेची मागणी केल्यानंतर राणा भीमदेवी थाटात अजित दादांनी राजीनामा ‘फेकला’ होता, आता तर चौकशी आयोग नेमलाय. ही खरी वेळ आहे दादा राजीनामा फेकण्याची आणि या अग्निपरीक्षेला पारदर्शकपणे सामोरे जाण्याची!
अनघा गोखले, दादर, मुंबई.

राजकारणापायी इतिहास पुसू नका
ब्रिटिश सरकारने १९२७ साली दादरमधील मैदानाचे ‘शिवाजी पार्क’ असे नामकरण करून मराठी अस्मितेचा झेंडा अटकेपार फडकवणाऱ्या एक महान राजाच्या कर्तृत्वाला सलाम केला. अशा मैदानातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्तित्व जाणवत असताना शिवसेना नेत्यांनी भावनिक, अस्मितेचे राजकारण करून इतिहास बदलण्याची कृती करू नये. ब्रिटिश सरकारने दाखवलेल्या शहाणपणातून मध्यवर्ती जागी लोकोत्तर नेत्याचे जे स्मारक निर्माण झाले, त्या नेत्याचे नाव मैदानाच्या नावातून आता वगळणे ही बौद्धिक दिवाळखोरी ठरेल.
शिवाजी पार्क मैदानाला ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे, ती सर्वानीच लक्षात घ्यावी. हे मैदान म्हणजे देशातील नामवंत क्रिकेटवीरांचीही कर्मभूमी आणि होतकरू खेळाडूंना पैलू पाडणारे विद्यापीठ असल्याने त्याचे क्रीडांगण म्हणून अस्तित्व टिकले पाहिजे. या मैदानावर मेळावे, राजकीय सभा होण्याचीही परंपरा आहे, पण त्यापैकी शिवसेनेचा दसरा मेळावा येथे होतो म्हणून शिवतीर्थ नाव देणे हे शिवाजी महाराजांच्या नावाला जाणूनबुजून अंतर देण्यासारखे आहे. भावनिक अस्मितेच्या या राजकारणात मराठी अस्मितेवरच घाला येतो आहे, हे शिवसेनेच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे.
शिवदास शिरोडकर, लालबाग, मुंबई.

पोलीस अधिकाऱ्यांसाठी एवढे तरी करा..
एखाद्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अशा पोलीस अधिकाऱ्याने किंवा साध्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सेवा बजावताना दाखवलेले धाडस भ्रष्ट, गुंड प्रवृत्तीच्या एखाद्या राजकीय नेत्याला वा त्याच्या आप्तांना महागात पडणार असले की मग, त्या अधिकाऱ्याला शाबासकी वा कौतुकाऐवजी सूडभावनेने केलेल्या बदलीची शिक्षा मिळते. हे नेहमीचेच झाले आहे. ती बदलीदेखील अशा ठिकाणी केली जाते की, रुजू होण्यापूर्वीच्या १५ दिवसांत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याला किती धावपळ करावी लागते त्याचे त्यालाच माहीत.
बदलीचे, अगदी तडकाफडकी बदलीचेही अधिकार सरकारकडे आहेतच, परंतु विनंती अशी करावीशी वाटते की, बदलीच्या कायदा वा प्रणालीमध्ये अगदी लहानसा बदल करून एक कलम जोडावे.
‘नव्या बदलीच्या शहरात राहण्याची व्यवस्था असावी, मुलाबाळांना शैक्षणिक संस्थेत ताबडतोब प्रवेशाची व्यवस्था व्हावी, बदली जिथून झाली तिथपासून तिथपर्यंत सामान पॅक करून ते ज्या ठिकाणी बदली झाली आहे तिथपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था उपलब्ध असावी. या बाबींची पूर्तता झाली असेल तरच ती बदली वैध ठरवावी’.
राजकारणामुळे बळीचा बकरा होणाऱ्या पोलिसांचे नव्हे, पण त्यांच्या कुटुंबीयांचे तरी हाल यामुळे कमी होतील. ऊठसूट बदली करणाऱ्या सरकारला तसे करण्यापूर्वी थोडा विचार करावा लागेल. मोठमोठय़ा कंपन्या आपल्या अधिकाऱ्याची बदली करायची झाल्यास त्याचे ‘रीलोकेशन’ करतात, तो कित्ता आजच्या काळात सर्वानीच गिरवावा.
प्रकाश भिकाजी आरेकर, सरीगाम (भिलाड).

‘शिवतीर्थ’ प्रमाणे ‘शिवसेना’ शब्दही अत्र्यांचा?
‘आचार्य अत्रे आणि शिवतीर्थ’ हे शिवाजी ओउलकर, सांगली यांचे पत्र (१४ डिसेंबर) वाचले. आचार्य अत्रे शिवाजी पार्क मैदानाचा उल्लेख ‘शिवतीर्थ’ असा करीत तसेच ‘शिवसेना’ हा शब्दही त्यांनी फार पूर्वी वापरला होता, असा उल्लेख सापडतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी परप्रांतीय उद्योगपती, खासदार हे मुंबई महाराष्ट्राला देण्याविरोधात होते. मराठी माणसे गुंड प्रवृत्तीची आहेत, असे ते म्हणत. तेव्हा मराठी माणसांचे-विशेषत:  मराठी तरुणांचे हितसंबंध जपण्यासाठी एक स्वयंसेवकांची संघटना असावी असे अत्रे यांना वाटले. सदर संघटना गावोगावी सभासद करून घेऊन ती भक्कम पायावर अन्यायाविरुद्ध उभी राहील, असा अत्रे यांचा विचार होता. पण संयुक्त महाराष्ट्र समितीतील अन्य घटकपक्षांनी ही सूचना मनावर घेतली नाही. तेव्हा अत्रे यांनी ‘मराठा’त ‘शिवसेना’ नावाचा अग्रलेख लिहिला (संदर्भ: आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांनी लिहिलेली ‘हुतात्मा’ कादंबरी : पान १८३)
बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितले की, त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘शिवसेना’ नाव सुचवले. आज प्रबोधनकार, ‘मराठा’कार आचार्य अत्रे व शिवसेनाप्रमुख हे तिघेही हयात नाहीत. त्यामुळे सत्य काय आहे ते सांगता येणे कठीण.  पण प्रबोधनकार व आचार्य अत्रे चांगले मित्र होते व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकत्र काम करीत होते. त्यामुळे मित्राचे हे अपुरे स्वप्न पुरे व्हावे, म्हणून त्यांनी ते नाव स्वीकारले असण्याची शक्यता आहे.
वाद वाढवण्यासाठी नाही; पण या पत्रामुळे ते आठवले, स्मरले.. म्हणून लिहिले.
श्रीधर गांगल, ठाणे.