नाताळ सणानिमित्ताने व्हॅटिकनमधून पोप जो संदेश देतात तो सगळ्याच जगासाठी महत्त्वाचा असतो, याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तो केवळ एका धर्मगुरूचा संदेश नसतो, तर जगातील सर्वाधिक अनुयायी असलेल्या आणि अगदी चिरेबंद संस्थात्मक बांधणी असलेल्या धर्माच्या नेत्याने आपल्या अनुयायांना दाखविलेली ती दिशा असते. दुसरी गोष्ट म्हणजे व्हॅटिकनचे रोमन कॅथॉलिक चर्च ही जशी धर्मसंस्था आहे तशीच ती राजसंस्थाही आहे. तेही केवळ व्हॅटिकन हे नगरराज्य आहे म्हणूनच नव्हे, चर्चचे राजकारणाशी नेहमीच असलेले लागेबांधे येथे विसरता येणार नाहीत. या वेळच्या पोप फ्रान्सिस यांनी नाताळनिमित्ताने जगभरातील कॅथॉलिक ख्रिश्चनांना दिलेल्या संदेशाबरोबरच त्यांची त्यापूर्वीची कृतीही विचारात घेणे आवश्यक आहे, किंबहुना ही कृतीच अधिक चर्चाविषय ठरणारी आहे. इसिस या मुस्लीम दहशतवादी संघटनेच्या पाशवी अत्याचारांमुळे इराकमधील असंख्य बिगर-मुस्लिमांवर आपल्याच देशात निर्वासित होण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये ख्रिश्चन धर्मीयांचीही मोठी संख्या असून, त्यातील काही युद्धनिर्वासित इराकमधील कुर्दबहुल एर्बिल या शहराबाहेरील एका छावणीत कसेबसे जीवन जगत आहेत. मध्यरात्रीच्या प्रार्थनेआधी पोप यांनी त्या छावणीतील काही निर्वासितांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना दिलासा दिला. मुस्लिमांची खिलाफत स्थापन करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या इसिसच्या धार्मिक अतिरेक्यांचा त्यांनी निषेधही केला. एकीकडे सर्व ख्रिस्ती जगत नाताळचा सण आनंदाने साजरा करीत असताना आपले काही बांधव वंशच्छेदक धर्माधांच्या अत्याचारांची शिकार बनत आहेत. त्यांना किमान दिलासा देण्याची ही कृती केवळ धार्मिकच नव्हे, तर मानवतावादीही आहे. यानंतरच्या भाषणातील, ‘बाळ येशूच्या उपस्थितीने आपल्यासमोर एकच प्रश्न उभा केला आहे. आपण परमेश्वराला आपल्यावर प्रेम करू देतो का?.. आपल्या आसपासच्या लोकांना भेडसावत असलेल्या समस्या, त्यांच्या अडचणी करुणेने आपल्याशा करण्याचे धैर्य आपल्यामध्ये आहे का?’ हे पोप यांचे सवाल केवळ धार्मिक मानताच येणार नाहीत, पण हे एवढेच नाही. चर्चचा आणि ख्रिश्चन धर्माचा इतिहास लक्षात घेतला तर पोप यांच्या या कृतीमागचे राजकीय पदर सहज लक्षात येतात. मुस्लिमांचा जिहाद आणि ख्रिश्चनांचे क्रूसेड्स हा तो इतिहास असून, पोप यांनी इराकमधील ख्रिस्ती नागरिकांच्या पाठीशी आपण असल्याचे सांगणे यामागे निश्चितच राजकीय संदेश आहे. यापुढच्या काळात कदाचित त्याचा अर्थ अधिक स्पष्ट होईल. पोप फ्रान्सिस यांनी साम्यवादी क्यूबा आणि भांडलवशाही अमेरिका या दोन शत्रू देशांमध्ये सामंजस्य निर्माण व्हावे यासाठी केलेले प्रयत्न जसे राजकीय होते, तसेच इसिसबाबतची त्यांची भूमिकाही राजकीयच आहे. मात्र पोप फ्रान्सिस यांचे एकंदरच व्यक्तिमत्त्व राजकीय आहे अशी मांडणी करणे चूक ठरेल. मुळात ते- रूढ भाषेत सांगायचे तर- उजवे नाहीत. एक प्रकारचा मध्यममार्गी उदारमतवाद त्यांच्या विविध कृतींतून दिसला आहे. पशूंनाही स्वर्गात जागा मिळते ही काही चर्चची भूमिका नव्हे, पण त्यालाही धक्का देण्याचे काम त्यांनी नुकतेच केले होते आणि दुसरीकडे चर्चमधील भ्रष्ट, गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विरोधातही त्यांनी लढा उभारलेला आहे. नाताळनिमित्ताने दोन दिवसांपूर्वी त्यांनी चर्चच्या बडय़ा पदाधिकाऱ्यांना ज्या कानपिचक्या दिल्या, धार्मिक स्मृतिभ्रंश आणि दुभंग व्यक्तिमत्त्वाच्या ‘आजारां’पासून सावध राहण्याचा सल्ला दिला, तो अनेकांना न पचणारा होता, पण त्यामागेही पोप फ्रान्सिस यांचे चर्चस्वच्छतेचे ‘राजकारण’ आहे. एकंदर पोप यांनी नाताळ प्रवचनांच्या निमित्ताने वेगळ्याच धार्मिक मुत्सद्देगिरीचा प्रत्यय दिला. त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य सांगणारी अशीच ही घटना आहे.