आसामच्या ज्या दुर्गम भागांत ‘उल्फा’चा प्रभाव अद्यापही कायम आहे. तेथे जाऊन पत्रकार राजीव भट्टाचार्य यांनी बंडखोरांचे अंतरंग जाणून घेतले. हे साहसच आहे, याची लेखकाला पुरेपूर कल्पना आहे आणि या प्रवासानंतर लिहिलेले पुस्तकही एखाद्या साहसी प्रवासवर्णनासारखे काही वेळा झालेले आहे. ‘उल्फा’चा एक बडा नेता परेश बरुआ याच्या मुलाखतीतून तसेच ‘बोडो’ व ‘नागा’ बंडखोरांच्या छावण्यांत जाऊन त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून या पुस्तकाने देशाचे सामरिक प्राधान्यक्रमही अधोरेखित केले आहेत..
युद्धाच्या कथा नेहमी रमणीय असतात. मात्र प्रत्यक्ष रणांगणावर दोन हात करणाऱ्यांना काय प्रसंग ओढवतो ते लढणाऱ्यालाच माहीत असते. तीच बाब पत्रकार राजीव भट्टाचार्य यांच्या ‘रांदेव्हू विथ रिबेल्स’ या पुस्तकातून उलगडणाऱ्या, दुर्गम भागात जीव धोक्यात घालून कडव्या दहशतवाद्यांशी केलेल्या भेटीची आहे. वातानुकूल कार्यालयात बसून बातमीदारी करण्याचा कंटाळा आल्याने राजीव यांनी ही जोखीम पत्करली. चाळीस-बेचाळीस दिवस जंगल-टेकडय़ांतून, तर कधी अरुंद रस्त्यांवरून प्रवास करीत ते आपले ईप्सित साध्य करतात. हा दुर्गम भाग आहे ईशान्येकडल्या राज्यांचा.
ईशान्येकडील भागातील घडामोडींकडे माध्यमांचे तुलनेने दुर्लक्षच होते. सप्तभगिनी असा उल्लेख या राज्यांचा करतो खरा, पण एखादी मोठी घडामोड असल्याशिवाय त्यांना बातमीत स्थान मिळत नाही. या पुस्तकातून ईशान्येकडील लोक कोणत्या परिस्थतीत राहतात, त्यांचे जगणे कसे निसर्गाशी एकरूप असते, विशेष भौतिक सुविधा नसतानाही लोक आनंदी जीवन जगतात याचे वर्णन आहे. स्वतंत्र आसामसाठी ‘संघर्ष’ करणाऱ्या ‘उल्फा’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख परेश बरुआ याची भेट, त्या अनुषंगाने ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या फुटीरतावादी चळवळी, बंडखोरांचा एकमेकांशी असलेला संपर्क व दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावरील वातावरण याचा स्वत: पाहून, अनुभवून घेतलेला वेध या पुस्तकात आहे.
पुस्तकातील सुरुवातीचा बराचसा भाग प्रवासवर्णनपर आहे. गुवाहाटीहून प्रस्तुत लेखक व त्यांचे पत्रकार मित्र प्रदीप गोगोई यांनी ‘उल्फा’च्या छावण्यांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी ‘उल्फा’चा म्होरक्या परेश बरुआशी झालेला पत्रव्यवहार, दौरा गोपनीय ठेवण्याचा त्याने दिलेला सल्ला- अन्यथा सुरक्षा धोक्यात येईल असा धमकीवजा इशारा- या बाबी विस्ताराने आहेत. विविध ठिकाणच्या प्रशिक्षण शिबिरांमधील छोटय़ा-मोठय़ा बंडखोरांशी चर्चा ही धोकादायकव्यक्तींची भेट घेऊन त्यांची कार्यपद्धती जाणून घेण्याचा त्यांचा उद्देश या प्रदीर्घ प्रवासातून साध्य होतो.
सीमेनजीकची दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे, त्यांची भरतीप्रकिया, त्यासाठी पात्रतेचे ‘नैतिक’ निकष (उदा.- बलात्काराचे आरोप किंवा गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्तीला सामील करून घेतले जात नाही) या गोष्टींवर प्रत्यक्ष शिबिरात संबंधित व्यक्तींशी चर्चा करून ऊहापोह केला आहे. अशी प्रशिक्षण शिबिरे, त्यांची मानसिकता, कार्यपद्धती याची नेमकी माहिती अनेक वेळा मिळत नाही. जी असते ती ‘सूत्रांच्या हवाल्याने’ उपलब्ध होते. ही सूत्रे बहुतेकदा पोलीस- गुप्तवार्ता या सरकारी पठडीतील असतात. मात्र या पुस्तकाने थेट बंडखोरांशीच बोलून दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे, त्यांची कार्यपद्धती, आसपासच्या गावांमध्ये असलेले त्यांचे संबंध यावर प्रकाश टाकला आहे. प्रशिक्षण शिबिरात भेटीसाठी जाण्यास निघाल्यावर वाटेत ‘उल्फाचा एक प्रमुख नेता’ अशी लेखकाने खोटीच ओळख सांगितल्यावर मनमोकळेपणे बोलणारे गावकरी, मिळणारा मान याचा उल्लेख पाहता, फुटीरतावादी चळवळ फोफावण्यात स्थानिक पाठबळ लक्षात येते.
आसामखेरीज ईशान्येकडील अन्य राज्यांमधील इतर बंडखोरांना भेटण्यासाठी त्यांनी नागालॅण्डच्या सीमेकडील भागात प्रवास केला. त्या अनुषंगाने सामान्यांच्या समजुतीच्या पलीकडील अनेक बाजू पुढे आणल्या. हे दहशतवादी सीमेपलीकडील म्यानमारमधून ये-जा करतात. सुरक्षा दलांची नजर चुकवून भारतीय हद्दीत येतात. म्यानमारच्या अनेक नागरिकांची भारतातील मतदारयाद्यांमध्ये नावे असल्याचा शोध येथे लेखकानेही घेतला आहे. तसेच शेजारी बांगलादेशमध्येही बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या (बीएनपी- नेतृत्व खालिदा झियांकडे) सत्तेच्या काळात ‘उल्फा’ला मिळालेले अभय. नंतर भारताशी सौहार्दाचे संबंध असलेल्या शेख हसीना यांच्या (म्हणजेच अवामी लीग पक्षाच्या) काळात सरकारने ‘उल्फा’च्या कारवायांना कसा पायबंद घातला याचा परामर्श आहे. दहशतवाद्यांच्या गटांचे परस्परांशी संबंध, पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयकडून मिळणारी मदत याचा उल्लेख दहशतवाद्यांची मदत अधोरेखित करतो. चीनमधून सहज मिळणारी शस्त्रास्त्रे, शेजारील देशांचे भारताशी सौहार्दाचे संबंध नसणे हे दहशतवाद्यांच्या आपोआप पथ्यावर पडते. त्यांना अप्रत्यक्ष मदत मिळते हे अनेक बाबींमधून उघड केले आहे. उल्फाबरोबरच एनडीएफबी (नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड), एनएससीएन (नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅण्ड- हिंसक खापलांग गट आणि सध्या हिंसक नसलेला आयझ्ॉक-मुइवा गट) अशा गटांच्याही नेत्यांशी चर्चा करून त्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांचा वेध राजीव भट्टाचार्य घेतात. या संभाषणांतून, ‘सरकार ईशान्य भारताकडे वसाहत म्हणून पाहते, त्यामुळे ब्रिटिश गेले आणि हे सरकार आले’ अशीच भावना या बंडखोरांची असल्याचे उघड होत राहते, हे लेखकाने स्पष्ट केले आहे.
दहशतवादी संघटनांच्या अंतरंगाबरोबरोबरच येथील समाजजीवन हा पुस्तकातील औत्सुक्याचा भाग आहे. स्थानिकांचे जगणे, खाणे-पिणे, सवयी याचा विस्ताराने उल्लेख आहे. पण हे निव्वळ ‘प्रवासवर्णन’ किंवा ‘सांस्कृतिक दर्शन’ नाही.. मुळात देशात प्रगतीचा डंका पिटला जात असताना मूलभूत सुविधांचाही कसा अभाव आहे याचे चित्र प्रत्यक्ष भेटीतून उभे केले आहे. एखाद्या रुग्णाला उपचारासाठी तासन्तास पायपीट करावी लागते, लाकूडफाटा आणण्यासाठी दुर्गम टेकडय़ांवरून जाण्याचे अग्निदिव्य पार पाडावे लागते. भोजनात तेल व साखरेचा अभाव हे त्यांच्या तंदुरुस्तीचे रहस्य सांगितले आहे. तसेच स्त्रीप्रधान कुटुंबपद्धती हे या भागातील एक वैशिष्टय़. म्यानमार सीमेलगत सहजपणे सुरू असलेली अफूची शेती, व्यसनासाठी पैसे हवेत म्हणून वाटेल ते करण्याची तयारी या बाबीही उघड केल्या आहेत. आहारात उंदीर, कुत्री यांचा होणारा सहजपणे वापर, हे प्रवासात स्थानिक ठिकाणी मिळालेल्या अनुभवावरून उघड केले आहे.
जीव धोक्यात घालून जो खडतर प्रवास केला, त्याचा मुख्य उद्देश ‘उल्फा’ व तत्सम संघटनेच्या नेत्यांना भेटणे हा होता. मात्र या वाटेतही अनेक वेळा मधूनच माघारी जावे लागते की काय, असे प्रसंग घडले. उदा. सुरुवातीलाच लष्कराच्या तावडीत सापडण्याचा प्रसंग बेतला. सीमेवर गस्त घालणाऱ्या तुकडीला चुकवण्यासाठी प्रसंगी सरपटत जावे लागले. मात्र ‘उल्फा’च्या म्होरक्याला भेटल्यावर जिवावर बेतून आतापर्यंत जे अनुभवले त्याला यश आल्याचे समाधानही लेखकाला मिळाले!
परेश बरुआबाबत फारशी माहिती कुणाला नाही. १९९२ नंतरच्या दोन दशकांत केवळ तीन छायाचित्रे वगळता काहीच माहीत नव्हते. एका स्वीडिश पत्रकाराला दिलेली एकमेव मुलाखत हीच काय ती माहिती. त्यामुळे उल्फाबद्दल आणि त्या अनुषंगाने ईशान्येकडील बंडखोरांच्या कारवाया, त्यांना मिळणारी मदत याबद्दल बरुआ काय बोलणार याची उत्सुकता होती याची कबुली लेखक देतो. सुरुवातीच्या काळात ‘उल्फा’च्या वरिष्ठ नेतृत्वाला नेमकी ‘चळवळ’ पुढे कशी न्यायची याचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे नसल्याने खीळ बसल्याचे बरुआचे म्हणणे आहे. बरुआने १९८० मध्ये एका उद्योजकाला आसामविरोधी ठरवून तिनसुखियामध्ये ठार केले. तिथून ‘उल्फा’चा झालेला उदय. बरुआची शालेय जीवनातील वाटचाल, आसाम फुटबॉल संघाकडून प्रतिनिधित्व, खेळाच्या जोरावर रेल्वे व तेल महामंडळाकडून आलेले नोकऱ्यांचे प्रस्ताव.. मात्र स्वतंत्र ‘क्रांतिकारी’ संघटना स्थापनेचे ध्येय असल्याने म्यानमारमधील एनएससीएन या संघटनेशी आलेल्या संपर्कातून पुढची वाटचाल.. या गोष्टी बरुआने उघड केल्या आहेत. कौटुंबिक जीवनाबाबतही बरुआ बोलतो, पण ‘पत्नी व दोन मुले शेजारील देशाच्या राजधानीत राहतात’ हे सांगताना देशाचे नाव सांगण्याचे टाळतो. मुलाखतीत गैरसोयीचा भाग बरुआने उघड केला नाही.
तरीही, या पुस्तकाच्या आणि बरुआच्या मुलाखतीच्या निमित्ताने ईशान्य भारतात चालणाऱ्या फुटीरतावादी चळवळींचे अंतरंग उघड होतात. तसेच म्यानमारचे भारताच्या दृष्टीने असणारे सामरिक महत्त्व अधोरेखित होते.
बंडखोरांना भेटण्याच्या उत्सुकतेपोटी हा केवळ साहसी प्रवास नाही तर त्यातून ईशान्येकडील भागातील जीवनपद्धती, देशाच्या मुख्य प्रवाहापासून विकास प्रक्रियेत स्थान नसलेले रहिवासी, मनोरंजनाची साधने तर सोडाच पण मूलभूत सुविधांनाही पारखे असलेले नागरिक, त्यातून फोफावणाऱ्या चळवळी याचा वेध या पुस्तकात आहे. अनेक वेळा उत्साहाच्या भरात लेखकाने खडतर प्रवास अतिरंजित करण्याचा प्रयत्न केला आहे. दौऱ्याच्या अग्निदिव्यातून परत आल्यावर गुप्तचर संस्थांचा चौकशीचा ससेमिरा, त्यातून कार्यालयीन सहकाऱ्यांकडून झालेला त्रास याचे तपशील आहेत. साहसी प्रवासवर्णनाबरोबरच ईशान्येकडील भागाचे समाजजीवनाचे अंतरंग, फुटीरतावादी चळवळी समजण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
हृषीकेश देशपांडे -hrishikesh.deshpande@expressindia.com
रांदेव्हू विथ रिबेल्स :
जर्नी टू मिट इंडियाज मोस्ट वाँटेड मेन
लेखक – राजीव भट्टाचार्य
प्रकाशक – हर्पर कॉलिन्स इंडिया.
पृष्ठे : किंमत – ३९९ रुपये