आवर्जून बघावे यापेक्षा, ठरवून बघू नये असेच जास्त काही २०१३ या वर्षांत होऊन गेले..अनेक पंत गेले आणि राव चढले. तेव्हा सरलेल्या वर्षांपेक्षा २०१४ हे वर्ष अधिक वाईट असणार नाही, एवढीच अपेक्षा ठेवलेली बरी..  

बघता बघता २०१३ ही संपले. बघता बघता.. ही आपली म्हणायची पद्धत. कारण खरे म्हणजे आवर्जून बघावे यापेक्षा ठरवून बघू नये असेच जास्त काही या वर्षांत होऊन गेले. मुळात १३ उजाडले तेच मुळी अंधारात. हा अंधार होता दिल्लीतल्या त्या अभागी तरुणीवर आलेल्या अघोरी प्रसंगाचा. त्या अंधाराचा चिकट गारवा इतका की देशातल्या प्रत्येक तरुणीला त्याचा अभद्र स्पर्श जाणवला आणि प्रत्येक तरुणीच्या पालकांच्या मनातील उजेड तो काही प्रमाणात कमी करून गेला. वर्षांची सुरुवातच अशी अंधारी झाली. अंधाराची ही एक अडचणच. तो हलतच नाही. सरकारी फायलींसारखा. ढिम्म बसून असतो. प्रकाशाचे तसे नाही. तो भराभरा पसरतो. अंधाराची दुसरी समस्या ही की त्यात हालचाली मंदावतात. आणि मुळात एखादा हालचालीत मंद असला तर तो पार गारठूनच जातो उजेडाच्या अभावामुळे. उदाहरणार्थ पंतप्रधान मनमोहन सिंग. हे वर्ष सुरू होतानाच ते मंदावलेले होते. धोरणलकवा बळावल्याची चिन्हे होती. त्यात या वर्षांच्या दुसऱ्याच महिन्यात ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातला कथित भ्रष्टाचार बाहेर आला आणि सरकारची हालचाल शून्याच्या अगदीच जवळ आली. दूरसंचार घोटाळा, कोळसा घोटाळा आणि त्यात आता हा हेलिकॉप्टर घोटाळा. तेव्हा मनमोहन सिंगांचे चाचपडणे या वर्षांत अधिकच वाढले. पुन्हा राहुलबाबा गांधींकडून मिळालेला प्रसाद. त्यामुळे त्यांच्या डोळय़ासमोरील अंधारी वाढलीच असणार. अंधारात असताना डोळय़ासमोर अंधारी येणे किती त्रासदायक. तो त्रास मनमोहन सिंगांना यंदा सहन करावा लागला. आपण ज्याच्या सहवासात असतो त्याच्या आयुष्यातील घडामोडींचा परिणाम आपल्याही आयुष्यावर होत असतो. पंतप्रधानांच्या कार्यालयात बराच काळ घालवलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना याचा अनुभव आला असेल. कारण मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे राहुलबाबामहाराजांचा प्रसाद त्यांनाही यंदाच्या वर्षांत खावा लागला. यातील योगायोगाचा भाग असा की राहुलबाबांच्या सहवासात असलेल्या काँग्रेसलाही या वर्षांने दणका दिला. चार राज्यांतल्या निवडणुकांत या पक्षाची होती नव्हती तीही गेली. तिकडे भाजपमध्येही काँग्रेसच्या मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे जुन्याजाणत्या लालकृष्ण अडवाणींना मानहानीस सामोरे जावे लागले. लालकृष्ण अडवाणी आणि मनमोहन सिंग यांच्या मानहानीतील साम्य हे की, दोघांनाही त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या भावी पंतप्रधानांनी ढुशा दिल्या. सिंग यांना राहुल गांधी भिडले तर अडवाणींना नरेंद्र मोदी. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड याच वर्षांने पाहिली. पंत गेले आणि राव चढले अशी म्हण आहे. परंतु भाजपच्या बाबत समस्या ही की पंतांना जायचे नव्हते आणि तरीही रावांना चढायचे होते. त्यामुळे अखेर भाजपच्या अडवाणी या पंतांस हाताला धरून बाजूला केले गेले आणि नरेंद्रराव मोदी चढले. बाकी पंत म्हणवून घेणाऱ्या सगळय़ांच्याच नशिबी अशी अवस्था येते की काय, न कळे. कारण भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे आद्य पंत मनोहरराव जोशी यांच्याबाबतही असेच घडले. त्यांच्या पक्षाच्या रावांनी या पंतांना हाताला धरून बाजूला केले. तेही याच वर्षांत. असो. परंतु बरे घडले ते आम आदमी नावाच्या पक्षात. भारतीयांच्या उत्थानासाठी कटिबद्ध असलेल्या, सदा उपोषणोत्सुक लोकपालकार अण्णा हजारे यांचे घटस्फोटित पट्टशिष्य अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन राजकीय सांडांना पाणी पाजले तेही याच वर्षांत. सामान्य माणसाला आनंद वाटावा अशी २०१३ सालात घडलेली ती एकच काय ती घटना. या दोघांना पाणी पाजण्याच्या आनंदाची परतफेड केजरीवाल यांनी मुख्यमंत्री झाल्यावर जनतेला मोफत पाणीपुरवठा करण्याच्या घोषणेने केली, तीही याच वर्षांत.
राजकीय आघाडय़ांवर तसे बरेच काही घडत असताना अर्थकारण मात्र यंदाच्या वर्षांत सुस्तच राहिले. उद्योगविश्वात घडलेली एकमेव घडामोड म्हणजे संन्यासाचा संन्यास घेऊन नारायण मूर्ती यांचे इन्फोसिसमध्ये परतणे. इन्फोसिसचा ढासळता डोलारा त्या कंपनीच्या जनकमंडळातील एक नारायण मूर्ती यांना पाहवला नाही. त्यामुळे निवृत्तीची शाल फेकून ते आपल्या मुलाला मदतीला घेऊन इन्फोसिसच्या बचावाला आले ते याच वर्षी. अर्थविश्वातल्या यंदाच्या वर्षांतल्या आणखी एका घडामोडीची दखल सर्वानीच घेतली. ही घटना म्हणजे रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन यांची नियुक्ती. आतापर्यंतच्या थकल्याभागल्या गव्हर्नरांच्या तुलनेत हा तुलनेने तरणाबांड, पाहायलाही बरा वाटावा असा गव्हर्नर नेमला गेल्याने किंमत नाही तरी रुपयाच्या रूपात नक्कीच फरक पडला. एरवी डॉलरच्या तुलनेत कायम मान खाली घालून, खांदे पाडून वावरणाऱ्या रुपयाचा कणा रघुराम राजन आल्याने किंचितसा सरळ झाला असावा. या रुपयाचे लक्ष असणार आहे ते आजपासून सुरू होणाऱ्या २०१४ सालाकडे. हे वर्ष जगाला नवे चेहरे देणारे. ब्राझील, इंडोनेशिया आदी अनेक देशांत यंदा निवडणुकांचे वारे वाहू लागतील. जगातली जवळपास ४० टक्के जनता कोणत्या ना कोणत्या कारणासाठी यंदाच्या वर्षांत मतदान करेल. या मतदात्यांना साथ असेल ती भारताची. आजपासून सुरू होणारे २०१४ साल अर्धे संपायच्या आत देशाला नवा पंतप्रधान मिळालेला असेल आणि त्यानंतर हे वर्ष जेव्हा दोनतृतीयांश संपलेले असेल त्या वेळी महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री. तेव्हा आगामी वर्ष हे बदलाचे असेल यात शंका नाही. या बदलाचे सावट रुपयावर असल्याचा इशारा रघुराम राजन यांनी २०१३ संपता संपता दिला आहेच.    
त्यांच्या इशाऱ्यात आशावाद आहे. परंतु वर्षांच्या अखेरच्या दिवशी मिळालेला अन्य एक इशारा मात्र आपल्या सर्वानाच करुण करणारा आहे. आगामी काळात निवृत्तांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढेल आणि हे वाढते निवृत्त आणि घसरते उत्पन्न यामुळे जगणे अधिकाधिक महाग होत जाईल असे वॉशिंग्टन येथील सेंटर फॉर स्टट्रेजिक अ‍ॅण्ड इंटरनॅशनल स्टडीज या संस्थेने म्हटले आहे. याचा परिणाम म्हणून जगात अनेकानेक देशांना निवृत्तांना दिल्या जाणाऱ्या सवलती देणे परवडणार नाही आणि त्यामुळे निवृत्तीचे वय अधिकाधिक वाढवण्याकडेच त्यांचा कल राहील. अनेक देशांत सध्या जननक्षमता घटलेली आहे. कष्ट करणारे हात वृद्ध होत आहेत आणि त्या प्रमाणात त्यांची जागा घेणारे तरुण येताना दिसत नाहीत. अशा वेळी निवृत्तीचे वय वाढवण्याखेरीज अनेक विकसनशील देशांना दुसरा पर्याय राहणार नाही. ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक को-ऑपरेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, म्हणजे ओईसीडी, या आदरणीय संस्थेने या अहवालावर प्रतिक्रिया करताना सुचवलेला पर्याय म्हणजे निवृत्तीचे वय ६७ पर्यंत वाढवणे. हे विकसित देशांपुरते ठीक. पण हा सल्ला ऐकायचा तर आपल्यासारख्यांची पंचाईतच. कारण नव्या नोकऱ्या तयार होणार नाहीत आणि नोकऱ्यांत आहेत ते निवृत्त होणार नाहीत.
२०१४ ची सुरुवात होते आहे ती या पाश्र्वभूमीवर. तेव्हा या वर्षांकडून फार अपेक्षा ठेवायला नकोत. अपेक्षा मोठय़ा असल्या की अपेक्षाभंगाचे दु:खही मोठे असते. ते टाळायला हवे. अपेक्षा करू या ती इतकीच. ती म्हणजे हे वर्ष सरलेल्या वर्षांपेक्षा अधिक वाईट असणार नाही. २०१३स निरोप देताना हाती आहेत त्या काही कळय़ा आणि थोडी ओली पाने.. १४ ला निरोप देताना तरी म्हणता यायला हवे, गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे.