भारतीय प्रजासत्ताकाचा तात्त्विक आधार कोणता? हे प्रजासत्ताक ज्या ‘राष्ट्रा’चे आहे, त्या अवघ्या राष्ट्राला व्यापणाऱ्या वैचारिक परंपरा कोणत्या? राजकारणबाह्य अभ्यास, लिखाण वा कलाकृती यांतून राजकीय विचार स्वातंत्र्यपूर्व काळात कसा झाला? असे प्रश्न केंद्रस्थानी मानून अनन्या वाजपेयी यांनी ‘राइटेयस रिपब्लिक- द पोलिटिकल फाऊंडेशन्स ऑफ मॉडर्न इंडिया’ हे पुस्तक सिद्ध केले आहे. प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना या पुस्तकाचा परिचय करून घेणे उचित ठरावे.
sam07दीर्घ प्रस्तावनेत वाजपेयी यांनी, या पुस्तकात निवडलेले वेचे हे एका राष्ट्राचा आत्मशोध असल्याचे प्रतिपादन केले आहे. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध ते विशाव्या शतकाचा पूर्वार्ध या काळात  स्वराज्य मिळवणे या ध्येयाने प्ररित होऊन त्यावेळची पिढी समर्पित भावनेने कामाला लागली होती. स्वराज्य या संस्कृतप्रचुर शब्दात स्व आणि राज अशा दोन शब्दांचा मिलाफ आहे. ब्रिटिशांची राजवट झुगारून एतद्देशीयांचे राज्य प्रस्थापित करणे, असा त्याचा सामान्यपणे अर्थ गृहित धरला जातो. स्वत:चे स्वत:वर राज्य. यातील राज्य या भागाचा अर्थ बराचसा स्पष्ट होता .. राजकीय स्वतंत्रता. पण स्व म्हमजे नेमके काय? एकाच वेळी स्व हा राज्य करणारा आणि ज्याच्यावर राज्य केले जाणार असा दोन्ही भूमिकांत असेल. स्वराज मधील स्व म्हणजे नेमके काय? त्यात स्वदेश असा विचार केल्यास देशाच्या भौगोलिक सीमा, पर्वतरांगा, नद्यानाले, जंगले इतकाच विचार करायचा की इथले विविध परांपरांनी, भाषांनी, वेशभूषेने नटलेले लोकही त्यात समाविष्ट करायचे?
भारताच्या बाबतीत ‘स्व’ म्हणजे काय, एक राष्ट्र म्हणून आपली नेमकी ओळख काय, हा प्रश्न स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनाही पडला होता. त्यांचाही याबाबत संभ्रम होता. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेकांनी भारताच्या भूतकाळात डोकावून पाहिले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात हे नेमकेपणाने मांडले आहे.. भारतासारखा वैभवशाली आणि समम्द्ध परंपरा असलेला एका दूरवरच्या लहानशा बेटाएवढय़ा देशाच्या गुलामगिरीत खितपत पडून दारिद्रय़ात पिचत आहे, याने मी अस्वस्थ झालो. त्याने मी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय झालो. पम हा भारत म्हणजे नेमके काय? त्याचा असा अचानक शक्तिपात का झाला? भविष्यात भारत जगातील विविध देशांशी सहकार्याचे संबंध ठेवून संपन्न होईल, हे माझे स्वप्न होते. त्यासाठी मी वर्तमानात झगडत होतो. पण त्याआधी भारताचा प्रदीर्घ आणि गुंतागुंतीचा भूतकाळ होता आणि त्याकडेच मी उत्तर शोधण्यासाठी वळालो.  नेहरूंप्रमाणे अनेक अन्य नेत्यांनीही या प्रश्नाची उकल करम्यासाठी तोच मार्ग निवडला. आपल्या भूतकाळात संस्कृत ज्ञान, विज्ञान आणि परंपरा यांचा समावेश होता. त्यापैकी संस्कृत ज्ञान आणि विज्ञान भारताच्या वसाहतीकरणानंतर पाश्चिमात्य प्रभावामुळे बरेचसे लोप पावले होते. आधार होता तो परंपरांचा. आणि त्याही बराचशा प्राचीन साहित्य आणि कलाकृतींच्या माध्यमातून शिल्लक होत्या.
त्या काळचे स्वातंत्र्यसंग्रामात अग्रणी असलेले अनेक नेते तत्कालीन प्रस्थापित उच्चभ्रू समाजातून आले होते आणि त्याचे शिक्षण इंग्लंड- अमेरिकेतील विद्यापीठांतून झाले होते. असा आंग्लाळलेल्या नेत्यांना भारताच्या स्वत्वाचा शोध घेण्यासाठी पुन्हा भारतीय परंपरांकडे वळावे लागले. त्यातूनच बंकिमचंद्र, टिळक, योगी अरविंद, गांधी, विवेकानंद, सावरकर, आंबेडकर आदींनी गीता आणि अन्य भारतीय ग्रंथांचे, परंपरांचे, साहित्य-कलाकृतींचे नव्याने रसग्रहण करून फेरमांडणी केली. त्यांच्या या अभ्यासातून, चिंतनातून जी विचारधारा पुढे आली तिने बऱ्याच अंशी भारतीय प्रजासत्ताकाच्या स्थापनेपूर्वी राजकीय विचारांची पायाभरणी केली.
असे प्रयत्न अनेकांनी केले असले तरी लेखिकेने त्या प्रभावळीतून महात्मा गांधी, रविंद्रनाथ टागोर, त्यांचे पुतणे अवनींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांची निवड केली आहे. गांधींनी केलेल्या भगवद्गीतेच्या अभ्यासातून त्यांचे अहिंसेचे तत्वज्ञान साकारले. त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हिंसात्मक मार्गाला नकार दिला. रवींद्रनाथांना कालिदासाच्या मेघदूताने, त्याच्या भौगोलिक पसऱ्याने भुरळ घातली. त्यातून त्यांनी संकुचित राष्ट्रवाद नाकारून विश्वबंधुतेला प्राधान्य दिले. नेहरूंनी मौर्यकालीन शिलालेख आणि कोटिल्याच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करून वास्तववादी धर्म आणि मानवी मूल्यांच्या साकारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या अर्थ या संकल्पनांवर भर दिला. अवनींद्रनाथांना मुघल काळातील भारतीय लघुचित्रांनी आकर्षित केले, त्यातून स्तिमित होऊन त्यांना संवेग ही भावना उमगली आणि त्यांनी शाहजहानच्या ताजमहालाची कल्पना करताना, उभारणी करताना आणि मरणकाळात ताजमहाल न्याहाळतानाची जी तीन चित्रे रंगवली त्या चित्रणाच्या शैलीतून भारतीय आधुनिक कलाशैलीचा पाया घातला गेला. बुद्धतत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून डॉ. आंबेडकरांना दु:ख ही भावना प्रकर्षांने जाणवली, त्यातूनच त्यांनी दुर्लक्षिलेल्या देशवासियांच्या न्यायिक व सामाजिक उन्नयनाचा मार्ग चोखाळला. या पाच जणांच्या संकल्पना भारताच्या एकत्रित अस्मितांची चौकट विशद करणाऱ्या आहेत, तसेच आधुनिक भारतीय प्रजासत्ताकाची पायाभरणी यात दिसते.
अवनींद्रनाथांच्या ‘मरणकाळात ताजमहाल न्याहाळणारा शाहजहान’ चित्राला ब्रिटिशांनी १९०३ साली भरवलेल्या दिल्ली दरबारमध्ये रौप्यपदक बहाल केले होते. काही भारतीय विचारवंतांना वाटते की ब्रिटिशांना त्या चित्राचा खरा अर्थच कळला नव्हता. त्यातील शाहजहान किंवा ताजमहाल ही केवळ प्रतिके होती. सर्वशक्तिमान मुघल बादशहादेखिल अखेर निसर्गापुढे हतबल ठरला. सत्ता किंवा सौदर्य हे अबाधित नाही, हेच त्यातून सुचवायचे होते. आजच्या संदर्भातही हा संदेश चपखल बसतो आणि त्यातूनच पुस्तकाचे महत्त्व किंवा आजच्या काळातील प्रस्तुतता अधोरेखित होते.
राइटेयस रिपब्लिक : द पोलिटिकल फाउंडेशन्स ऑफ मॉडर्न इंडिया
– अनन्या वाजपेयी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस,
पृष्ठे : ३४२; किंमत : ४९५ रु.