अमेरिकेतील एका प्रांतातील एका शहराच्या एका उपनगरातील छोटीशी दंगल आणि लुटालूट ही तसे पाहिल्यास फार दखलपात्र घटना आहे अशातला भाग नाही. गेल्या शनिवारी अमेरिकेतील मिसुरी राज्यातील फर्गसन शहरात पोलिसांनी एका १८ वर्षांच्या मुलाला गोळी घालून ठार मारले. पोलिसांचे म्हणणे असे की, तो मुलगा गुंड होता. त्याने पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या अधिकाऱ्याने त्याला गोळ्या घातल्या. त्यात तो मेला. हा मुलगा कृष्णवर्णीय होता. त्यामुळे तेथे दंगल पेटली. अनेक कृष्णवर्णीय नागरिक रस्त्यांवर उतरले. पोलिसांवर त्यांचा राग होता. तो त्यांनी सार्वजनिक मालमत्तेवर काढला. जगभरात पोलीस कारवाईपासून अपघातांपर्यंतच्या अनेक घटनांमध्ये अशा प्रतिक्रिया उमटताना दिसतात. त्यावर त्या-त्या काळापुरती चर्चा होते आणि नंतर लोक त्या विसरून जातात. अशा घटनांचे विस्मरण ही समाजाची अंगभूत पलायनवादी यंत्रणा आहे. वस्तुत: अशा घटनांनंतरच्या प्रतिक्रिया या त्या घटनेबद्दलच्या तत्कालिक संतापातून आल्याचे दिसत असले तरी मुळात तसे नसते. या प्रतिक्रिया म्हणजे विशिष्ट समाजाच्या वा गटाच्या मनातली खदखद असते. ती खदखद रास्त असते की कोणी जाणीवपूर्वक पेटविलेली असते हा भाग वेगळा. पण ती लक्षात घेतली तरच दंगलीच्या आजारामागची खरी कारणमीमांसा करणे शक्य होईल. दंगली कुठल्याही असोत  त्यांमागचे मानसशास्त्र सारखेच असते. यांपैकी अमेरिकेतील या दंगलीच्या घटनेकडे दुरून, म्हणून तटस्थपणे पाहता येते. या आणि या आधीच्याही अशा अनेक प्रकरणांतून आपल्यासमोर एक महत्त्वाची गोष्ट आली आहे. ती म्हणजे देशातील समृद्धीचा, वाढत्या राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाचा त्या देशातील अनेक रहिवाशांच्या सामाजिक संघर्षांशी काहीही संबंध नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आकडेवारी कधीही समाजाचे नेमके चित्र दाखवू शकत नाही. विकासाला मानवी चेहरा हवा असे जे म्हटले जाते त्याचे कारण हे. अमेरिकेच्या चकचकीत विकासाच्या पोटात न पचलेल्या अन्नासारख्या दरिद्री वस्त्याही आहेत. आज अमेरिकेत कृष्णवर्णीयांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या सुमारे १३ टक्के आहे. त्यातील बहुसंख्य लोक हे आजही ‘नाही रे’ वर्गात आहेत, हे अमेरिकी सरकारच्याच आकडेवाऱ्यांवरून वारंवार सिद्ध झालेले आहे. बराक ओबामा यांच्यासारखा, वर्णीय वेगळेपणाने त्या देशात उठून दिसणारा नेता राष्ट्राध्यक्ष होणे ही या वर्गासाठी अभिमानाची बाब. ओबामांच्या विजयाने त्यांच्या मनातल्या आशेच्या पणत्यांची पात निश्चितच झळाळून उठली. त्याला पाच-सहा वर्षे झाली. पण ओबामा आले म्हणून तेथील वर्णद्वेष संपला असे झालेले नाही. दुसरीकडे मधल्या जागतिक आर्थिक मंदीने सर्वात मोठा फटका बसला तो या वर्गालाच. त्या साठून राहिलेल्या निराशेचा उद्रेक म्हणून फर्गसनमधील त्या दंगलीकडे पाहावे लागेल. गेल्या काही वर्षांत फ्रान्स, जर्मनीमध्येही अशाच प्रकारच्या दंगली झाल्या आहेत. त्यात स्थानिक, राजकीय अशी विविध कारणे दिसली, तरी मूलत: तो समाजातील सर्वहारा घटकाच्या खदखदीचा परिणाम होता. आर्थिक विकासाच्या गाडीबाहेरचा वा अजूनही गाडीच्या दारातच लोंबकळणाऱ्या या वर्गाला भाषिक, धार्मिक, वांशिक अस्मितांची झेंगटे अधिक भावतात. त्यावरून भडकणे हा त्या वर्गाच्या जणू अवसरविनोदनाचा भाग असतो. दंगली वा लुटालुटीमागची ही मानसिकता समजून घेतली की अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना नेमके खुपते काय हे लगेच लक्षात येते. त्यासाठी मग कुठल्याही एफबीआय चौकशीची गरज नसते. खरे तर हे दुखणे आणि त्यावरचा इलाज कुणाला माहीत नाही, असे नाही.. प्रश्न असतो तो फक्त तो इलाज करण्याचा.