पावसला प्रथमच आलेले पांडे, काणे आणि गांधी या तिघांना स्वामींच्या सांगण्यावरून उतरवून घ्यायला साधक आले होतेच, पण स्वामींची प्रथम भेट होताच त्यांनीही पूर्वपरिचय नसताना प्रत्येकाकडे पाहात त्याचेच नाव उच्चारत प्रसादही दिला होता! स्वामी विद्यानंद यांची ही आठवण ‘अनंत आठवणीतले अनंत निवास’ पुस्तकात ग्रथित आहे. आता हे कर्म विशेषच आहे आणि त्याचा अमीट प्रभाव या तिघांच्या मनावर पडला. स्वामी अनंत लोकांसाठी किती अनंत कामं करीत ते प्रमोद कुलकर्णी यांनी लिहिलं आहे. त्यानुसार, ‘‘दर्शनार्थी कोणी गरीब बाई असेल तर तिची बोळवण करताना साडीसाठी तिला पैसे द्यायचे. लहान मुलांच्या हातात खाऊसाठी पैसे ठेवायचे. विद्यार्थ्यांना शिक्षणखर्चासाठी मनीऑर्डर करणे हा तर त्यांचा नित्यक्रम होता. वय झालेले व ज्यांना सांभाळणारे कुणी नाही अशा वृद्धांना ते नियमित मदत करीत.’’ (स्मृतिसौरभ, पृ. ९९). आता हे सारं काही आत्मप्रेरणेच्या आधारे चाले. अर्ज-विनंत्यांचा रूक्ष प्रकार यात नव्हता, तर आंतरिक आर्ततेचं आर्जव फक्त असे. शोभना रानडे यांची आठवणच पहा- बाळंतीण होऊन घरी आले. त्यावेळेला मुलगी झाली, तीही गेली. जवळ पैसाही नाही. सगळीकडे भकास वाटू लागलं. तोच डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती दिसली. फोटोसमोर उभं राहून सद्गदित कंठानं सांगितलं, ‘‘आता सांभाळणारे तुम्हीच आहात.’’ चारच दिवसांनी शंभर रुपयांची मनीऑर्डर आली. तेव्हा अवाक्  होऊन मी पोस्टमनला विचारले की, ‘‘मनीऑर्डर कोणाची?’’ कारण मला कल्पना होती की आत्ता पैसे पाठवणारं कोणी नाही. तेव्हा पोस्टमननं सांगितलं की, ‘‘पावसच्या स्वरूपानंद स्वामींनी पैसे पाठवले आहेत.’’ हे ऐकून हृदय भरून आलं. मागोमागच स्वामींचं पत्रही मिळालं. त्यात लिहिलं होतं, ‘‘दु:खामागून सुख। सुखामागून दु:ख।। असं संसाराचं रहाटगाडगं चालूच राहाणार. आपण आपलं मन शांत ठेवावं!’’ आणि खरंच पत्र वाचून मन शांत झालं. (स्मृतिसौरभ, पृ. १३१). याच पुस्तकात कुर्णे येथील मीरा पंडित यांचाही लेख आहे. त्यावेळी पावसला जायचं एसटीचं भाडं पाच रुपये होतं. तेवढेही पैसे त्यांच्याकडे नव्हते आणि जन्मोत्सव जवळ आलेला. त्यांचं मन फार कष्ष्टी झालं आणि उत्सवास येण्यासाठी म्हणून स्वामींची पंधरा रुपयांची मनीऑर्डर आली! (पृ. ६६). कुणा मुलाला ‘ढ’ ठरवल्याने त्याच्या गावातील शाळेची दारं बंदं झाली असतील तर त्याला आश्रय देऊन पावसच्या शाळेत प्रवेश द्यावा, दक्षिणेश्वरी चाललेल्या भक्ताला खडीसाखरेची पुडी रामकृष्णांसाठी म्हणून द्यावी आणि तेथील पुजाऱ्यानं मिठायांनी भरलेल्या ताटांतून नेमकी ती छोटीशी पुडीच उचलावी, दर्शनाला आलेल्या तरुणाला स्वामींचा एखादा ग्रंथ घ्यायची इच्छा व्हावी पण पैशाअभावी ती मनातच ठेवावी अन् निघताना स्वामींनी तोच ग्रंथ प्रसादभेट म्हणून द्यावा, अशा अनेक घटना स्वामीभक्तांनी ग्रथित केल्या आहेत. ज्या वरकरणी साध्या भासतील, पण त्या ज्याच्या बाबतीत घडल्या त्याला त्यांचं मोल फार आहे. कारण त्या प्रसंगांनीच त्यांचं भावजीवन संस्कारित झालं आहे.