या पुस्तकातील सहा बनिया नायकांनी  धंदा-व्यवसायात नाव कमावणे नवलाईचे ते काय, असा साहजिकच प्रश्न पुढे येतो. वास्तविक या मंडळींनी त्यांच्याशी निगडित  पूर्वापार विशेषाला नाकारत नवीन मार्ग चोखाळताना केलेला प्रवास हा अतुलनीय आणि सामान्यांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. त्यांना बनिया संबोधून एका चौकटीत बंदिस्त करणे हा लेखक-प्रकाशकांकडून त्यांच्यावर झालेला अन्यायच आहे.

पसा कमावणे ही क्रिया झाली, पण नफा म्हणजे रोकडा बनविणे हे एक कसब आहे. हे कसब मारवडय़ांच्या रक्तातच असते असे बोलले जाते. त्यांचे कर्म अर्थात ते जीवितासाठी करीत असणारा धंदा-व्यवसाय हीच आपल्याकडे पूर्वापार त्यांच्या जात-पंथांची ओळख बनली आहे. व्यापार, सावकारी करणारी जमात म्हणजे मारवाडीच अशी आपली लगेच धारणा बनते. वास्तविक मारवाडी, बनिया ही जातिवाचक नामे आहेत, पण आज आपल्या नकळत रुळलेली ती त्यांची कर्म विशेषणे बनली आहेत. भारताचे हे पूर्वापार वास्तव आजच्या जागतिकीकरणाच्या युगातही ते कमी-अधिक प्रमाणात टिकून आहे, असा ‘‘रोकडा – हाऊ बनियाज् डू बिझनेस’’ हे निखिल इनामदारलिखित पुस्तक भासवू पाहते. शोभा बोंद्रे यांच्या ‘‘धंदा – हाऊ गुजरातीज् डू बिझनेस’’ या रँडम हाऊस इंडियाने दीडेक वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या मालिकेतील हे दुसरे पुस्तक आहे. पण त्या पुस्तकाप्रमाणे प्रस्तुत ‘रोकडा’तून मारवाडय़ांचे जन्मजात उद्यमी कसब, पिढीजात वारशाचे योगदान, व्यवसायविस्तार ते वित्त अशा आव्हानांप्रसंगी नवउद्योजकाला मारवाडी-माहेश्वरी समाजाचे एक मजबूत नेटवर्क कसे कामी येते वगरे पुस्तकाच्या शीर्षकानुरूप वाचकांच्या तयार होणाऱ्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत.
तरी ‘रोकडा’ हे देशातील पाच अनोख्या उद्यम यशोगाथा सादर करते असे निश्चितच म्हणावे लागेल. सामोरी आलेली आव्हाने, प्रतिकूलतेलाच सामथ्र्य बनवून सफलतेची एक एक पायरी चढत अजोड नाव कमावलेले सहा उद्योजक या पुस्तकाचे नायक आहेत. त्यात ‘इमामी’चे जनक राधेश्याम (अगरवाल आणि गोएंका) जोडगोळी आहे; मुंबईला शांघाय-सिंगापूर बनविण्याच्या स्वप्नचित्रातील एक महत्त्वाची रंगरेषा बनलेली ‘मेरू कॅब’ ही फ्लीट टॅक्सी सेवा साकारणारे नीरज गुप्ता आहेत; राजस्थानच्या कोटा शहराला देशाच्या शैक्षणिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून देणारे बन्सल क्लासेसचे विनोद कुमार बन्सल यांचा परिचयही हे पुस्तक आपल्याला करून देते. तर इनमीन तीन-चार ठिकाणांपुरते सीमित असलेल्या शहरीकरणाच्या काळात आधुनिक स्वच्छता उपकरणाची कास धरणारे िहदवेअरचे निर्माते आर. के. सोमाणी आणि अल्पावधीत उद्योगजगतात कोलाहल निर्माण करेल असा आधुनिक माहिती-तंत्रज्ञानाधारित ई-पेठेचा दबदबा निर्माण करणारे ‘स्नॅपडील’चे सहसंस्थापक रोहित बन्सल हे या गाथेतील नायक बनून आपल्यासमोर येतात. या सर्व मंडळींना एका माळेत गुंफणारे वैशिष्टय़ पुस्तकाचे शीर्षक सुचविते, त्याप्रमाणे ते सारे बनिया आहेत.
या सर्व मंडळींनी त्यांच्या त्यांच्या काळाच्या पुढचा, तोवर अकल्पित असलेला विचार केला आणि त्यावर उद्योग उभारण्याची कडवी जिद्द दाखविली. हाच खरे तर या प्रत्येकातील विशेष गुण त्यांना एका पंक्तीत सामावून घेणारा आहे. तसे पाहता आज भारताच्या उद्योगपटलावरील जी बडी नावे चटकन तोंडावर येतात, त्यातील बहुतांश बनियाच निघतील. आज हरएक उद्योगक्षेत्रात त्यांचा वावर फैलावला आहे आणि केवळ मध्य व उत्तर भारतच नव्हे तर आसेतुहिमाचल अगदी देशाच्या दक्षिणी टोकापर्यंत त्यांच्या व्यवसायकक्षा रुंदावल्या आहेत. या पुस्तकातील सहा बनिया नायकांनी म्हणूनच धंदा-व्यवसायात नाव कमावणे नवलाईचे ते काय, असा साहजिकच प्रश्न पुढे येतो. वास्तविक या मंडळींनी त्यांच्याशी निगडित या पूर्वापार विशेषाला नाकारत नवीन मार्ग चोखाळणारा केलेला प्रवास हा अतुलनीय आणि सामान्यांसाठी खूपच प्रेरणादायी आहे, त्यांना बनिया संबोधून एका चौकटीत बंदिस्त करणे हा लेखक-प्रकाशकांकडून त्यांच्यावर झालेला अन्यायच आहे.
काही तरी हटके करण्याच्या ध्यासातून यशस्वी उद्योगाचा वटवृक्ष कसा फुलतो असा बराच ऐवज पुस्तकातील पाचही गाथांमधून समोर येतो. मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सीची जागा जवळपास तेवढेच भाडे असणाऱ्या पण वातानुकूलित मोटारी घेऊ शकतील, अशी कल्पनाही जेव्हा कुणी केली नव्हती तेव्हा मेरू कॅबचा जन्म झाला. ज्या देशात रुपेरी पडद्यावरील नायक-नायिकांसारख्या रंगरूपाचे अनुकरण करीत पिढीच्या पिढी वाढत असताना, तेथे कोल्ड क्रीम, व्हॅनििशग क्रीम, टाल्कम पावडरसारखी सौंदर्यवर्धक उत्पादने विदेशातून आयात व्हावीत आणि त्यावरील प्रचंड १५० टक्के करभारामुळे ग्राहकांना ती दीड-दोन पट महागाने खरेदी करावी लागावीत हे अजबच होते. राधेश्याम अगरवाल आणि राधेश्याम गोएंका यांनी यात दडलेली सुप्त संधी हेरली आणि इमामीचा थाट साकारला. स्नॅपडीलचे बन्सल यांनी त्यांचे पूर्वज करीत आलेल्या दुकानदारी, किराणा व्यापाराची पारंपरिक घडीच विस्कटून टाकणाऱ्या ई-व्यापाराचा चंग बांधला आणि तो अल्पकाळात दणदणीत यशस्वीही करून दाखविला. पेशाने इंजिनीअर असलेले व्ही के बन्सल असाध्य स्नायू विकाराने नाइलाजाने व्हीलचेअरवर खिळवले गेले आणि देशाला यंत्रगती देणाऱ्या आयआयटीयन्स घडविणाऱ्या बन्सल क्लासेस नामक कारखान्याचा जन्म झाला.
कोणताही धंदा म्हटले की भांडवल हे महत्त्वाचेच. पशांच्या पाठबळानेच यशस्वी उद्योग उभारता येतो हा एक गरसमज असल्याचे लेखक जाणीवपूर्वक भासविण्याचा प्रयत्न करतात. ‘रोकडा’चे सर्व सहा नायक हे व्यापारी कुटुंबाची पाश्र्वभूमी असलेले आहेत. तरी प्रारंभिक उमेदीच्या काळात प्रत्येकाला पशाच्या अभावाने ग्रासले असे दाखविणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यातील घटनांची लेखकाने खास वर्णने केली आहेत. राधेश्याम जोडगोळीला केमको केमिकल्स (जिचे पुढे इमामी नामांतर झाले.) स्थापनेच्या प्रसंगी गोएंका यांच्या वडिलांनी २० हजारांचे बीज भांडवल पुरवले. पुढे कंपनीवरील आíथक मळभ दूर करण्यासाठी आणखी एक लाखाची मदत सढळ हस्ते दिली. साठीच्या दशकात २० हजार आणि एक लाख या रकमा कमी निश्चितच नव्हत्या. अगदी याच काळात अवघे १५ हजार रुपये गाठीशी असणाऱ्या धीरूभाईंनी दुनिया मुठ्ठी में करण्याइतपत महत्त्वाकांक्षेची पायाभरणी करणारी मजल मारली होती, याचे लेखकाला विस्मरण झालेले दिसते. मेरू कॅब काय किंवा स्नॅपडील काय पशाची ददात कुणालाही नव्हती. दोहोंना खासगी व साहस भांडवलाचे मिळालेले पाठबळ पाहता, त्यांच्या प्रवर्तकाच्या यशापेक्षा या नव्या भांडवली स्रोतांची यशसिद्धी मोठी ठरते. उद्योग आपला, पसा दुसऱ्याचा –  साहस भांडवल किंवा प्रायव्हेट इक्विटीच्या या संकल्पनेच्या भारताच्या उद्योगक्षेत्रात फलद्रूप रुजुवातीची ही दोन प्रमुख उदाहरणे नक्कीच म्हणता येतील.
पुस्तकाचे शीर्षक सुचवते त्याप्रमाणे लेखकाने उद्यमपट सादर केलेल्या सहांपकी कोणीही त्यांच्या यशोगाथेत जातिप्रधान मूल्यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल बोलताना दिसत नाही. प्रतिकूलतेवर मात, अभावग्रस्तता हाच जगाच्या पाठीवर दिसणारा उद्योगधंद्याच्या सफल उभारणीचा परिपाठ या प्रत्येकाबाबतीत दिसून येतो. म्हणूनच शीर्षक काहीही सुचवीत असले तरी या कथांकडे बनियांच्याच पण जन्मजाताच्या बंधांना झुगारणाऱ्या अ‘बनिया’ व्यापारगाथा म्हणूनच पाहिले पाहिजे.
                 
‘रोकडा – हाऊ बनियाज् डू बिझनेस’
ले. निखिल इनामदार
प्रकाशक- रँडम हाऊस इंडिया
पृ. २४०, किंमत – १९९ रुपये