२८ जून १९६९. अमेरिकेतील न्यू यॉर्कमधील ग्रीनविच व्हिलेजमधील स्टोनवॉल इन या बारवर त्या दिवशी पोलिसांचा छापा पडला होता. हा बार माफियांचा. तेथे चोरटी दारू, अमली पदार्थ विकले जात. त्यामुळे छापे हे नेहमीचेच असत. त्यात काहीही विशेष नव्हते. कारण हे छापे कधी पडणार हे बारचालकाला आधीच समजलेले असे. पण विशेष होते ते त्या बारच्या गिऱ्हाइकांमध्ये. समिलगी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये हा बार विशेष लोकप्रिय होता. त्या दिवशीचा छापा अगदी अचानक पडल्याने अशा अनेक व्यक्ती तेथे होत्या. पोलिसांनी त्यांना पकडले. प्रकरण हातघाईवर गेले अन् त्यातून दंगल पेटली. हळूहळू ती अन्यत्र पसरली. या घटनेने अमेरिकेतील समिलगींच्या मानवी हक्क लढय़ाला नवे वळण दिले. त्या संघर्षांला ४७ वष्रे होत असताना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी समिलगी व्यक्तींच्या विवाहास कायदेशीर मान्यता दिली. मानवाधिकार चळवळीच्या इतिहासात हा निकाल सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल असे म्हणणे हे खरे तर खूपच अलंकारिक आहे, परंतु समिलगींना निसर्गाच्या करणीमुळे सोसावा लागत असलेला सामाजिक अन्याय, पदोपदी झेलावे लागत असलेले मानसिक आघात आणि सामाजिक व धार्मिक दडपणाने झुकलेल्या कायद्याचे प्रहार हे सर्व पाहता हा त्यांच्या मुक्तीलढय़ातील प्रचंड मोठा विजयच आहे हे मान्य करावेच लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये समिलगी विवाहास कायदेशीर दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापासून असंख्य सर्वसामान्य नागरिकांकडून या संवेदनशील निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
या निर्णयानंतर अमेरिकेत उमटलेल्या प्रतिक्रिया या तेथील सामाजिक व सांस्कृतिक बदलांचेच द्योतक होत्या. सर्वच धर्म हे मागे पाहात चालणारे असल्यामुळे कट्टर धार्मिकांना हा निर्णय मान्य होणे कठीणच होते. इव्हेंजेलिकल ख्रिश्चनांवर तर आता या विश्वातील नतिकता रक्षणाचेच दैवी काम आलेले आहे. त्यांना न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे ईश्वरी आज्ञेतील हस्तक्षेप वाटत आहे. बॉबी जिंदाल हे सध्या या पंथाचे कैवारी बनले आहेत. ते मूळचे िहदू. नंतर त्यांनी इव्हेंजेलिकल ख्रिस्ती धर्म स्वीकारला व ते आता रिपब्लिकन पक्षाकडून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू इच्छित आहेत. त्यांनी हा निर्णय देणारे सर्वोच्च न्यायालयच बरखास्त करावे अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अर्थ सरळ आहे. समिलगींचा संघर्ष अजून संपलेला नाही. भारताने तर या बाबतीत पाकिस्तान व सौदी अरेबिया यांसारख्या सनातनी कट्टरपंथी देशांचीच कास धरली असल्याने येथे समलंगिकता हाच गुन्हा आहे. अमेरिकेतील िहदूंची भूमिका मात्र प्रागतिक आहे. तेथील ५५ टक्के िहदूंचा समिलगी विवाहास पािठबा असून, िहदू अमेरिकन फाउंडेशनने पत्रक काढून या निर्णयाचे स्वागत केले आहे. मनोवृत्तीतील हा बदलही न्यायालयाच्या त्या निर्णयाइतकाच स्वागतार्ह आहे. ४७ वर्षांच्या लढय़ानंतर कायद्याने नांदा सौख्य भरे असा आशीर्वाद दिला आहे हे त्या लढय़ाला आलेले फळही काही कमी कौतुकास्पद नाही.