संस्कृतमध्ये गीताभाष्य लिहिणाऱ्या शंकराचार्यासह सर्व आचार्यानी ‘पापयोनी’ शब्दाला स्त्रिया, वैश्य आणि शूद्र यांचे विशेषण मानले. पण त्यामुळे स्त्रिया, वैश्य आणि शूद्र हे समूह पापयोनी ठरले. त्यांची उत्पत्ती पापातून झाली असे निष्पन्न झाले. ज्ञानेश्वरांनी या पारंपरिक अर्थाला आव्हान दिले. त्यासाठी त्यांना श्लोकाचा अन्वय बदलावा लागला.
मराठीच काय, परंतु कोणत्याही समाजाच्या स्थितिगतीची चर्चा करताना स्त्रियांच्या संदर्भात स्वतंत्रपणे विचार करावा लागतो, याविषयी कोणाचे दुमत होणार नाही. अपवाद वगळता जगभरच्या मानवसमूहांमध्ये पुरुषी वर्चस्व असून स्त्रियांना दुय्यमच लेखले गेले आहे. काही मानवशास्त्रज्ञ म्हणतात त्याप्रमाणे मानवाच्या आदिम अवस्थेत स्त्रियांना अधिक महत्त्व असे. इतकेच काय, परंतु हे महत्त्व प्रसंगी स्त्रीराज्याच्या आणि स्त्रीसत्ताक समाजाच्या अस्तित्वापर्यंत पोहोचले असेल; पण त्या अवस्थेचा आणि त्यानंतर घडलेल्या गोष्टींचा संबंध केवळ आठवणींपुरताच मर्यादित राहिला हे मान्यच करायला हवे.
विवेचन कक्षा महाराष्ट्र आणि महाराष्ट्र ज्याचा भाग आहे तो भारत देश यांच्यापुरती मर्यादित करायची झाल्यास पहिल्यांदा दखल घ्यावी लागते ती अर्थातच जातिव्यवस्थेची आणि मग लक्षात येते, की स्त्रियांच्या समस्यांचा विचार जातिव्यवस्थेस टाळून करता येत नाही. जी जात स्वत:ला जितकी उच्च मानते किंवा समाजव्यवस्थेत तशी मानली जाते, तितके त्या जातीतील स्त्रियांवर र्निबध अधिक हा अनुभव आहे किंवा असेही म्हणता येईल, की त्या जातीची उच्चताच तिच्यातील स्त्रियांवरील र्निबधावर अवलंबून असल्याचे मानले जाते.
पण आपणाला सध्या वेगवेगळय़ा जातींमधील स्त्रियांच्या स्थानांची चर्चा करायची नसून, स्त्री हाच एक स्वतंत्र घटक किंवा एकक मानून पुढे जायचे आहे व ते जातिव्यवस्थेच्या संदर्भात.
जातिव्यवस्थेच्या संदर्भात विचार केला असता पहिल्यांदा कोणती बाब ठळक होत असेल, तर ती स्त्रियांचे स्थान सर्वात कनिष्ठ मानल्या गेलेल्या शूद्रांप्रमाणे होते (ते अतिशूद्रांप्रमाणे असणे शक्यच नव्हते, कारण अतिशूद्र सहसा अस्पृश्य वर्गात ढकलले गेले होते आणि घरातील स्त्रियांवाचून परोपरी अडत असल्याने त्यांना अस्पृश्य मानणे पूर्णपणे अशक्य होते. नाही तरी तसेही झाले असते.) म्हणून तर स्त्रियांचा उल्लेख नेहमी शूद्रांच्या बरोबरीने येतो. ‘स्त्रीशूद्र’ हा सामाजिक शब्द फक्त व्याकरणापुरता मर्यादित नसून, त्याचा संबंध प्रत्यक्ष सामाजिक व्यवहारांशी आहे. स्त्रियांना मारझोड करणे हा पुरुषजातीचा जणू जन्मसिद्ध हक्क असल्याची समजूत विचारात घेतली, की तुलसीदासांनी स्त्रीशूद्रांचा उल्लेख ढोरांच्या म्हणजे जनावरांच्या बरोबरीने का केला असावा हे लक्षात यावे. त्यांच्यातील समान गुणधर्म म्हणजे ते सर्व ताडनाचे अधिकारी, म्हणजे मारहाण करण्याच्या लायकीचे समजले गेले! वासाहतिक काळातील प्रसिद्ध विद्वान पंडित श्रीधरपंत जिनसीवाल यांनी पीठबीट सांडवले तर आपण आपल्या बायकोला मारीत असतो याचा जाहीर उच्चार करून एकच खळबळ माजवली होती त्याची येथे आठवण करावी. समकालीन रानडे, आगरकर या स्त्रियांच्या पक्षपाती सुधारकांना हे खिजवण्यासारखेच होते.
स्त्रिया आणि शूद्र यांच्यातील साम्याचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोघांनाही वेदांचा अधिकार नव्हता. वेदांच्या अध्ययनासाठी उपनयनाचा संस्कार होण्याची गरज असे. उपनयन होईपर्यंत सर्वच शूद्र. चार वर्णापैकी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रवर्णिक पुरुषांचे उपनयन होई. तो त्यांचा जणू दुसरा जन्मच. त्यामुळे त्यांना ‘द्विज’ असे म्हटले जाई. शूद्रांचे उपनयन न झाल्याने ते एकजाती आणि म्हणून वेदांचे अनधिकारी. उपनयनाचा (आणि वेदाध्ययनचा) अधिकार स्त्रियांना नसल्यामुळे त्याही एकजातीच आणि म्हणूनच त्यांचा सामाजिक स्तर शूद्रांसारखा. म्हणून ‘स्त्रीशूद्र’ हा समास.
स्त्रिया आणि शूद्र यांना वेदांचा म्हणजे श्रुतींचा अधिकार नसला तरी पुराणादी स्मृतींचा अधिकार दिला गेला होता, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब. रामायण, महाभारत ही महाकाव्ये स्मृतीच मानली जात असल्याने त्यांना रामायण-महाभारताचाही अधिकार होता.
आपल्या येथे धार्मिक, सामाजिक इतकेच काय, पण भाषिक व्यवहार एकमेकांत कसे गुंतले होते हे यावरून समजून यावे. वेदांचा अधिकार नसलेल्या स्त्रीशूद्रांना कोणे एके काळी संस्कृत भाषा बोलण्या-ऐकण्याचा अधिकार असावा आणि त्यामुळेच या वेदवंचितांची सोय म्हणून महर्षी व्यासांनी त्यांच्यासाठी भगवद्गीता लिहिली अशी संगती महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वरांनी लावली. या संदर्भातील त्यांची एक ओवी अत्यंत महत्त्वाची आहे.
‘‘तैसे शब्दे जे न लभे। ते घडुनिया अनुष्टुभे।
स्त्रीशूद्रादी प्रतिभे। सामावले।।’’
‘शब्द’ या शब्दाचा मर्यादित अर्थ वेद असाही होतो हे लक्षात घेतले म्हणजे ज्ञानेश्वरांनी एका बाजूला वेदांपेक्षा गीतेचे श्रेष्ठत्व सूचित केले आहे. (‘‘हा वेदार्थसागरू। जया निद्रिताचा घोरू। तो स्वये सर्वेश्वरू। प्रत्यक्ष अनुवादला।।’’ या ओवीतून तर त्यांनी ते स्पष्टपणेच सांगितले आहे.) दुसऱ्या बाजूला ते व्यासांनी गीतेची निर्मिती स्त्रीशूद्रांसाठी केली, असेही सांगतात. भगवद्गीतेवर भाष्य लिहिताना ते केवळ अध्यात्माच्या अंगाने न लिहिता गीतेच्या सामाजिक अभिनिष्पत्ती (केस्र्’्रूं३्रल्ल२) स्पष्ट करणारे भाष्यकार म्हणजे ज्ञानेश्वर.
ज्ञानेश्वरांच्या सामाजिक बांधीलकीचा प्रत्यय त्यांच्या अर्थनिर्धारणात म्हणजे त्यांनी लावलेल्या गीतेच्या अन्वयार्थात आल्याशिवाय राहत नाही. त्यांचा कल मूळ अर्थाशी सुसंगत असा अर्थविस्तार करण्याकडे आहे. वेदवंचित स्त्रीशूद्रांना गीतेने जवळ केले, हा मुद्दा व्यासांनी गीतेच्या नवव्या अध्यायातील ‘मांहि पार्थ व्यपाश्रित्य येऽ पि स्यु:। पापयोनय:। स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा तेऽ पि यांसि परां गतिम्।।’’ या श्लोकातून मांडला आहे. त्यातील स्त्रिया आणि शूद्र यांच्या समावेशाबद्दल ज्ञानेश्वरांनी व्यासांना धन्यवाद दिलेच आहेत; परंतु अतिशूद्र अस्पृश्यांचा समावेश करायचे व्यास विसरले. ती उणीव आता ज्ञानेश्वर भरून काढतात. ‘‘तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया। कां शूद्र अंत्यादी इया। जाति तवचि वेगळालिया। जब न पवती माते।।’’ या ओवीत ते अंत्यज वर्णाचा आवर्जून उल्लेख करतात यात खूप काही आले.
गीतेचा अन्वयार्थ लावताना सुसंगत असा अर्थविस्तार करणारे ज्ञानेश्वर जरूर तेथे सुसंगत अर्थसंकोचही करतात. उदाहरण म्हणून याच श्लोकाचा उल्लेख करता येईल. श्लोकात स्त्रिया, वैश्य, शूद्र या शब्दांबरोबर ‘पापयोनय:’ हा शब्द आला आहे. संस्कृतमध्ये गीताभाष्य लिहिणाऱ्या शंकराचार्यासह सर्व आचार्यानी ‘पापयोनी’ शब्दाला स्त्रिया, वैश्य आणि शूद्र यांचे विशेषण मानले; पण त्यामुळे स्त्रिया, वैश्य आणि शूद्र हे समूह पापयोनी ठरले. त्यांची उत्पत्ती पापातून झाली असे निष्पन्न झाले. ज्ञानेश्वरांनी या पारंपरिक अर्थाला आव्हान दिले. त्यासाठी त्यांना श्लोकाचा अन्वय बदलावा लागला. त्यांनी ‘पापयोनय:’ हे पद उपरोक्त तीन पदांचे विशेषण न मानता स्वतंत्र पद मानले. त्यामुळे आता स्त्रिया, वैश्य आणि शूद्र हे वर्ग पापयोनी ठरत नाहीत, तर पापयोनी हा वेगळा चौथा वर्ग असल्याचे निष्पन्न होते; पण तसा मोघम उल्लेख करून भागणार नाही. पापयोनी म्हणजे नेमके कोण हे सांगायला हवे. ज्ञानेश्वरांनी मानवी समाजाबाहेरच्या मानल्या गेलेल्या पुराणकथात्मक दैत्यांना पापयोनी मानून प्रश्न मिटवला. त्यासाठी प्रल्हादाचे उदाहरणही दिले.
ज्ञानेश्वरांच्या अशा अन्वयार्थाने तत्कालीन वारकरी संप्रदायाच्या आचारविचारांना तात्त्विक बैठक मिळाल्याने ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ असे म्हणण्याची प्रथा पडली. एरवी हा संप्रदाय त्यांच्याआधी काही शतके तरी अस्तित्वात असणार यात शंका नाही.
आपण स्त्रियांच्या संदर्भात चर्चा करीत असल्यामुळे शूद्र (आणि अतिशूद्र) वर्गाला तूर्त बाजूला ठेवू. वारकरी संप्रदाय आणि त्याला तात्त्विक पाठबळ देणारे ज्ञानेश्वर यांच्या भूमिकेचा सामाजिक परिणाम काय झाला हे येथे सांगता येईल. उत्तरेतील संतांनी ताडनाचे अधिकारी ठरवलेल्या स्त्रिया (आणि अर्थात शूद्रातिशूद्र) येथे महाराष्ट्रात धर्म आणि अध्यात्म यांच्या चर्चेच्या परिघाबाहेर न राहता आत आले, प्रसंगी केंद्रस्थानी राहिले. चौदा वर्षांच्या मुक्ताबाईंचे शिष्यत्व चौदाशे वर्षांच्या चांगदेवाने पत्करावे आणि चांगदेवाला मूल समजून त्याची आध्यात्मिक समजूत पटवण्यासाठी मुक्ताबाईंनी त्यांच्यासाठी पाळणा लिहावा. पंढरीच्या वाळवंटात नामदेवांचे कीर्तन होत असताना त्याचे सूत्रसंचालन जनाबाईंनी करावे. ‘‘नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग। जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग।।’’ अशा प्रकारे नामदेवांच्या कीर्तनात ज्ञानेश्वरांना अभंग म्हणायला सांगावे.
या स्थित्यंतराचा सारांश जनाबाईंच्या अभंगाने सांगता येईल.
‘‘स्त्रीजन्म म्हणोनि न व्हावे उदास।
मज केले ऐसे साधुसंते।।’’

*लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.
*उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन’ हे सदर.

Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
kutuhal writer noam chomsky
कुतूहल : नोम चॉमस्की
Monkey torture
माकडाला झाडावर उलटे टांगून अनन्वित अत्याचार; वन्यजीवप्रेमींकडून कारवाईची मागणी