‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ ही ‘लोकसत्ता’ची संकल्पना मला आवडली. पण ‘मानव्य’ने देणग्या गोळा करण्याकरिता असे जाहीर आवाहन संस्थेच्या स्थापनेपासून कधीही केलेले नव्हते. मानव्यच्या संस्थापिका विजयाताई लवाटे यांनी आम्हा सर्व विश्वस्तांना एक सांगितले होते, काम करत राहा आणि जास्तीत जास्त लोकांना काम प्रत्यक्ष दाखवत राहा. त्यातून होणाऱ्या मौखिक प्रसारामुळे संस्थेला आर्थिक मदत मिळेल. त्याप्रमाणे ती मिळत होती, पण मिळण्याची काळजी रोज करायला लागते. २९ सप्टेंबरच्या सकाळी मला उठवले ते फोनच्या घंटीने. पहिला फोन मला पंढरपूरहून आला होता. त्या व्यक्तीने कामाचे कौतुक तर केलेच त्याचबरोबर मला एक प्रश्न विचारला, की ‘संस्थेच्या भविष्यासाठी तुम्ही काय तरतूद केली आहे? तुम्ही प्रथम कॉर्प्स फंड सुरू करा. त्यासाठी मी डोनेशन पाठवणार आहे.’ त्या शनिवारी माझ्यावर फोनची अक्षरश: बरसात होत होती.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन येत होते. काही फोन इंदूर, कतार, दुबई येथून आले. वृत्तपत्राची ताकद व प्रसार किती मोठा आहे याचा पुन:प्रत्यय आला. संस्थेसाठी आर्थिक साहाय्याबरोबरच जास्तीत जास्त लोकांपर्यंत काम पोहोचणे तितकेच जरु री आहे यासाठी या उपक्रमाचा खूपच उपयोग झाला.
 हा फोनचा सिलसिला अजून चालू आहे. लोकांनी कात्रणे काढून ठेवलेली आहेत व त्यातून अजून ते फोन करत आहेत. सर्व वाचकांना मी संस्था पाहायला यायचे निमंत्रण या माध्यमातून देऊ इच्छितो. सर्व फोनमधून एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली की जगात दानशूर लोक खूप आहेत. त्यांना गरज कोणाला आहे व कशा प्रकारची आहे हे माहीत नाही. समाजिक संस्था व जनता यामधील दुवा साधण्यासाठीचे काम ‘लोकसत्ता’ने फार प्रभावीपणे केलेले आहे. अजून या फोनमधून जाणवलेली गोष्ट म्हणजे आपले हे दान सत्पात्री होते की नाही, याची शंका प्रत्येकाच्या मनात होती. अर्थात सध्याच्या घोटाळय़ाच्या युगात ती अत्यंत रास्त आहे. इथे सामाजिक संस्थेची जबाबदारी येते की दानशुरांचे दान सत्पात्री ठरलेच पाहिजे. सरकारी नियमानुसार संस्थेतील मुलाचे संगोपन मुलाच्या वयाच्या १८ व्या वर्षी संपते. १७ वर्षे ३६४ दिवसांचा मुलगा अज्ञान आणि १८ वर्षांचा सज्ञान. त्या दिवसापासून सरकारी अनुदान बंद. त्यासाठी संस्थेनी असा ठराव केलाय की मूल स्वत:च्या पायावर उभे राहीपर्यंत किंवा जास्तीत जास्त २४ वर्षांपर्यंत संस्था काळजी घेईल. संस्थेतून बाहेर पडलेल्या मुलांचा सपोर्ट ग्रुप तयार केला आहे. मुलांना समाजात गेल्यानंतर येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संस्था त्यांच्यापाठी आहे. ही मुले मोठी झाल्यावर त्यांच्या विवाहाचा विचारदेखील संस्थेने केला आहे. गेली तीन वर्षे एचआयव्ही संसर्गित लोकांसाठीचा विवाह मेळावा आम्ही घेतो आहोत. त्याला भारतातील सर्व भागामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा अनेक योजना आहेत. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम असाच दरवर्षी सुरू ठेवावा व वेगवेगळ्या संस्थांचे कार्य लोकापर्यंत पोहोचावे. ‘लोकसत्ता’चे, देणगीदारांचे व सर्व वाचकांचे मनापासून आभार!