ज्या एका परमतत्त्वाला जाणल्यावर सर्वकाही जाणलं जातं त्या परमतत्त्वाशी एकतानता पावलेले संत हेच जगातले खरे ज्ञानी होत. त्यांची मनुष्यजातीवर अपार कृपा अशी की केवळ माणसाला खऱ्या सुखाकडे वळविण्यासाठी ते आले. विविध धर्मात, विविध प्रांतांत, विविध समाजांत, विभिन्न आर्थिक-सामाजिक स्तरांवर आणि विभिन्न आर्थिक-सामाजिक परिस्थितींमध्ये ते वावरले. बाह्य़ स्थितीत भिन्नतेचा भास असला तरी आंतरिक स्थिती मात्र अभिन्न होती! त्या एकाशी ऐक्य पावलेली होती! स्वामी स्वरूपानंद म्हणतात, ‘‘मजसि ह्य़ा जगद्-रंगभूमिवर जसें दिलें त्वा सोंग। करीन संपादणी तशी मी राहुनियां नि:संग।। (अमृतधारा, संख्या ५१). संतांनी खऱ्या अर्थानं नि:संग राहून आपल्या वाटय़ाला आलेली भूमिका वठवली आणि लोकांना भगवंताच्या भक्तीकडे वळवण्याचे व्रत पूर्ण पाळले. नि:संग संतांना आधी ओळखता येणं कठीण. स्वामी देसायांच्या घरी राहू लागले तेव्हा पावस आणि आसपासच्या परिसरात त्यांची खरी महती कित्येक काळ कुणालाही कळली नव्हती. बाहेरगावहून लोक येत तेव्हा आपल्या भागात कुणी ‘स्वामी’ राहतात, हेच लोकांना प्रथम कळत असे! आता वरकरणी पाहू जाता आपला समाज अत्यंत धार्मिक भासतो. गल्लोगल्ली मंदिरं आहेत, लोक उपास-तापासही करतात, कोटय़ानुकोटी देवांना पूजलं जातं. तरी खरा जो ‘देव’ आहे त्याला कुणी शोधत नाही! (जया मानला देव तो पूजिताहे। परी देव शोधूनि कोण्ही न पाहे।- मनाचे श्लोक). हा ‘देव’ म्हणजे सद्गुरूच. समर्थ सांगतात, ‘जगीं थोरला देव तो चोरलासे। गुरुवीण तो सर्वथा ही न दीसे।।’ जगात जो थोरला म्हणजे खरा देव आहे ना, तो चोरून राहतो! केवळ सद्गुरूरूपातच त्याचं दर्शन होऊ शकतं. त्या सद्गुरूंचा संग धरा कारण? ‘मना संग हा सर्व संगास तोडी। मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी। मना संग हा साधकां सीघ्र सोडी। मना संग हा द्वैत नि:शेष मोडी।। ’ सद्गुरूंच्या सहवासानं असंगाचा संग सुटतो. जगतानाच मुक्तीचा अनुभव येतो. भवपाशातून तो साधकाला शीघ्र सोडवतो आणि द्वैताचा पूर्ण निरास होतो. आता हा ‘सहवास’ मात्र खरा पाहिजे. ‘उपवास’चा जो अर्थ स्वामींनी सांगितला होता तोच ‘सहवास’चा आहे. सहवास म्हणजे सद्गुरूंचा जो विचार आहे, तोच माझा झाला पाहिजे. त्यांची जी आवड आहे, तीच माझी झाली पाहिजे. आता त्यांचा विचार, त्यांची आवड मला कशातून कळते? अर्थात त्यांच्या वागण्यातून, व्यवहारातून कळते. त्यामुळेच ही ओवी सांगते की, हें ऐसें असें स्वभावें। म्हणौनि कर्म न संडावें। विशेषें आचरावें। लागे संतीं।।  संतांच्या, सद्गुरूंच्या सहवासाचा प्रभाव सहज आणि अमीट स्वरूपात पडतो त्यामुळे त्यांना तर कर्माचं विशेष आचरण करावं लागतं! इथे जो ‘विशेष’ शब्द आहे तोही मोठा खुबीचा आहे. आचरणासारखं आचरण किंवा काटेकोर आचरण, एवढाच त्याचा अर्थ नाही. त्या आचरणातली विशेषता वरकरणी जाणवतही नाही, पण कालांतरानं तो प्रसंग आठवला की ती अचानक उमगते आणि मनाला भिडते!