शेतीत काही राम राहिला नाही हो, असे म्हणत कास्तकारांना शेती सोडा असे सांगितले जात असतानाच्या काळात महाराष्ट्रातील विद्यार्थी शेतकी महाविद्यालयांपुढे रांगा लावून उभा असल्याचे चित्र हे जेवढे आश्चर्यकारक आहे तेवढेच सुखावहही आहे. ‘लोकसत्ता’ने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या विशेष वृत्तानुसार राज्यातील १७३ महाविद्यालयांत प्रवेशासाठी यंदा ६२ हजार अर्ज आले. या प्रवेशाच्या पहिल्या फेरीचे ‘कट ऑफ’ गुण होते ९४ टक्के. याचा अर्थ ९४ ते १०० टक्के या दरम्यान गुण प्राप्त करणारे बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी शेती शिक्षणाकडे वळले आहेत. या मुलांच्या डोळ्यांत पूर्वी डॉक्टर वा अभियंता होण्याचे स्वप्न असे. आता परिस्थिती पालटली आहे. यंदा अभियांत्रिकीच्या ६० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. याला कारण करिअरनिष्ठ शिक्षणाच्या वाढलेल्या संधी. त्यात शेतकी महाविद्यालये आधीपासूनच होती. येथे प्रवेश घेणारी मुले ग्रामीण भागातीलच. घरी थोडी शेतीवाडी असणारी. ज्यांच्याकडे सातबारा नाही अशी शहरी मुले शेतकी महाविद्यालयांकडे पाहातसुद्धा नाहीत. विद्येच्या माहेरघरात शेतकी महाविद्यालय आहे. तेथे शहरी मुलांचे जाणे व्हायचे ते उसाचा रस पिण्यासाठीच. दुसरीकडे ग्रामीण भागात बारावीपर्यंत विज्ञानाचे शिक्षण घेऊन पुढे शहरांत येऊन बीएस्सी, एमएस्सी केले तरी ही मुले नोकऱ्यांच्या बाजारात सहसा मागेच पडत. याची कारणे आपल्या सामाजिक संरचनेत दडलेली आहेत. ही मुले मग कुठे तरी कमी पगाराच्या नोकऱ्या धरा किंवा मग बीएड वगरे करून शिक्षण व्यवसायात जा असे करीत. त्यापेक्षा मग कृषी महाविद्यालयांचा पर्याय अधिक चांगला असे. तेथे प्रवेश घ्यायचा. पहिल्या वर्षांपासून लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीला लागायचे आणि शेतीच्या वाटेने शासकीय नोकऱ्यांत शिरायचे हा वर्षांनुवर्षांचा पायंडा होता. आजही त्यात फार बदल झाला आहे असे नव्हे. फरक पडला आहे तो एवढाच की रोजगाराच्या संधीची क्षितिजे पूर्वीपेक्षा अधिक विस्तारली आहेत. शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान येत आहे. हरितगृहे, प्रक्रिया उद्योग उभे राहात आहेत. कंत्राटी शेतीपद्धत रुजू लागली आहे आणि बडय़ा भांडवलदार कंपन्या या क्षेत्रात उतरू लागल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर कृषी उद्योगातील नोकऱ्यांची संधी वाढली आहे. बँका, विमा कंपन्यांनाही कृषी पदवीधरांची मोठय़ा प्रमाणावर आवश्यकता भासू लागलेली आहे. एकीकडे शासकीय नोकऱ्यांच्या जोडीला या नोकऱ्या आणि दुसरीकडे फायदेशीर ठरू लागलेला स्वयंरोजगार, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे गुणवंतांना हे क्षेत्र खुणावू लागले आहे. यंदाच्या प्रवेशाच्या आकडेवारीतून हेच स्पष्ट होत आहे. प्रश्न असा आहे, की शेतीसंबंधित नोकऱ्यांतील वाढ ही शेतीला चांगले दिवस आल्याचे लक्षण मानायचे का? मातीत उतरलेल्या या गुणवंतांमुळे शेतीची पारंपरिकतेच्या जोखडातून मुक्तता होणार आहे का? मागणी आणि पुरवठा यांच्या गणिताकडे लक्ष ठेवून शेती केली जाणार आहे का? गुदस्ता कांद्याला चांगला भाव आला म्हणून यंदा वावरावावरांतून कांदाच कांदा. की मग शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचे तर त्याचा होतो ‘डू’. मग कसला भाव आणि कसले काय? अशी नेहमीची परिस्थिती यातून सुधारणार आहे का? ती तशी सुधारावी. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच आधुनिक विचार यावा. तसे झाले तरच मग आमची माती, आमचे विद्यार्थी असे अभिमानाने म्हणता येईल.