‘हरितक्रांती’ने विकसनशील देशांत काही काळ आनंद पसरला खरा, पण यातून शेतीच्या गुंतवणूक-लाभाची गणिते मांडून जे केले गेले, त्याची कटु फळेही आज जगभर दिसताहेत. पण सहसा संकरित किंवा ‘जीएम’ बियाण्याबद्दल बोलले जात नाही. हे अप्रिय मुद्दे मांडणारे पुस्तक स्त्रियाच ‘खऱ्या हरित क्रांती’कडे नेतील असे सुचवते खरे; परंतु कशा नेतील, हे सांगण्यात पुस्तक कमी पडले आहे..
शाकाहारी आणि मांसाहारी लोकांच्या ताटात येणारे बहुतांश अन्न सध्या शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीत पहिल्या हरितक्रांतीचे प्रयोग झाले आहेत, तर दुसऱ्या हरितक्रांतीचे चालू आहेत. सध्याचा काळ ग्लोबल वॉìमगचा आहे. तशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्या हरितक्रांतीची आवश्यकता आळवली आहे. अशा काळात शेती, अन्न आणि आपले आरोग्य यांवरील परिणामांची दखल घेणारे पर्यावरणवादी कार्यकर्ती-अभ्यासक वंदना शिवा यांनी संपादित केलेले ‘सीड सोव्हरेन्टी, फूड सिक्युरिटी: विमेन इन व्हॅनगार्ड’ हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
माणसाने जाणीवपूर्वक शेती करायला सुमारे सातएक हजार वर्षांपूर्वी सुरुवात केली, तर जगाची लोकसंख्या १८०४ या वर्षांत प्रथमच १०० कोटी झाली. गेल्या सुमारे २०० वर्षांत दगडी कोळसा या इंधनाचा वापर, वैज्ञानिक संशोधन आणि लोकसंख्या वाढ या सर्वच प्रक्रिया वेगवान झाल्या. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला वसाहतींची साम्राज्ये उभारून भांडवलशाहीने युरोपात आणि इतरत्रही पाय रोवले. विसाव्या शतकातील मुख्यत प्रतिजैविकांच्या (अँटिबायोटिक्सच्या) शोधामुळे आणि इतर आधुनिक औषधांमुळे मृत्युदर वेगाने घटला. विकसित देशांचा अपवाद वगळता जीवनमान न सुधारल्याने जन्मदर मात्र त्या प्रमाणात घटला नाही. परिणामी २०११ या वर्षी जगाची लोकसंख्या ७०० कोटी झाली. ती २०४० या वर्षांत ९०० कोटी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ७०० ते ८०० कोटी लोकसंख्येला अन्न, पाणी, निवारा, आरोग्य, ऊर्जा, शिक्षण, अशा सुविधा पुरविणे आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीत अन्नाचा प्रश्न सोडविण्याचे आव्हान पेलण्याच्या आविर्भावात पहिली आणि दुसरी हरितक्रांती अवतरली.
अनेक देशांत पहिली हरितक्रांती घडविण्याचे श्रेय नोबेल पारितोषिक विजेते नॉर्मन बोरलॉग (Norman Borlaug) यांना दिले जाते. वास्तवात तिचे मोठे श्रेय स्टँडर्ड ऑइल या कंपनीतून अमाप संपत्ती जमा केलेल्या रॉकफेलर कुटुंबाच्या रॉकफेलर फाऊंडेशनकडेही दिले पाहिजे. डॉ. जेकब हॅरर (Dr Jacob George Harrar) या वनस्पतीशास्त्रज्ञाचे पुढील अर्थशास्त्रीय अवतरण फाऊंडेशनची १९६०च्या दशकातील हरितक्रांतीमागील भूमिका स्पष्ट करते : ‘kThe idea that agriculture’s just nothing but a way of life and not an industry is a misnomer which has had too long a history. Agriculture is a business; it is an industry-and treated as such it responds beautifully. .’ नफ्याला वाहिलेल्या या भूमिकेच्या अवतरणाने फाऊंडेशनच्या शतकमहोत्सवी शेतीविषयक टिपणाची सुरुवात होते. तिला अनुसरून फाऊंडेशनने संकरित बी-बियाणी, रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशके यावरील संशोधनाला आणि उद्योगांना आíथक पाठबळ देऊन शेतीला औद्योगिक कारखानदारीप्रमाणे जोजवले. शेतीसाठी धरणांतून आणि अगणित बोअरवेलच्या उपशांमधून पाणीपुरवठा करायला लावला. थोडक्यात, विकसनशील देशांतील शेतीचा गाडा ‘सुपरसॉनिक विमानात’ चढविण्यात पुढाकार घेतला. त्याला अनेक उद्योजकांनी हातभार लावला.
या हरितक्रांतीने मुख्यत्वे गहू, तांदूळ, सोयाबीन आणि मका या चार तृणधान्यांचा विचार विकसनशील देशांत केला. अनेक विकसित राष्ट्रांत तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, फळे यासाठीदेखील संकरित वाणांचा वापर प्रथम झाला. हरितक्रांतीमुळे विकसनशील देशांत शेतीमधील उत्पादकता वाढली, भूकबळींची भीती मोठय़ा प्रमाणात दूर झाली, ‘हाती अन्न-मदतीची याचना करणारा वाडगा घेऊन उभे असलेले देश’ ही विकसनशील देशांची प्रतिमा पालटली. या क्रांतीची झळाळी ओसरल्यावर गेल्या दोन-तीन दशकांत तिचे पुढील विपरीत परिणाम लक्षात आले :
*    संकरित बियाणी खरेदीमुळे शेतकऱ्यांच्या हातातील शेतीविषयक निर्णयक्षमता शेतीमध्ये रुची नसणाऱ्या विविध कर्जपुरवठादार कंपन्या आणि खते- कीटकनाशके- तणनाशके या उद्योगांच्या हाती गेली. ग्रामीण भागातील आíथक विषमतेची दरी वाढली. शेतकरी कर्जबाजारी झाले.
*  धरणांमुळे नद्या ‘वाहणे’ विसरल्या. धरणांच्या पाण्याने हिरवाई डोलू लागलेल्यांपकी काही ठिकाणी जमिनीला खारफुटीची व्याधी जडली. ऊस किंवा इतर नगदी पिकांनी, जुन्या पीक पद्धतीची परंपरा मोडीत काढली.
*  मानवाच्या पोटास सवय नसणारी खते- कीटकनाशके- तणनाशके या रूपांतील रसायने पिकांतून अन्नात आणि पोटात शिरली. पिकांनी न शोषलेली अतिरिक्त रसायने पाण्यातून माणसांपर्यंत पोहोचली. अन्न-पाण्याच्या या प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्याचे प्रश्न आणि त्यावरील खर्च वाढले.
* वरील अनेक मार्गानी येणाऱ्या कर्जबाजारीपणापायी वाढत्या संख्येने शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबू लागले.
*    संकरित वाणांचा वापर सलग काही दशके झाल्याने नसíगक वाणांची पेरणी आणि त्यांची साठवणूक झाली नाही. उपलब्ध वाणांची विविधता वेगाने कमी झाली. जागतिक तापमानवाढीमुळे ऋतुमान विस्कटल्याने शेती होरपळण्याच्या काळात जैविक विविधता अत्यंत गरजेची आहे. परंतु तिचीच उणीव हे मोठे संकट बनले.
पहिल्या हरितक्रांतीमुळे अनपेक्षित दिशांनी खूप हानीदेखील झाली आहे. त्यामुळे संकरित बियाणाऐवजी जैविक अभियांत्रिकीचा वापर करणाऱ्या पर्यायी (किंवा पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, खऱ्या अर्थाने दुसऱ्या) हरितक्रांतीची गरज जाणवू लागली. या हरितक्रांतीसाठी निसर्गातील योग्य वाणांची निवड करत शेकडो वष्रे शेती करत शेतकऱ्यांनी टिकविलेल्या आणि काही प्रमाणात सुधारलेल्या प्रजातींच्या वापराचा कसलाही मोबदला न देता आणि कुणाचेही बौद्धिक स्वामित्व मान्य न करता ‘जनुकीय सुधारित’ बियाणी (‘जसु’ बियाणी; इंग्रजीत जेनिटिकली मॉडिफाईड- जीएम सीड्स) जगातील मातब्बर कंपन्यांनी तयार केली. जैविक अभियांत्रिकीचा मुक्त वापर करून बनविलेल्या या नव्या बियाणांचे पेटंटहक्क मात्र या कंपन्यांनी बिनदिक्कतपणे स्वत:कडे घेतले आणि डोळ्यात तेल घालून जपले.
हरितक्रांत्यांचा गरसोयीचा जमाखर्च बाजूस सारला गेल्याची दाट छाया पुस्तकातील तिन्ही भागांतील निबंधांवर आहे. संपादिकेची अभ्यासू प्रस्तावना वाचकांसाठी पुस्तकाचा विषयप्रवेश सोपा करते. पुस्तकातील ‘आंतरराष्ट्रीय’ शीर्षकाच्या पहिल्या भागात पाच लेख आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या हरितक्रांतीमुळे काही हजार वर्षांच्या शेतीपरंपरा मोडीत काढल्या जाण्याच्या प्रक्रियेचा जागतिक पातळीवरील परिणामांचा विस्तृत आढावा या लेखांतून समोर येतो. बी-बियाणांवरील नियंत्रणासाठी चाललेले कॉर्पोरेट जगाचे व्यवहार, त्याचा भाग असणारे शेतीविषयक संशोधन, पसरणाऱ्या रसायनांचे आरोग्यावरील परिणाम, पेटंटविषयक कायदेकानू, शेतकऱ्यांचे संघर्ष आणि सेंद्रिय शेतीचा पर्याय बळकट करण्याचे प्रयत्न यांचे चित्र प्रस्तावनेत रेखाटले जाते. या भागातील दुसरा निबंध शेतीविषयक जैवतंत्रज्ञान वापरात अमूर्त पातळीवर सर्वमान्य नतिकता असू शकते का, याची सुंदर चर्चा करतो. व्यवहारात नतिकतेची ऐशीतशी करत या क्षेत्रातील सर्वात बलाढय़ कंपनीचे स्थान पटकावणाऱ्या ‘मोन्सँटो’लादेखील ही नतिकता मान्य करावी लागते. क्रीक-वॅटसन यांच्या संशोधनातून डीएनएच्या रेणवीय रचनेचा उलगडा होणे ही विज्ञानजगतातील महत्त्वाची घटना होती. परंतु तिच्या एकदिशात्मक यांत्रिक कार्यकारणभावातून एक भ्रम तयार झाला आहे- तो म्हणजे व्यवसाय म्हणून जैविक अभियांत्रिकीचा वापर करून अपेक्षित गुणधर्म असणाऱ्या सजीवांच्या प्रजाती तयार करता येणे सहज शक्य आहे, हा. अशा बियाणात येऊ शकणारे घातक गुणधर्म नजरेआड करण्याची प्रवृत्ती नफ्यापायी बळावली आहे. अमेरिकेत ऑटिझम या लहानपणापासून जडणाऱ्या विकाराचे प्रमाण वेगाने वाढणे, हे असे एक उदाहरण आहे. ऑटिझमग्रस्त मुलांना इतरांशी नाती जोडणे आणि भाषेचा अमूर्त संकल्पनांसाठी वापर करणे, स्वतंत्रपणे जगणे, इत्यादी फार कठीण जाते. ती बऱ्याच प्रमाणात स्वकेंद्री आणि यांत्रिक वर्तनाची बनतात. या विकाराने अमेरिकेत १९७० या वर्षी दहा हजार मुलांत एक मूल ऑटिझमबाधित होते. परंतु ते प्रमाण २००२ या वर्षांत ६८ मुलांमध्ये एक मूल एवढे आढळले. हे वाढते प्रमाण आणि मका आणि सोयाबीन शेतीमधील ‘राऊंडअप रेडी’ या ब्रँड नावाने ग्लायफोसेट या रसायनाचा वाढता वापर यांचे आलेख परस्परांशी जुळणारेच आहेत. अमेरिकन संशोधन मात्र स्वत:ला आनुवंशिकतेच्या जंगलात स्वखुशीने हरवून घेत आहे. ‘भरपूर खा!, जे पदार्थ तुमच्या पूर्वजांनी खाल्ले नसतील ते खा!’ असा बाजारपेठीय बिझिनेसपूरक मंत्राचा गजर कायम चालू असल्याने, प्रथम विकसित आणि आता विकसनशील देशांत स्थूलता आणि तिच्याशी संबंधित रक्तदाब, हृदयविकार अशा विकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर पसे घेऊन व्यायाम करवणाऱ्या जिम्सचे जागोजाग पेव फुटणे, रक्तदाबाच्या गोळ्यांचे उत्पादन किंवा हृदयशस्त्रक्रियेच्या सोयी कोपऱ्याकोपऱ्यावर उभारणे असेच तिरपागडे उपाय उरतात, अशा अनेक प्रश्नांची दखल पहिल्या भागातील निबंध घेतात.
पुस्तकाच्या ‘उत्तर’ विभागातील दहा लेख भिन्न विकसित देशांतील छोटय़ा शेतकऱ्यांचे अनुभव आणि संघर्ष मांडतात. या (‘खुली अर्थव्यवस्था’ असलेल्या!) देशांत स्वत:कडील बियाणी नोंदणी करूनच वापरण्याची शेतकऱ्यांवर सक्ती आहे. नोंदणीसाठी अनेक देशांत या वाणांच्या जैविक गुणधर्माची माहिती द्यावी लागते. त्यांनी जसु बियाणी विकत घेऊन वापरली नसतील आणि त्यांच्या पिकात जर जसुबियाणांचे गुणधर्म आढळले, तर तो गुन्हा समजला जातो. त्यापायी भरभक्कम दंडदेखील वसूल केला जातो. यामागील गुपित शेजारच्या शेतातील जसु पिकाचे पराग घेऊन येणाऱ्या वाऱ्याला किंवा कीटकांनाच काय ते माहीत असते. त्यातूनही संघर्ष पेटून उठत आहेत. त्यात स्त्रियांचा सहकार बराच मोठा आहे. या विभागातील चौथा निबंध कोकोपेल्ली (बियाणांची उत्पादकता वाढविणाऱ्या उत्तर अमेरिकन आदिवासींच्या देवतेच्या नावावरून घेतलेले नाव) या दक्षिण फ्रान्समधील संघटनेचा जसु बियाणांच्या विरोधातील संघर्ष या कॉर्पोरेट कंपन्यांचे नफ्यासाठी चाललेले अनतिक राजकारण स्पष्ट करतो. देशांनुसार कायद्यांची नावे वेगळी; अंमलबजावणीमध्ये फरक; न्यायनिवाडय़ांना लागणारा कालावधी; शिक्षांचे स्वरूप; एवढेच काय ते फरक आहेत.
तिसऱ्या ‘दक्षिण’ या शीर्षकाच्या विभागात विकसनशील देशांतील ११ निबंध आहेत. त्यांचा भर मुख्यत: लहान शेतकऱ्यांनी जपलेली आणि नव्या तंत्रज्ञानामुळे ती आक्रसत जाणारी विविध पिकांची जैविक विविधता, प्रदूषण, जागतिक पातळीवरील मॉन्सँटोसारख्या कॉर्पोरेट कंपन्यांचे गरव्यवहार यांवर आहे. या भागातील ‘द लॉस ऑफ क्रॉप जेनेटिक डायव्हर्सटिी इन द चेंजिंग वर्ल्ड’ हा निबंध अगदी वेगळ्या बाजाची मांडणी करतो. शेतीसाठी निवडलेल्या वाणांमध्ये काही खास गुणधर्म असणे माणसाला गरजेचे वाटले. वैज्ञानिक निकोलाय वाविलाव (ठ्र‘’ं्र श्ं५्र’५) यांच्या संशोधनाप्रमाणे पृथ्वीवरील फक्त आठ क्षेत्रांत वाणांची अशी निवड करण्याला वाव आहे. यापकी सात क्षेत्रे विकसनशील ‘दक्षिण’ जगात आहेत. स्टॅलिन राजवटीतील या सोविएत रशियन संशोधनात आजवर अनेकदा मोलाची भर पडली आहे. त्यातून ‘अशाच ठिकाणी शेतीची पहाट उगवली असावी’ आणि ‘मानवी आरोग्यासाठी आवश्यक विविधता जेवणाच्या ताटात आणि त्यासाठी पिकांच्या वाणांत असावी लागते’, या मूलभूत निष्कर्षांना बळकटी आली आहे. परंतु संपर्क, संवाद, दळणवळण यातील आधुनिक सुविधांमुळे जग एका छापाचे होते आहे. याच जगात संस्कृती, भाषा तसेच अन्न यांतील विविधता संपविणारा सपाटीकरणाचा एक अदृश्य वरवंटा फिरतो आहे.
पुस्तकातील एकूण २६ निबंधांचे लेखन संशोधक-लेखक २७ स्त्रियांनी आणि तीन पुरुषांनी (चार निबंधांचे लेखन लेखकद्वयांनी केले आहे) मिळून केले आहे. संपादित पुस्तकात काही प्रमाणात पुनरुक्ती अटळ असते, तशी ती येथेही आहे. ‘जैविक विविधता टिकवून आरोग्यदायी अन्न देणाऱ्या शेती-चळवळीचे नेतृत्व स्त्रियाच करतील’ अशा अर्थाचे उपशीर्षक या पुस्तकाला आहेच. पण केवळ लेखिकांचा सहभाग लक्षणीय असणे ही बाब त्यास बळ देऊ शकत नाही. या चळवळीचे नेतृत्व स्त्रियाच का करतील, याचा कार्यकारणभाव स्पष्ट करणारा निबंध पुस्तकाच्या उपशीर्षकास न्याय देऊ शकला असता, तो येथे नाही. पुस्तकातील काही निबंध प्राचीन काळाच्या स्मरणरंजनाच्या उंबरठय़ाला स्पर्श करतात. अशा मोहाच्या क्षणी जगाची लोकसंख्या १०० कोटी होईपर्यंत उपलब्ध असणाऱ्या विविध रोगचिकित्सा पद्धती, नसíगक अन्न व राहणीमान, व्यायाम, अध्यात्म, धर्म अशा घटकांचा मृत्युदर कमी होण्यासाठी काडीचाही उपयोग झाला नाही, याची लेखकांनी जाण जागविली पाहिजे. ‘सध्याच्या व भविष्यातील लोकसंख्येला सेंद्रिय शेती पोषक आहार देऊ शकते,’ असा एखादा तर्कशुद्ध निबंध या पुस्तकाचे मोल वाढविणारा ठरला असता.
‘विकास/ प्रगती’ आणि ‘न्याय’ या संकल्पनांच्या संबंधाची चर्चा न संपणारी आहे. महाभारतात पांडवांचे प्रस्थ वाढविणारी खांडववनातील (खांडवप्रस्थातील) वनस्पती, प्राणी आणि आदिवासी जाळून इंद्रप्रस्थ वसविल्याची कथा आहे. राजेशाहीत राजाची इच्छा हाच ‘न्याय’ असतो. लोकशाहीत न्यायाची व्याख्या बदलली पाहिजे, यांची जाणीव मात्र हे पुस्तक जरूर देते. तसेच जैविक विविधता टिकविण्यातून छोटय़ा-मोठय़ा शेतकऱ्यांची शेतीमधील स्वायत्तता, समाजाची अन्नसुरक्षा, व्यक्तिगत आणि सामाजिक नतिकता, व्यवहारांतील लोकशाही या साऱ्या गोष्टी टिकणार आहेत, हे प्रस्तुत पुस्तक अधोरेखित करते.
 सीड सोव्हरेन्टी, फूड सिक्युरिटी: विमेन इन व्हॅनगार्ड’
संपादिका: वंदना शिवा
प्रकाशन: विमेन अनलिमिटेड
(काली फॉर विमेनचे सहयोगी)
मुखपृष्ठ: नीलिमा राव, रमेश टेकम
पृष्ठे : ३९०, किंमत : ५०० रु.
प्रकाश बुरटे -prakashburte123@gmail.com