‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम सकारात्मक पत्रकारितेचा वस्तुपाठच मानावा लागेल. गेल्या वर्षीही हा उपक्रम राबवण्यात आला, तेव्हा या उपक्रमामुळे किती मोठे कार्य साधले जाऊ शकते, हे निदर्शनास आले होते. अनेक संस्था निरपेक्ष वृत्तीने काम करीत असतात, पण निधीअभावी अशा संस्थांना आपल्या कार्यविस्तारात अनेक अडचणी येतात. सामाजिक भान ठेवणाऱ्या अशा या संस्थांना समाजानेच सढळ हाताने मदत करावी, अशी अपेक्षा असते. पण, अनेक वेळा अशा कामांकडे दुर्लक्ष होते, पण ‘लोकसत्ता’ने एक सशक्त माध्यम बनून चांगल्या संस्थांना पुढे नेण्याचे मोठे कार्य हाती घेतले आहे. त्यासाठी ‘लोकसत्ता’ निश्चितपणे अभिनंदनास पात्र आहे.
‘सर्वकार्येषु सर्वदा’मुळे आमच्या कार्याची माहिती सर्वदूर पोहोचली. लोकांनी कौतुक केले. या कामाला साथ देण्याची तयारी दर्शवली, आमचा हुरूप वाढला. आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजातील उपेक्षित घटकांचा विचार करण्यासाठी सवड कुणाजवळ आहे, असा सहज विचार करता येईल, पण आजही चांगूलपणा टिकून आहे. आम्ही मेळघाटात सुरू केलेल्या कार्याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. या उपक्रमामुळे आमच्या कार्यविस्ताराला मोठा परीघ मिळाला आहे. अनेक लोकांनी प्रत्यक्ष कार्यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली, काहींनी भेटवस्तूंच्या स्वरूपातही मदत केली. आदिवासींना रोजगाराचे अन्य साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून सुरू झालेल्या आमच्या कार्यात अनेक लोकांचे हात लागले आहेत. उपेक्षितांसाठी काही तरी करण्याची अनेकांची इच्छा आहे. त्यांना केवळ माध्यम हवे आहे.
या उपक्रमामुळे संस्थेला आर्थिक स्वरूपात मदत झाली, हा भाग वेगळा, पण या निमित्ताने संस्थेच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली, हे सर्वात महत्त्वाचे आहे. या उपक्रमाचा फायदा संस्थेला झालाच आहे, शिवाय संस्थेशी जुळलेल्या शेकडो कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. आमची दखल घेतली गेली ही भावना त्यांच्यासाठी फार मोठी आहे. राज्यातील अनेक चांगल्या संस्थांविषयी या निमित्ताने आम्हालाही जाणून घेता आले.
या संस्थांचेही कार्य प्रेरणादायी आहे. आमच्या कार्याविषयी आजवर मर्यादित स्तरावर माहिती होती, ‘लोकसत्ता’मुळे आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचलो. संपूर्ण बांबू केंद्रात निर्मित झालेल्या कलाकृती प्रदर्शनांमध्ये ठेवल्या जात असताना लोकांकडून कौतुकाची थाप मिळतच होती, पण तरीही अनेक मर्यादा होत्या. या उपक्रमामुळे अनेक लोक संस्थेसोबत जोडले गेले आहेत, नवीन लोकांची ओळख झाली आहे. अनेक भागातून बांबूच्या कलाकृतींची मागणी वाढली आहे. आदिवासींच्या आत्मनिर्भरतेच्या या प्रयोगाला सहाय्य करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.