कलाकाराचं काम पाहायचं की खासगी जीवन? माणूस म्हणून चार्ली चॅप्लिन हा हुकूमशाही प्रवृत्तीचाच होता, आप्तस्वकीयांना त्रास देण्यात धन्यता मानणारा होता, हे सांगणारं नवं संशोधन लक्षात ठेवायचं की आजही जगण्याचं बळ देणारे त्याचे सिनेमे?
कलाकाराचं मूल्यमापन फक्त त्याच्या कलाकृतीद्वारेच करायचं की त्याच्या आयुष्यातही डोकावायचं? एखाद्या कलाकाराचं कलाभान आणि त्याचं जीवनभान यांत काही समानता असते का? असायला हवी का? असली तर तो कलाकार अधिक मोठा ठरतो किंवा नसली तर तो जरा काही पायऱ्यांवरून घसरतो..असं होतं का?
आणि हा कलाकार थेट चार्ली चॅप्लिन असेल तर?
त्या वेळी चार्ली चॅप्लिन हा जगातला सर्वात लोकप्रिय इसम होता. इतका की लेनिन असं एकदा म्हणाले होते की हा (चॅप्लिन) असा एकच माणूस आहे की मला त्याला जाऊन भेटायची इच्छा आहे. चॅप्लिनची उंची इतकी की चर्चिल आपल्या राजघरात त्यांना राहायला बोलावत. बर्नार्ड शॉ, केन्स, एच जी वेल्स.. असे अनेक नामवंत चार्लीचे चाहते होते. याचा चॅप्लिन यालाही अभिमान होता. अगदी गर्व वाटावा इतका होता. त्याचमुळे तो एकदा म्हणाला : जगात ज्या प्रदेशात लोकांना येशू ख्रिस्तही माहीत नाही, त्या प्रदेशातल्या लोकांना मी ठाऊक आहे.
तर अशा आणि इतक्या लोकप्रिय चार्ली चॅप्लिन याच्या आयुष्यातला आतापर्यंत गुलदस्त्यात असलेला तपशील नुकताच प्रकाशित झालाय. त्यावरून कलाकार, त्याची कलासाधना आणि त्यामागचा माणूस यातल्या संबंधांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि समस्या ही की त्याचं उत्तर बऱ्याचदा वेदनादायीच असतं..चार्लीसारख्या कलाकाराच्या बाबतीत तर या वेदना अधिक तीव्र असू शकतात. पीटर अक्रॉइड यांनी प्रचंड संशोधन करून चार्लीचं संपूर्ण आयुष्य पुन्हा नव्यानं मांडलंय. त्याचा धांडोळा घ्यायला हवा.
त्यानुसार चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन याचा जन्म हा जिप्सींच्या वाहनांतल्या घरात झाला. त्याच्या वडिलांचा पत्ता नाही. म्हणजे जे सांगितले जातात तेच त्यांचे वडील आहेत किंवा काय, या संदर्भात प्रश्न आहेत. जो कोणी गृहस्थ वडील म्हणून सांगितला जातो तो दारूडा आणि बिनकामाचा होता. अडतिसाव्या वर्षीच तो दारू पिऊन मेला. तरीही त्यांना बऱ्याच बायका होत्या. चार्लीच्या खऱ्या आईसंदर्भातही काही गंभीर शंका आहेत. आईनं जगण्यासाठी प्रसंगी देहविक्रयही केला असावा असं मानायला जागा आहे. तीही व्यसनी होती आणि चक्रमही होती. वेगवेगळय़ा पुनर्वसन केंद्रांवर तिला वारंवार दाखल करावं लागलं होतं. त्यामुळे चार्लीचा बराचसा शालेय काळ अनाथ मुलांच्या केंद्रांत वा वसतिगृहांतच गेला.
या सगळय़ासाठी अर्थातच चार्ली चॅप्लिन या कलाकाराला दोष देता येणार नाही. उलट इतकं सगळं भोगूनही तो इतकं सगळं करू शकला याबद्दल त्याचं कौतुकच वाटावं.
लहानपणी घर असं काही नव्हतंच. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी आणि जगण्यासाठीही तो स्थानिक कलाकारांच्या मेळय़ांत पडेल ते काम करू लागला. आपल्याकडे डोंबाऱ्याकडे कसा एक हरहुन्नरी पोरगा असतो, तसा चार्ली होता. त्यातल्याच एकाबरोबर १९१३ साली तो कार्यक्रमाच्या निमित्तानं इंग्लंडमधून अमेरिकेत गेला. तिकडे तो छोटे छोटे सिनेमे बनवायला लागला. तेच ते.. वेंधळय़ा चार्लीचे.. ज्यात तो पडतो, धडपडतो.. त्याच्यावर काही ना काही आदळतं.. किंवा तो कोणावर तरी आदळतो. असा सगळा मसाला असलेले. हसवणारे.
पण पीटर सांगतात की चार्ली वैयक्तिक आयुष्यात क्वचितच हसायचा. त्याच्या चेहऱ्यावर सहजासहजी स्मित आलंय असं कधी व्हायचं नाही. तो संशयी होता. रागीट होता. एकेकटा राहायचा आणि सतत खिन्न असायचा. रॉबर्ट फ्लोरे नावाचा त्याचा सहायक दिग्दर्शक होता. त्यानं तर चार्लीचं वर्णन हुकूमशहा, एकाधिकारशाही गाजवणारा, हिंसक, क्रूर आणि जराही जवळ करू नये असा माणूस.. या शब्दांत केलंय. पीटर या चरित्राच्या निमित्तानं चार्लीच्या अनेक मुलांना भेटला. या सर्वाच्या मनात वडिलांविषयी एकच भावना होती. भीती. त्याचा एक मुलगा तर म्हणाला की चार्लीचा राग आणि त्यातील िहसा यांचं प्रमाण कायमच व्यस्त होतं.. छोटय़ाशा रागासाठीही ते प्रचंड हिंसक व्हायचे.. आम्हाला त्यांच्याकडे पाहायलाही भीती वाटायची. आणखी एक बाब सर्वाच्या बोलण्यातून समोर आली. ती म्हणजे आजचा दिवस कोणता.. म्हणजे सोमवार आहे की गुरुवार की आणखी कोणता.. हे कळून घ्यायला चार्लीला अजिबात आवडायचं नाही. कोणी तसा प्रयत्न केला तर ते अत्यंत हिंसक होत. आणि दुसरं म्हणजे ते कधीही घडय़ाळ घालत नसत. त्याचाही भयंकर राग चार्लीच्या मनात होता.
हे सगळंदेखील ठीक आहे. असतात माणसं अशी, असं म्हणून सोडून देता येईल. पण त्याच्या बाहेरच्या उद्योगांचा तपशील मात्र भीतीदायक आहे. आई वेडी झाल्यापासून चार्लीच्या मनात स्त्रियांविषयी कमालीचा राग, संशय होता. त्यामुळे मिळेल त्या स्त्रीचा उपभोग घ्यायचा छंदच त्याला लागला. त्यातली गंभीर बाब ही की चार्लीला बरोब्बर १५ वर्षांच्या मुलीच आवडायच्या. त्याबाबत तो इतका आग्रही असायचा की १६ वर्षांच्या होऊन त्यांच्याशी लग्न कसं करता येईल यासाठी तो वाटेल ते करायचा. त्यातल्या अनेकींशी त्यानं लग्न केली. त्यानंतर या मुलींना लक्षात यायचं आपण भल्या मोठय़ा जनानखान्याचा घटक आहोत ते. मग चार्लीचा प्रयत्न असायचा, या त्यांच्या पत्नींनी शिकावं वगैरे यासाठी. त्यातल्या अनेक जणींनी पुढे घटस्फोट घेतले. त्या घटस्फोट प्रकरणांचा अभ्यास पीटरनं केला. त्याला आढळलं की यातल्या बऱ्याचशा घटस्फोटांत तरुणींची एकच तक्रार आहे. ती म्हणजे लग्न झाल्यावर चार्लीनं आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही.. तो नव्या मुलींना शोधत राहिला. यातल्या काहींनी चार्लीच्या लैंगिक सवयींची वर्णनं केली आहेत, ती वाचवत नाहीत. अमेरिकेसारख्या मुक्त देशालाही त्याच्या भानगडी झेपल्या नाहीत, यावरून काय ते कळेल. त्याची शेवटची पत्नी उना ओनील ही त्याच्यापेक्षा ३६ वर्षांनी लहान होती. म्हणजे लग्नाच्या वेळी चार्ली ५४ वर्षांचा तर ती १८ वर्षांची होती. ती विख्यात युजिन ओनील यांची मुलगी. या लग्नानंतर उनाचं काय झालं याचं वर्णन त्याच्या सहकाऱ्यांनी करून ठेवलंय. ती कधीही भेटली की अंगावर बाळ असायचं तिच्या.. असं चार्लीचा एक सहकारी म्हणतो. खरंही असेल ते. कारण तिला चार्लीपासून आठ मुलं झाली. चार्लीबरोबरच्या ताणतणावांमुळे तीही मद्याच्या आहारी गेली. नंतर नंतर तर त्यांच्यात माऱ्यामाऱ्या होत.. म्हणजे चार्लीच मारहाण करायचा. त्याचे सहकारी सांगतात की दिग्दर्शक म्हणून चार्ली शुद्ध हुकूमशहा होता. फक्त आदेश द्यायचा. सिटी लाइट या त्याच्या गाजलेल्या सिनेमात त्यानं एक दृश्य तब्बल ३४२ वेळा चित्रित केलं. दृश्य काय? तर त्यातल्या लिटिल ट्रॅम्पला एक अंध फुलविक्रेती फुलांचा गुच्छ देते, इतकंच.
चार्लीचं असं वागणं, त्याचं राजकारण, कम्युनिस्टप्रेम वगैरेमुळे अमेरिकेनं त्याला जवळ जवळ देशातनच हाकललं. १९५२ साली. मग चार्ली स्वित्र्झलडला जाऊन राहिला. तिथेच १९७७ साली तो गेला. त्याचं मरणही सरळ नव्हतं.
त्याची शवपेटिकाच चोरली गेली. चोरटय़ांना वाटलं तिच्या बदल्यात बक्कळ पैसे कमावता येतील. म्हणून त्यांनी चार्लीची एक पत्नी पॉलेट गोडार्ड..द गोल्ड रश या सिनेमातली नायिका.. हिला फोन करून सांगितलं..आम्ही चार्लीचं पार्थिव असलेली शवपेटी चोरलेली आहे. पॉलेट फक्त इतकंच म्हणाली.. बरं मग. आणि तिनं फोन ठेवला.
कोणता चार्ली खरा? पडद्यावरचा? की पडद्यामागचा?
याचं उत्तर शोधायचंच नसतं.
गेल्या आठवडय़ात चार्लीची १२५ वी जयंती झाली..त्या निमित्तानं हा प्रश्न पुन्हा फडा वर काढून आला..इतकंच.