शरद पवार यांच्या मनातले आणि कृतीतलेदेखील काही कळत नाही असे अनेकांना वाटेल. राज्यात विकासाचे मापदंड ठरणारी धोरणे आखणाऱ्या पवारांना विद्यमान राष्ट्रवादीतील कमालीची मुजोर वर्तणूक, सत्ता आपल्या रक्तातच असल्याचा घृणास्पद माज, कोण आपणास अडवणार आहे ही अरेरावी वृत्ती.. हे रोखता आलेले नाही.

तरुण पिढी हल्ली कशी आणि काय विचार करते हे कळेनासे झाले आहे, अशा अर्थाचे मत शरद पवार यांनी ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर व्यक्त केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात पुन्हा त्यांनी अशाच स्वरूपाचे विधान केले. विकासकामे केली म्हणून निवडून येतो, यावर विश्वास राहिलेला नाही, असे पवार म्हणाले. या दोन्ही विधानांचा संबंध पवार यांच्या राजकारणाशी आहे. प्रथम पवार यांच्या पहिल्या तरुणांबाबतच्या विधानाबाबत. पवार जे म्हणत आहेत त्यात काही आश्चर्य नसले तरी त्यात वेगळेपण हे की ही बदलाची दिशा पवार यांच्यासारख्या द्रष्टय़ा नेत्यास कळू नये. याचे कारण हे की महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा दिवंगत यशवंतराव चव्हाण ते दिवंगत वसंतराव नाईक यांचा काळ सोडला तर पवार हे महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय बदलाशी जोडले गेलेले आहेत. मग तो १९७८ साली दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा विषय असो वा अलीकडेच मावळलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचा अगदी शेवटच्या काही दिवसांसाठी पाठिंबा काढून घेण्याचा मुद्दा असो. पवारांच्या हाती स्थानिक राजकारणाची सूत्रे नाहीत असे गेल्या २५ वर्षांत क्वचितच झाले असेल. त्याही वेळी पवार यांनी दादांच्या पाठीत खुपसलेल्या खंजिराचा अर्थ अनेकांना लागला नव्हता आणि आजही तो पूर्णपणे लागलेला आहे, असे नाही. दिवंगत यशवंतराव यांना पवार आपले राजकीय गुरू मानतात. परंतु त्यांनाही पवार यांचे राजकारण कळत होते, असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणाबाबत दिवंगत इंदिरा गांधी यांचेही असेच मत होते आणि त्यांचे चिरंजीव दिवंगत राजीव हे जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा शरद पवार यांच्याविषयी राजीव यांना असेच वाटत होते. यात काही गैर आहे, असे नाही. याचे कारण राजकारणाचे स्वरूप. १९७८ साली जेव्हा पवारांनी पुलोदचा प्रयत्न केला त्या वेळी एका बाजूस संघीय आणि दुसरीकडे समाजवादी हे गुण्यागोविंदाने नांदत होते. ते कसे काय, हे कोठे कोणास समजले? परंतु याच समाजवादींचे एक गुरू दिवंगत मधू लिमये यांनी दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा पुढे करीत दिवंगत मोरारजी देसाई यांचे केंद्रातील सरकार पाडले होते ते का, याचे आकलन तरी कोणास झाले? म्हणजे महाराष्ट्रात संघीयांच्या मांडीला मांडी लागली तरी चालते पण दिल्लीत ते पंगतीला असले तरी चालणार नाही, असा त्यांचा दृष्टिकोन होता. तो अनेकांना कळला असे कसे म्हणावे? तेव्हा याचा मथितार्थ इतकाच की सर्वाना सर्वकाळ कळू लागले तर राजकारण हे राजकारण राहणार नाही. त्याची सेवादलाची शाखा होईल आणि त्या शाखांप्रमाणेच बंद पडेल. हा झाला इतिहास.
वर्तमानदेखील तितकेच गुंतागुंतीचे आहे. १९९९ साली पवार यांनी सोनिया गांधी यांच्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा काढत आपली वेगळी चूल मांडली. परंतु तरीही आपले हे अस्तित्वकारण गुंडाळून ठेवत ते काँग्रेसच्या हवेलीत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १५ वर्षे राहिले. त्यामागील अर्थ कोणास कळला? दिल्लीत जे झाले तेच महाराष्ट्रात घडले. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडणुकोत्तर सुलूख केला आणि येथेही राष्ट्रवादी १५ वर्षे सत्तेत राहिली. जनतेस या राजकारणाचेदेखील आकलन झाले नाही. पुढे ताज्या निवडणुकांनंतर काँग्रेसचे तारू बुडणार हे दिसू लागल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने ऐन समरांगणात पृथ्वीराज चव्हाण यांचा हात सोडला, त्याचे कारण तरी कोठे कोणास समजले? बदलाच्या वाऱ्यांची दिशा समजून घेण्याचे पवार यांचे कौशल्य खरे दिसले ते या निवडणुकीनंतर. भाजपला सत्तेसाठी कोणाच्या तरी पाठिंब्याची गरज लागणार आहे याचा अंदाज आल्याबरोबर पवार यांनी त्या पक्षास बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आणि भाजपचा पारंपरिक जोडीदार शिवसेना आणि खुद्द भाजप यांचीच साग्रसंगीत पंचाईत केली. हे काय आणि कसे झाले याच्या शोधात सेना अजूनही भिरभिरताना दिसते तर भाजप ठेचकाळताना. तेव्हा तरुणांच्या मनातीलच काही कळत नाही, असे नव्हे तर पवार यांच्या मनातले आणि कृतीतलेदेखील काही कळत नाही असे अनेकांना वाटेल.
आता राहता राहिला मुद्दा पवार यांच्या दुसऱ्या मुद्दय़ाचा. विकासकामे केली म्हणून पक्ष निवडून येईलच याची शाश्वती नाही, इतका बदल परिस्थितीत झाला आहे असे पवार म्हणाले. हे तसे खरोखरच झाले असेल तर आपली लोकशाही वयात येऊ लागली आहे, असे म्हणावयास हवे. याचे कारण असे की आतापर्यंत एखाददुसरे काही विकासकाम करावयाचे आणि त्याच्या जिवावर लोकसभा वा विधानसभांतील खुच्र्या उबवायच्या, असे वर्षांनुवर्षे झाले. आता जनता त्यास तयार नाही. हा बदल खरोखरच स्वागतार्ह. विकास ही कायमस्वरूपी चालणारी प्रक्रिया आहे, कंत्राटी मोहमलिद्यासाठी एखाददुसऱ्या प्रकल्पात रस घेणे म्हणजे विकास नव्हे, हे ज्याप्रमाणे जनतेस कळू लागले आहे त्याचप्रमाणे त्याचे भान पवार यांनाही निश्चित आहे. राज्याच्या राजकारणात पवार यांची आजही अबाधित असलेली उंची मोजली जाते ती त्यांनी तयार केलेल्या विकासाच्या मापदंडामुळेच. मग ती रांजणगाव वा हिंजवडी औद्योगिक वसाहत असो किंवा द्राक्षे वा फुलबागांची बाजारपेठ. त्याचे श्रेय नक्कीच त्यांना दिले गेले. परंतु राजकारणात घराणेशाही सहन करणारी जनता विकासाचे श्रेय वारसाहक्काने पुढच्या पिढीस देण्यास तयार नाही. स्वागतार्ह बदल झाला आहे तो हा. तो एकदा मान्य केल्यास आपल्या राष्ट्रवादीने विकासाचे कोणते प्रारूप गेल्या १५ वर्षांत राज्यास दिले, हा प्रश्न राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात विचारण्याचे धाडस खुद्द पवारांनीच दाखवावयास हवे होते. कमालीची मुजोर वर्तणूक, सत्ता आपल्या रक्तातच असल्याचा घृणास्पद माज, कोण आपणास अडवणार आहे ही अरेरावी वृत्ती आदी गुणांचा समुच्चय म्हणजे विद्यमान राष्ट्रवादी. कंत्राटदार आणि लाळघोटे यांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याने समाजाच्या कोणत्या घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला याचा आढावा एकदा खुद्द पवारांनीच घ्यावा. ते गरजेचे आहे. कारण राज्याचे नेतृत्व करू पाहणाऱ्याचे व्यक्तिमत्त्व कसे सर्वसमावेशक हवे, याचा आदर्श खुद्द पवारांनीच घालून दिलेला आहे. तेव्हा आपल्याइतकी नाही तरी त्या जवळपास जाईल इतकी तरी आपली पुढची पिढी कष्ट करते का, हे त्यांनीच पाहावे. आपल्या पक्षाने नव्या दमाच्या सोशल मीडियाचीदेखील कास धरावयास हवी, असा सल्ला थोरल्या पवारांना या शिबिरात द्यावा लागला. फोडणीचा भात करण्यासाठी ज्याप्रमाणे आधी भात असावा लागतो त्याचप्रमाणे सोशल मीडियाशी संपर्क वाढवण्याआधी मीडियाशी संपर्क असावा लागतो. आपण कोणालाच कसलेही उत्तर देणे लागत नाही, असे मानणाऱ्या राष्ट्रवादीच्या सध्याच्या नेत्यांचा असा संपर्क आहे काय? तेव्हा वास्तव हे आहे की या बदलांची निश्चित जाणीव पवार यांना आहे. परंतु प्रश्न हा आहे की या जाणिवेचे बीज ते पुढच्या पिढीत संक्रमित करू शकले आहेत किंवा काय? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर नाही असे आहे. ते होकारार्थी असते तर राष्ट्रवादी पक्ष हा विशिष्ट समाज आणि प्रदेशापुरता मर्यादित राहिला नसता.
यात बदल घडवायचा असेल तर तो आमूलाग्र करावा लागेल. नपेक्षा या वेळी शनिवारवाडय़ातून काका.. मला वाचवा अशी हाक येणार नाही. ती काका.. स्वत:ला वाचवा अशी असेल.