‘लोकसभेच्या निवडणुकीत मोदीलाटेमुळे शिवसेनेला यश मिळाले नाही. त्या यशात शिवेसेनेच्या कार्यकर्त्यांचेही योगदान मोलाचे होते’ या उद्धव ठाकरे यांच्या विधानाला ‘कृतघ्न’ म्हणण्याचा प्रश्नच येत नाही (संदर्भ : लोकमानस- १६ सप्टें.मधील पत्र). त्याचप्रमाणे, भाजप शिवसेनेला दुय्यम लेखत आहे हा समजही तितका बरोबर नाही. तसे असते तर भाजपने विधानसभेच्या जागावाटपाबाबतची बोलणी केव्हाच थांबवली असती. भाजपला सेनेची गरज असून सेनेचा उपयोग आपला पक्ष महाराष्ट्रात वाढविण्यासाठी आणि त्यासाठी आपले विचार सेनेमार्फत रेटण्यासाठी करायचा आहे, हे भाजपचे नेहमीचे तंत्र आहे.
स्वतंत्र विदर्भ व जैतापूर अणुप्रकल्प याबाबत भाजपचे विचार शिवसेनेच्या अगदी विरुद्ध आहेत हे सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत भाजपच्या आश्रयाने का होईना, बोलणी करत, रुसवे-राग दाखवत आपले अस्तित्व टिकवत मराठी अस्मिता टिकवल्यासारखे करावे हाच  पर्याय उद्धव ठाकरे यांचे सहकारी देताना दिसत आहेत. पण असे करण्यामुळे जैतापूर प्रकल्पाविरोधात स्थानिकांच्या सहकार्याने आंदोलन उभे करणाऱ्या शिवसेनेवर वचनभंग केल्याचा दोष येऊन भाजप नामानिराळा राहील.  

युतीधर्म की आकडेयुद्ध?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकांना महिनाभरापेक्षाही कमी कालावधी उरलेला असताना प्रमुख राजकीय पक्षांची युती, आघाडी होऊ शकलेली नाही. वेगवेगळी आकडेवारी समोर आणून आम्हीच मोठे असा दावा केला जातो आहे. या आकडेवारीतील एक मुद्दा आहे तो लढवलेल्या जागांच्या प्रमाणात जिंकलेल्या जागांचा. हे प्रमाण जास्त असल्याचा दावा करून आपले मोठेपण िबबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
 पण ही आकडेवारी फसवी असू शकते. कारण युती वा आघाडीचा धर्म पाळून एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सक्रिय हातभार लावत असेल, सहभागी पक्षाकडून तशीच मदत होत असेल तर दाव्यात अर्थ उरतो, अन्यथा सूज्ञांस सांगणे न लगे !
– दीपक काशिनाथ गुंडये, वरळी (मुंबई)
 
‘स्टार प्रचारकां’ची परीक्षा
भाजपचे स्टार प्रचारक अमित शहा लोकसभेमध्ये जरी प्रभाव पाडू शकले तरी विधानसभेमध्ये आपली जादू कितपत चालवू शकतील याबद्दल शंकाच आहे. कारण अजूनही शिवसेना आणि भाजप या दोन मोठय़ा पक्षांमधला जागांचा घोळ संपलेला नाही. शिवाय इतर लहान घटक पक्ष वाढीव जागांसाठी कुरबुर करत आहेतच. भरीस भर म्हणून आता मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा यावरून या दोन्ही पक्षांत चांगलीच जुंपली आहे, शिवाय भाजपमध्येच मुख्यमंत्रीपदाचे अनेक इच्छुक आहेत. या सर्वातून एक नाव ठरल्यानंतर, ‘स्टार प्रचारकां’ना प्रचारासाठी दिवसही कमीच उरतात.
अमित शहांची उद्दाम भाषा, त्यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकदिनाच्या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला, पण महाराष्ट्राला मात्र वगळले याची वेदनाही मतदारांच्या मनामध्ये कुठेतरी सलत असणार. अमित शहांच्या जागी गोपीनाथ मुंडे असते तर गोष्ट वेगळी होती. पण आता ते नाहीत हे भाजपचे दुर्दैव. या सर्व बाबी लक्षात घेत भाजपच्या स्टार प्रचारकाची प्रतिष्ठा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये पणाला लागेल, असे दिसते.
-अंकुश चव्हाण

. मग शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करायची कधी?
‘छुपा अभ्यासक्रम आणि शिक्षक दिन’ हा किशोर दरक यांचा लेख (१६ सप्टेंबर) वाचला आणि मुद्दे पटले. शिक्षक दिनाचा समारंभ हा शिक्षकांचा वार्षकि पोळाच आहे. पोळ्याच्या दिवशी शेतात वर्षभर राबणाऱ्या बलांची सन्मानपूर्वक पूजा केली जाते. त्यांना त्या दिवशी कोणत्याही शारीरिक कष्टातून मुक्त केले जाते. परंतु पोळ्याच्या दिवशी बलांना मिळणारे हे सुखसुद्धा शिक्षक दिनाच्या दिवशी केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या आणि महापालिकेच्या शिक्षण खात्याच्या धोरणलकव्यामुळे शिक्षक वर्गापासून हिरावले गेले!
शिक्षक दिन अध्ययन दिन म्हणून गेली ६० वष्रे शिक्षण क्षेत्रात शिक्षक सन्मानासाठी ओळखला जातो. परंतु पंतप्रधान मोदींच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या ‘आस्थे’मुळे शिक्षक दिनाचे रूपांतर बालदिनात झाले. आता भीती अशी वाटते, की ज्याप्रमाणे गुजरातमध्ये सन २००५ पासून शिक्षक दिनच जणू बालदिन म्हणून साजरा केला जातो, त्याचप्रमाणे यापुढेही सर्व देशभर पाच सप्टेंबरला आता मोदीभाषण दिन म्हणून साजरा झाल्यास नवल वाटू नये.
अर्थातच यानिमित्ताने शिक्षक वर्गाच्या समस्या, शिक्षकांचे प्रशिक्षण, शिक्षणसेवकांच्या व्यथा आणि त्यांचे सर्व देशभर होणारे विविध शासकीय शोषण, शिक्षणसम्राटांकडून शिक्षकांची होणारी फरफट अथवा त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा विकृत परिणाम आणि मुलांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी अशा महत्त्वाच्या मुद्दय़ांची चर्चा होईल असे वाटत नाही.. ती करायची कधी?
-रमेश जोशी, मुंबई<br /> 
कृषी क्षेत्राचे आध्यात्मीकरण नव्हे, पण नैतिकीकरण भलेच!
‘कृषी क्षेत्राचे आध्यात्मीकरण’ या शीर्षकाची बातमी (लोकसत्ता, १३ सप्टें.) वाचली. गेली काही वष्रे कृषी क्षेत्रात योगिक/ वैदिक शेती, सेंद्रिय शेती याबाबत बरेच वाद-संवाद घडत आहेत. नोव्हेंबर २०११मध्ये ‘भारतीय कृषी अनुसंधान परिषद’ आणि प्रजापिता ब्रह्माकुमारीज यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसाच्या चर्चासत्रामध्ये भाग घेण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांच्यातर्फे माझ्या अन्य  दोन सहकाऱ्यांसमवेत माझी निवड झाली होती.
सदर चर्चासत्रांमध्ये वरील विषयांवर सांगोपांग चर्चा झाली. पंतनगर कृषी विद्यापीठामध्ये या विषयावर त्यावेळेपासूनच संशोधन सुरू होते व त्याबाबतचे काही निष्कर्ष सदर चर्चासत्रादरम्यान मांडण्यात आले. त्याचप्रमाणे अन्य काही खासगी संस्था व व्यक्ती यांनी केलेले या विषयावरील संशोधनदेखील सादर करण्यात आले. संपूर्ण चर्चासत्रादरम्यान योगिक/वैदिक शेतीवाल्यांचा असा दावा होता की, या पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्नात वाढ होते व प्राप्त होणारे कृषी उत्पादन ‘जास्त चविष्ट, रुचकर व गुणात्मकदृष्टय़ा सरस’ असते. परंतु या बाबतची कोणतीही विश्वसनीय आकडेवारी चर्चासत्रादरम्यान सादर करण्यात आलेली नाही.
संपूर्ण चर्चासत्रादरम्यान कृषी शास्त्रज्ञ व वैदिक शेतीचे पुरस्कत्रे यांच्यादरम्यान अनेकदा वाद-विवादाचे प्रसंग उद्भवले. कारण वैदिक शेतीचे पुरस्कत्रे हे हवेत वार केल्याप्रमाणे उत्पादकता, गुणवत्ता व उत्पादनाचा टिकून राहण्याचा कालावधी (कीपिंग क्वालिटी) याबाबत गणने न देता विधाने करत होते.
या चर्चासत्रादरम्यान, ‘वैदिक शेतीबाबतचे संशोधन शास्त्रीय पद्धतीने करावे व त्याबाबतचे निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतरच याबाबतचा धोरणात्मक निर्णय घ्यावा’ असे सर्वसाधारण मत होते. त्याकरिता शास्त्रीय पद्धतीने प्रयोगाची आखणी करणे, शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलित करणे व उपलब्ध सांख्यिकी माहितीचे सांख्यिकी पृथक्करण करून त्याआधारे योग्य त्या निष्कर्षांवर येणे ही पद्धत अवलंबण्याबाबत सर्वसाधारण एकमत झाले.
 रासायनिक खते, कीटकनाशके, प्रतिजैविके, उत्प्रेरके, संजीवके यांचा अर्निबध वापर कृषी क्षेत्रात चालू आहे. त्याचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर होत आहे. त्यामुळे समृद्ध भारतीय कृषी परंपरेमधील प्राचीन ज्ञान व आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांच्या एकत्र मिलाफामुळे जर कृषी क्षेत्रामध्ये नतिकता वाढणार असेल आणि त्याचा विपरीत परिणाम कृषी उत्पादनावर होणार नसेल तर अशा प्रयत्नांचे स्वागत करावे असे मला वाटते. त्यामुळे सदर प्रयोगांकडे कृषी क्षेत्राचे ‘आध्यात्मिकीकरण’ या नजरेने न पाहता ‘प्राचीन ज्ञान व आधुनिक कृषी तंत्रज्ञान’ यांच्यातील ‘सुसंवादीकरण आणि सुसूत्रीकरण’ या पद्धतीने पाहावे असे मला वाटते. कारण फक्त भौतिकवाद हा मानवी समस्यांवरील एक मात्र उपाय आहे, असे अनेक महान शास्त्रज्ञसुद्धा मानत नाहीत आणि त्यामुळेच आज अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामाची सुरुवात करण्यापूर्वी सामुदायिक प्रार्थना करण्याची पद्धत सुरू झाली आहे.
– विष्णू सखाराम दांडेकर (सहायक प्राध्यापक,  पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय)  दापोली