शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची बातमी काल राज्यात माध्यमांद्वारे पसरल्यानंतर अनेकांच्या मनातील जुन्या घटनांच्या आठवणींचे कप्पे उघडले असतील. मुंबईच्या सागरी सेतूवर वेगाने गाडी चालविल्यावरून झालेल्या वादावादीनंतर सचिन सूर्यवंशी नावाच्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्यास विधान भवनाच्या आवारात लोकप्रतिनिधींकडून झालेल्या मारहाणीच्या आठवणीही जाग्या झाल्या असतील. लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांच्यातील नाते अनाकलनीय असे आहे, हे याआधीही अनेक घटनांनी स्पष्ट केले आहे. कानाशी मोबाइल घेऊन समर्थकांच्या गराडय़ात रुबाबात चालणारा लोकप्रतिनिधी आणि एखादी फाइल, बॅग हाती धरून निराकार मुद्रेने सोबत चालणारा केविलवाणा पोलीस शिपाई असे दृश्य ज्यांनी पाहिले असेल, त्यांना या नात्याची अंशत: उकल होऊ शकते. लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाच्या एखाद्या नेत्याने पोलिसांना मारहाण केल्याचे एखादे प्रकरण चर्चेत आले, की लोकप्रतिनिधीचे वर्तन आणि ‘सत्तेच्या गुर्मी’ची चर्चाही सुरू होते. आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नागपुरात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात मारल्यानंतर पुन्हा याच चर्चेला उधाण आले आहे. आमदार जाधव यांच्या राजकीय कारकीर्दीला ‘शिवसेना स्टाइल’चा वारसा नाही. याआधी ते राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार होते. मनसेला रामराम करून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि विधानसभेत ते आमदार म्हणून दाखल झाले. अर्थात, त्यांच्या विजयासाठी पक्षाची पुण्याई किती हा प्रश्नच आहे. कारण, वडिलांच्या पुण्याईवर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची व जिंकण्याचीही तयारी हर्षवर्धन जाधव यांनी केली होती. सुमारे चार वर्षांपूर्वी औरंगाबादेत  हर्षवर्धन जाधव यांची पोलिसांशी बाचाबाची झाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण राज्यभर गाजले. त्याच हर्षवर्धन जाधव यांनी आता चार वर्षांनंतर पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसाकडून लोकप्रतिनिधीदेखील सुरक्षित नसतील, तर सामान्य माणसाने काय करावे, असा सवाल चार वर्षांपूर्वीच्या त्या मारहाणीच्या प्रकरणानंतर सर्वत्र केला जात होता. आज त्यांच्याच बाबतीत नेमके उलटे घडले आहे. अर्थात, पोलिसास मारहाण केल्याचा हर्षवर्धन जाधव यांनी इन्कार केला असला, तरी त्यांच्यावर मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अशा वेळी, तोच जुना प्रश्न उलटय़ा अंगाने पुन्हा उपस्थित होऊ शकतो. लोकप्रतिनिधी जर कायदा हातात घेत असतील तर सामान्य जनतेने काय करावे, असा सवाल कुणी केला, तर प्रश्नकर्त्यांचे समाधान होईल, असे उत्तर लोकप्रतिनिधीकडे तयार असले पाहिजे. विधान भवनाच्या आवारात झालेल्या मारहाणीचे प्रकरण आणि कालचा नागपुरातील प्रसंग या दोन्ही घटना हाच प्रश्न अधोरेखित करणाऱ्या आहेत. हर्षवर्धन जाधव यांचे वडील दिवंगत रायभान जाधव यांनीदेखील कन्नड मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची आमदारकीची कारकीर्द ज्यांनी पाहिली, त्यांना त्यांच्यातील अभ्यासू, संयमी आणि सर्व प्रश्नांची सखोल जाण असलेला राजकीय नेता अजूनही आठवत असेल. राजकारणातील घराणेशाही किंवा वारसदारीचे राजकारण हा अलीकडे वादाचा मुद्दा असला तरी ज्यांचा वारसा घेऊन त्यांची पुढची पिढी राजकारण करते, त्यांनी आपल्या परंपरेची आठवण मात्र ठेवलीच पाहिजे. लोकप्रतिनिधीची प्रतिमा ठरविणाऱ्या ज्या अनेक गोष्टी समाजासमोर असतात, त्यामध्ये लोकप्रतिनिधी कोणाचा वारसा चालवितो, ही गोष्टदेखील महत्त्वाची असते. कारण त्या भांडवलावरही, एखाद्याला स्वीकारायचे की नाकारायचे याचा निर्णय जनता घेत असते.