बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर उभारले जात असून त्यांचे उत्तराधिकारी उद्धव ठाकरे यांनी हा हास्यास्पद प्रकार थांबवण्याची गरज आहे. परंतु तेच या असल्या मार्गाने जाताना दिसतात.. हाताला शिवबंधाच्या धाग्यात अडकवायचे आणि नंतर कै. बाळासाहेबांच्या मूर्तीवर जाऊन डोके ठेवायचे असे केल्याने चारधाम यात्रा केल्याचे पुण्य पदरात पडते असाही दावा हा पक्ष करू शकेल.
‘देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या. समाजबहिष्कृत पडल्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या लक्षावधी लोकांनीही आपल्या जिवाच्या समर्थनार्थ म्हसोबा, खसोबा, चेंडोबा असे अनेक ओबा देव साध्या दगडांना शेंदूर फासून निर्माण केले,’ असे स्पष्ट मत कै. केशव सीताराम ठाकरे यांनी आपल्या ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या निबंधात नमूद केले आहे. या कै. केसी ठाकरे यांना महाराष्ट्रात प्रबोधनकार या नावाने ओळखले जाते. या राज्यातील काही बुद्धिवादी, प्रयोगशील आणि पुरोगामी व्यक्तींत प्रबोधनकारांची गणना पहिल्या पाचांत होते. प्रबोधनकारांच्या बौद्धिक मशागतीच्या आधारानेच त्यांचे चिरंजीव कै. बाळ केशव ठाकरे यांनी शिवसेना या जाज्वल्य वगैरे पक्षाची निर्मिती केली. स्वत: शिवसेनाकार आपल्या बुद्धिवादी, तर्कसंगत भूमिकेसाठी ओळखले जात. शिवसेना स्थापन करताना भूमिपुत्रावरील अन्यायास वाचा फोडणे हा भावनिक प्रश्न जरी त्यांनी हाती घेतला तरी त्यांची भूमिका कधी तर्कास सोडून भरकटली नाही. आपल्या हयातीत बाळासाहेबांनी कधी कर्मकांडास महत्त्व दिले नाही. परंतु त्यांच्या निधनास वर्ष होत नाही तोच त्यांच्याच तत्त्वाला शिवसेना तिलांजली देताना दिसते. ज्या बाळासाहेबांच्या हयातीत राजकारणात अंधश्रद्धा वाढेल असे शिवसेनेकडून काही झाले नाही, त्याच बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी आपल्या दिवंगत नेत्यास मंदिराच्या गाभाऱ्यात कोंडण्याच्या प्रयत्नात दिसतात. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे कै. बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर उभारले जात असून त्यांच्या जन्मदिनी, २३ जानेवारीस या मंदिरात बाळासाहेबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा घाट घातला जात आहे. मंदिरातील प्राणप्रतिष्ठेआधी बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नी कै. मीनाताई यांच्या पुतळय़ांची हत्तीवरून मिरवणूक काढली जाणार असल्याचेही जाहीर झाले आहे. या दोघांच्या मूर्ती पंचधातूच्या आहेत आणि शंकराच्या देवळात त्यांची सुमुहूर्तावर स्थापना केली जाणार आहे. या मूर्तिपूजनामुळे आपणास पुण्य लागेल असा विचार शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने केला असावा. एकदा का मंदिर उभे राहिले की त्याच्या नावाने पुण्यसंचयाच्या उदात्त हेतूने अनेक गोष्टी करण्याची मुभा मिळते. कै. शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्याची कृती विद्यमान राजकीय नेत्यांचा एकंदर वकूब लक्षात घेता त्यांच्या व्यक्तिमत्त्वास साजेशी असली तरी सेनेचे ज्येष्ठ नेते या मुद्दय़ावर काय भूमिका घेतात हे पाहायला हवे. याचे कारण असले उद्योग कै. बाळासाहेबांना अमान्य होते. परंतु आता त्यांचेच पुतळे उभारून नवीन दुकानदारी सुरू होत असेल आणि सेना नेते मौन बाळगत असतील तर प्रकरण गंभीर आहे. मूळचा विचारप्रवाह क्षीण झाला की अनुयायांना असल्या जुजबी, तकलादू गोष्टी कराव्या लागतात. वास्तविक महाराष्ट्रात अशी राजकीय मूर्तिपूजनाची प्रथा नाही. या राज्याचे म्हणून एक बुद्धिनिष्ठ राजकारणाचे आणि पुरोगामी सामाजिक सेवेचे असे एक वैशिष्टय़ आहे. त्यास कडव्या बौद्धिकतेची पाश्र्वभूमी आहे. त्यामुळे एखादय़ा नेत्याच्या निधनानंतर त्याच्या नावाने आत्महत्येचा आततायी प्रकार महाराष्ट्रात घडत नाही आणि लोकप्रिय नेत्याची मंदिरेही उभारली जात नाहीत. हे असले प्रकार तामिळनाडू वा अन्यत्र घडतात. परंतु ही द्रविडी परंपरा महाराष्ट्रात आणण्यास शिवसेना उत्सुक दिसते. अन्यथा त्या पक्षाचे नेते कै. बाळासाहेबांच्या सपत्निक पुतळय़ांचा निर्णय घेते ना.
वस्तुत: बाळासाहेबांचे उत्तराधिकारी उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून हा हास्यास्पद प्रकार थांबवण्याची गरज आहे. परंतु तेच स्वत: या असल्या मार्गाने जाताना दिसतात. तिकडे बाळासाहेबांच्या पुतळय़ाची प्राणप्रतिष्ठा होत असताना त्याच दिवशी मुंबईत उद्धव ठाकरे सेना समर्थकांच्या हाती शिवबंधाची राखी बांधणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे नाशकातील पदाधिकारी अधिक हास्यास्पद की शिवबंधनाच्या धाग्याची कल्पना राबवणारे अधिक हास्यास्पद हे ठरवणे अवघड झाले असून त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी कै. बाळासाहेबांच्या पुतळय़ालाच कौल लावण्याचा पर्याय निवडला जाणारच नाही असे नाही. अलीकडे व्यक्तीप्रमाणे देवस्थानांच्या बाजारीकरणाचीही व्यवस्था होऊ लागली आहे. परिणामी साक्षात देवास लालबागचा राजा, ठाण्याचा सम्राट आदी नावांनी ओळखले जाते. अशी ओळख लोकांच्या मनात रुजली की या देवस्थानांचे बडवे आपापल्या मूर्ती किती नवसाला पावणाऱ्या आहेत, हेही सांगू लागतात. नाशिक आणि परिसर आधीच देवस्थानांचा म्हणून ओळखला जातो. वणीची देवी, त्र्यंबकेश्वर आदींच्या जोडीला बाळासाहेबांच्या पुतळय़ामुळे आणखी एका जागृत देवस्थानाची भर या परिसरात निश्चित पडू शकेल. भुजबळ फौंडेशनकडून या देवस्थानाच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकामाची मदतही होऊ शकेल आणि आज ना उद्या नाशिक फेस्टिव्हलच्या जलशात या देवस्थानाच्या जत्रेचाही समावेश होऊ शकेल. याशिवाय कुंभमेळय़ासाठीही नाशिक ओळखले जाते. नव्या देवाच्या देवळानंतर या कुंभमेळय़ास अधिकच महत्त्व येईल आणि त्याच काळात शिवसेनेचे अधिवेशनही तेथे भरवण्याची संधी पक्षास साधता येईल. हाताला शिवबंधाच्या धाग्यात अडकवायचे आणि नंतर कै. बाळासाहेबांच्या मूर्तीवर जाऊन डोके ठेवायचे असे केल्याने चारधाम यात्रा केल्याचे पुण्य पदरात पडते असाही दावा हा पक्ष करू शकेल. यातील अडचण एवढीच की अलीकडे जम्मू-काश्मिरातील माँ शेरोवालीच्या धर्तीवर तुळजापूरपासून राज्याच्या गल्लीबोळातील देवी मंदिरांतून भक्तांच्या हातास भगवापिवळा गंडा बांधला जातो. आता सेनाही या कामात उतरणार असून सेनेच्या शिवबंधनाचा रंगही भगवाच असेल हे उघड आहे. अर्थात त्यामुळे राजकीय पक्षाने गंडा घालणे या वाक्प्रचारास नवा अर्थ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. २३ जानेवारीच्या मुहूर्तावर सर्व सेना नेत्यांना हे गंडा घालण्याचे लक्ष्य ठरवून दिले जाणार असून वर्षभरात त्यांनी किती जणांना गंडा घातला त्याची यादी दै. सामनामधून प्रकाशित केली जाणार आहे, असे म्हणतात. असो.
कै. बाळासाहेबांनी हयातभर काँग्रेसच्या घराणेशाहीवर आणि त्या घराणेशाहीसमोर दंडवत घालणाऱ्यांच्या लाचारीवर सडकून टीका केली. परंतु त्यांच्या हयातीतच त्यांच्या पक्षाची सूत्रे चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्या हाती गेली. इतके दिवस सेना नेते सेनाप्रमुखांनाच कुर्निसात करीत. आता ते उत्तराधिकाऱ्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनाही वाकून सलाम करू लागले असून काँग्रेसमधील कथित लाचारी आपल्याही अंगात झिरपल्याचे आपल्या वागण्यातून दाखवू लागले आहेत. शिवसेनेचे मराठवाडय़ातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत खरे यांनी जाहीर समारंभात रा. रा. चि. आदित्य ठाकरे यांना चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला, हे याचे ताजे उदाहरण. आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दिवंगत संजय गांधी यांच्या पादुका वाहिल्या होत्या. त्याच शंकररावांच्या प्रदेशातील या चंद्रकांतांनी रा. रा. चि. आदित्यच्या चरणकमलांना जाहीरपणे वाकून स्पर्श केला. मात्र हा प्रसंग संभाजीनगरात (ज्यास जनसामान्य औरंगाबाद या नावाने ओळखतात) घडल्यामुळे काही जण अस्वस्थ झाले असून कुणाही समोर कधी न झुकणाऱ्या संभाजी महाराजांचा यामुळे अपमान झाल्याचे त्यांना वाटते.
पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात हे खरोखरच लाजिरवाणे आहे. कै. बाळासाहेब हे उत्तम राजकारणी होते. वेळेची अचूक जाण त्यांना होती आणि प्रचलित जनमताच्या विरोधात जाण्यास ते कधी कचरले नाहीत. असे असताना त्यांच्या मूर्ती उभारणे, देवळात ठेवणे, पक्ष कार्यकर्त्यांना शिवबंधनात (?) अडकवणे असले हास्यास्पद प्रकार टाळायला हवेत. शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेबांचा बाबामहाराज करण्याची काहीही गरज नाही.