पराजयाने खचून जायचे नसते आणि विजयाने उन्मादून. हा झाला सुविचार. व्यवहारात मात्र विजय आणि पराजय या दोन्ही गोष्टी पचण्यास कठीणच जाताना दिसतात. त्यामुळे पराजयानंतर माणसे चिडचिडी बनून आदळआपट करतात आणि विजयाने धांगडधिंगा घालतात. परवा वांद्रे विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर उभ्या देशास हेच पाहावयास मिळाले. ती निवडणूक अटीतटीची होती, हे खरेच. शिवसेनेचे राजकारण मुळात विविध द्वेषमूलक कल्पनांवर आधारलेले असते. त्याला या निवडणुकीत जुन्या हाडवैराची जोडही मिळाली. त्यामुळे शिवसेनेला साध्या पोटनिवडणुकीतील हा विजय पृथ्वीचे राज्य जिंकल्यासारखे वाटणे स्वाभाविकच आहे. तसे वाटण्यास कोणाची काही हरकत असण्याचे कारण नाही. शिवसेनेच्या विजयोत्सवासही कोणाची काही हरकत असण्याचे वा त्याने कोणाचा पोटशूळ उठण्याचेही काही कारण नाही. किंबहुना विजयाची झिंग तो साजरा करण्यातही असते. विजयानंतर छान वाद्ये लावून मिरवणूक काढावी, घोषणाबाजी करावी, झेंडे नाचवावेत. अशा वेळी फटाक्यांचे ध्वनिप्रदूषणही क्षम्य होऊन जाते. परंतु परवा शिवसेनेने ज्या पद्धतीने आपला विजय साजरा केला त्यात आनंद तर होताच, पण त्याला उन्मादाचा बट्टा लागलेला होता. तेथे काही कार्यकर्त्यांनी -आणि त्यातही शिवसेनेत ज्यांना रणरागिणी म्हटले जाते अशा महिला कार्यकर्त्यांनी- ज्या पद्धतीने जिवंत कोंबडय़ा नाचवल्या तो तर किळसवाणा असाच भाग होता. कोणी कोंबडय़ांचे पाय धरून त्यांना गरगर फिरवत होते, कोणी त्यांचे दोन्ही पंख हातात धरून नाचवत होते. ते करून आपण नारायण राणे यांना खिजवत आहोत असे त्यांना वाटत होते. याला त्यांचा भ्रम म्हणावा लागेल. कारण यातून ते आपल्या संस्कृतीचेच प्रदर्शन घडवत होते. भाऊ पाध्ये यांच्यासारख्या द्रष्टय़ा लेखकाने रंगविलेली हीच ती ‘राडा’ संस्कृती. महानगरांतील लुंपेन घटकांशी निगडित असलेली ही अपसंस्कृती आज गटार फुटावे तशी उभ्या महाराष्ट्रात पसरली आहे. त्याबद्दल एकटय़ा शिवसेनेला ओणवे उभे करणे गैर ठरेल, कारण आज ही संस्कृती अक्षरश: पक्षातीत आहे आणि पुन्हा ती केवळ राजकारणाशीच निगडित नाही, तर येथील समाजकारणानेही तिचा अंगीकार केला आहे. ‘जयंतीची मिरवणूक’च काय, पण माध्यमेसुद्धा त्यातून सुटलेली नाहीत. किंबहुना कोणाची माय न काढल्यास आपणास कोणी परखड, निर्भीड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मर्द समजणार नाही, असा भयगंड येथील अनेक नेत्यांपासून पत्रकारांपर्यंत दिसून येतो. ज्यांनी समाजाचे पुढारपण करायचे अशी ही मंडळीच जर अशा बुद्रुक विचारांची असतील तर त्यांचे अनुयायी तरी कसे निपजणार? एकेकटे असतात तोवर ते फार फार तर समाजमाध्यमांतून व्यक्त होतात. एकदा का त्यांची झुंड बनली की मग मात्र ती हिंस्रच होत आपल्या नख्या परजते. हा हिंसाचार म्हणजे नेहमीच तोडफोड वा हाणामारी अशा स्वरूपात असतो असे मानायचे कारण नाही. परवाचा हिंसाचार तर केवळ भाषिक होता, पण म्हणून त्याची तीव्रता कमी होत नाही. तो कोणा विरोधात होता यालाही खरे तर काहीच अर्थ नाही. कारण तो कोणत्याही पक्ष वा नेत्याविरोधात असो, अखेर तो जगातील अवघ्या मंगल, सुसंस्कृत गोष्टींविरोधातच असतो.