मराठी रंगभूमी ही आज देशातील अत्यंत प्रगत रंगभूमी मानली जाते, याचे कारण तिचा पावणेदोनशे वर्षांचा वैभवशाली इतिहास एवढेच नसून ती सतत प्रवाही, पुरोगामी आणि कालसुसंगत राहिली, हेही आहे. चित्रपटाच्या उदयानंतर संगीत रंगभूमी अस्ताकडे निघाली असता तिने कात टाकली, काळानुरूप आपले रूप बदलले आणि ती पुनश्च बहरली. त्यानंतरही अनेक चढउतार तिने अनुभवले. या सर्व घटना-घडामोडींची जिवंत साक्षीदार असलेली मुंबईतली दादरच्या शिवाजी मंदिरची वास्तू आज ५० वर्षांची झाली आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीशी तिचे अविचल नाते आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक रंगकर्मीला एक ना एक दिवस आपण शिवाजी मंदिरच्या मंचावर स्वत:ला जोखून बघावे असे वाटत असते, यातच या वास्तूची महत्ता दडली आहे. १९६५ साली जेव्हा मुंबईत बंदिस्त नाटय़गृह ही दुर्मीळ चीज होती त्या काळी शिवाजी मंदिर बांधले गेले. अर्थात त्याआधीही ते खुले नाटय़गृह म्हणून अस्तित्वात होतेच. परंतु शिवाजी मंदिरचा बंदिस्त रंगमंच उपलब्ध झाला आणि १२ महिने १३ काळ मराठी नाटकांना कायमस्वरूपी रंगमंच मिळाला. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, रहस्यनाटय़, बालनाटय़ अशा सर्व प्रकारांतली नाटके इथे सादर होऊ लागली. निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, रंगमंच कामगार यांच्या अनेक पिढय़ा शिवाजी मंदिरच्या मांडवाखालून गेल्या, मोठय़ा झाल्या. ८०-९० च्या दशकापर्यंत शिवाजी मंदिरचा कट्टा हा हौशी, होतकरू रंगकर्मीचा अड्डा होता. शिवाजी मंदिरमध्ये आपला हुन्नर दाखवायची संधी एक ना एक दिवस आपल्याला मिळेल आणि आपण मोठे होऊ, नावारूपास येऊ, हे स्वप्न उराशी बाळगत कटिंग चहावर दिवसचे दिवस ढकलत या अड्डय़ावर नित्य हजेरी लावणाऱ्या अनेकांचे हे स्वप्न पुढे साकारतही असे. यातले कित्येक जण शिवाजी मंदिरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छबिलदास रंगमंचावरून आलेले असत. छबिलदासच्या प्रायोगिक/ समांतर रंगभूमीवर नाटके करणारे रंगकर्मी आणि शिवाजी मंदिरचे नाटकवाले यांच्यात एके काळी विस्तवही जात नसे. परस्परांना ते कमी लेखत. कारण त्यांच्यातला एक असे आपल्याला रंगभूमीवर जे ‘प्रयोग’ करायचे आहेत, त्याकरता म्हणून नाटक करणारा; तर दुसरा- रसिकांचे रंजन करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधन करण्याचा वसा घेऊन नाटके करणारा. खरे तर दोघांचीही भूमिका मराठी रंगभूमी आणि मराठी संस्कृतीच्या उत्थानाकरता तितकीच महत्त्वाची होती. यथावकाश दोघांनाही आपले हे आग्रह दुराग्रह असल्याचे ध्यानी आले आणि त्यांच्यातला दुरावा संपला. म्हणूनच एके काळी छबिलदासवर सक्रिय असलेली मंडळी आज शिवाजी मंदिरमध्ये आपली ‘प्रयोगसिद्ध’ नाटके सादर करताना दिसतात. शिवाजी मंदिर ज्याने जिंकले, तो जगाच्या पाठीवर कुठल्याही रंगमंचावर हार खाणार नाही असे म्हटले जाते. ते खरेच आहे. याचे कारण शिवाजी मंदिरचा प्रेक्षक सुशिक्षित, सुजाण, दर्जेदार अभिरुची बाळगणारा आहे. त्याला उडदामाजी काळे-गोरे चोखपणे पारखता येते. शिवाजी मंदिरने जातपात, धर्म, वर्ण, िलगभेद असा कुठलाच भेदभाव न करता रंगकर्मीना त्यांच्या फक्त गुणवत्तेवरच जोखलेले आहे. या अर्थाने या वास्तूला सर्वधर्मसमभाव, समता आणि गुणग्राहकता आतूनच आकळली आहे आणि तिने ती आत्मगत केली आहे. म्हणूनच तर ९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेआधी शिवाजी मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे, हे एका कोकणी मुस्लीम प्रेक्षकाने शिवाजी मंदिरच्या ट्रस्टींना पत्र लिहून सावध केले होते. त्या पत्राधारे आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळेच शिवाजी मंदिर या हल्ल्यातून वाचले. या वास्तूच्या धर्मनिरपेक्ष पुण्याईमुळेच हे शक्य झाले. अशा या वास्तूचा आज सुवर्णमहोत्सवी सोहळा होत आहे, यापरती परम आनंदाची दुसरी गोष
्ट ती कोणती?