चित्रांतल्या फटकाऱ्यांचं कौतुक करायचं, असा एक रिवाज कलारसिक वगैरे लोकांमध्ये असतो. जी कलाकृती थेट आपल्यालाच फटकारे मारणार आहे, तिला मात्र हे रसिक कदाचित कलाकृती मानायलाच तयार होणार नाहीत. अर्थात, अशा काही लाख मराठी भाषक रसिकांनी नाकारलं, म्हणून शिल्पा गुप्तासारख्यांचं काही बिघडणार नाही..
चित्रं न रंगवणारे आणि तरीही ‘जागतिक कीर्तीचे दृश्यकलावंत’ ठरलेले अनेक भारतीय तरुण आज आहेत. शिल्पा गुप्ता त्यांपैकी एक.
‘जहांगीर आर्ट गॅलरी’त मुंबई आणि मुंबईबाहेरच्या काही कला महाविद्यालयांतून पदवी/ पदविकाधारक होणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांचं जे ‘पावसाळी प्रदर्शन’ दरवर्षी भरतं, तिथंही शिल्पा गुप्तानं (जेव्हा ती जागतिक कीर्तीची नव्हती, तेव्हा) काचेचं एक काउंटर मांडून तिथं गुलाबाच्या पाकळय़ा, बसचं तिकीट, एखादा लांबसडक केस अशा अगदी खासगी- पण- सार्वत्रिक वस्तू ठेवल्या होत्या.
 हा होता प्रेम किंवा माया दाखवून देण्याच्या वस्तूंचा स्टॉल.
 ‘नाहीतरी तुम्ही त्यानं दिलेल्या गुलाबाची पाकळी पुस्तकात जपणं म्हणजे प्रेम, किंवा तिचा तुटलेला एखादा केस जपून ठेवणं म्हणजेसुद्धा तिच्यासोबतच्या त्या क्षणाची आठवण, असंच मानता ना? मग या वस्तू तुम्हाला मी विकत्ये’ असं जणू शिल्पाचं म्हणणं होतं. ते तिनं इंग्रजीत मांडलंही होतं. ही कलाकृती फार महत्त्वाची नव्हती, पण लोकांना थेट आपापल्या जीवनपद्धतीतल्या एखाद्या गोष्टीचा विचार करायला लावण्याचा हेतू शिल्पाच्या कामांमध्ये १६ वर्षांपूर्वीसुद्धा होता!
‘लोकांना आपापल्या जीवनपद्धतीतल्या एखाद्या गोष्टीचा विचार करायला लावणं’ हे वाचायला जरा कठीण वाटेल, पण तसे विचार आपण एरवीही करीत असतोच. शिवाय ‘प्रश्न पाडणाऱ्या कलाकृती’ वगैरे एरवीही असतातच. शिल्पाच्या कलाकृतींनी जे प्रश्न पाडले ते- ‘ही कलाकृती आहे का?’ आणि ‘आपली जीवनपद्धती अशी कशी?’ अशा दोन्ही प्रकारचे होते.
उदाहरणार्थ, लंडनमध्ये २००७ साली निमंत्रित चित्रकार म्हणून गेली असता शिल्पानं शहरातल्या मध्यवर्ती (पिकॅडली) ठिकाणी एका फ्लॅटमध्ये १०० बॅगा ठेवल्या.. या बॅगांवर पांढरं जाड कापडाचं आवरण होतं आणि त्यावर लिहिलं होतं : धिस कन्टेन्स [नो] एक्स्प्लोझिव्हज- यात स्फोटक पदार्थ [नाही] आहेत.. या अशा बॅगा, त्या फ्लॅटमधून कुणीही उचलाव्यात, जिथं जायचंय तिथं जावं आणि परत फिरून इथंच ती बॅग ठेवावी.. शिल्पा फक्त त्या बॅग घेऊन फिरणारांचे पाच-सहा फोटो काढणार. ही एवढीच ‘कलाकृती’ तिनं लंडनपाठोपाठ बर्लिनलाही केली आणि दिल्लीच्या वढेरा आर्ट गॅलरीनं तर मासिक मावू शकेल, अशा आकाराची कापडी बॅगच शिल्पाचं ते वाक्य छापून विकायला काढली- किंमत २०० रुपये, त्यामुळे अनेकांनी ती घेतली. ‘धिस कन्टेन्स [नो] एक्स्प्लोझिव्हज’ असं बॅगेवर म्हणत, कुणाहीजवळ स्फोटक पदार्थ असू शकतात असा आजचा काळ आहे आणि आपण सगळे जण एकमेकांकडे संशयानंच बघतोय याची विचित्र कबुली देत या बॅगा अनेक भारतीय कलाप्रेमींनी वापरल्यात.
मुंबईतल्या ऑक्सफर्ड बुक स्टोअर या पुस्तकांच्या महाग दुकानात ‘युअर किडनी सुपरमार्केट’ हे प्रदर्शन शिल्पानं केलं होतं. भारतीय गरिबांची पिळवणूक आणि फसवणूक करून त्यांचं एखादं मूत्रपिंड कसं काढून घेतलं जातं इथपासून ते ‘किडनी काळय़ाबाजारात पट्कन मिळते आणि आलिशान वैद्यकीय सेवाही मिळतात, असा भारत हा जगातला एकमेव देश’ इथवरचं दर्शन अभ्यासू- पण- कल्पकपणे तिनं घडवलं होतं. या दुकानाच्या सर्व विभागांमध्ये हे प्रदर्शन विखुरलेलं होतं. मात्र ‘पुस्तकांसारखंच मोठ्ठं किडन्यांचं दुकान- युअर किडनी सुपरमार्केट’ ही संकल्पना पोहोचवण्यात हे प्रदर्शन यशस्वी ठरलं की नाही, कोण जाणे.
श्रद्धा आणि अंधश्रद्धेची विज्ञानयुगातली सरमिसळ दाखवणाऱ्या दोन ‘ऑनलाइन’ कलाकृती शिल्पानं दहाएक वर्षांपूर्वीच केल्या, त्यापैकी एक होती ‘ब्लेस्ड बॅण्डविड्थ’ नावाची रीतसर वेबसाइट आणि दुसरी, ‘आय अॅम युअर गॉड’ हा संगणकातला व्हायरससारखाच ‘बग’ या स्वरूपात. त्यातला ‘गॉड’ पुरेसा निराकार होता आणि तो निराकार प्राणी उच्छादच मांडायचा- माझं हे करा, मला ते करा- अशा विनाकारण आज्ञा तो देत सुटायचा. ब्लेस्ड बॅण्डविड्थ.कॉम ही वेबसाइट एरवी अगदी साधीशी वाटे. पाच धर्माची पाच महा-श्रद्धास्थानं इथं होती. ‘आमच्याच अंधश्रद्धा का दिसतात’ या सनातन प्रश्नाला इथं अज्जिबात स्थान नव्हतं. प्रभादेवीचा सिद्धिविनायक, हाजी अली, माउंट मेरी, दादरचा गुरुद्वारा आणि खास नवश्रद्धावंतांसाठीची ‘पेशकश’ म्हणून श्री श्री रविशंकरजीसुद्धा. इंटरनेटवर ‘ब्लेस्ड बॅण्डविड्थ.कॉम’ हे स्थळ ज्या बॅण्डविड्थद्वारे कार्यरत राहणार होतं, ती बॅण्डविड्थ ज्या वायरद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचणार होती, ती वायरच शिल्पा गुप्ता नामक उचापतखोर दृश्यकलावतीनं या साऱ्या श्रद्धास्थानांच्या गाभाऱ्यापर्यंत नेली होती. ‘हो, ती मी तशी नेल्ये. ही बॅण्डविड्थ अगदी ब्लेस्ड करून आणल्ये’ याची खात्री देणारी चित्रफीतही वेबसाइटवर, त्या त्या श्रद्धास्थानाशी जोडली होती. या वेबसाइटवरल्या तुमच्या पसंतीच्या श्रद्धास्थानाचा तुम्हाला आशीर्वाद असल्याचं सर्टिफिकेट, तुम्ही त्या आशीर्वादित तारेद्वारे घेऊ शकत होतात. हे स्थळ आता मुदत संपल्यानं बंद आहे. सिद्धिविनायकाच्या पायाशी लावलेल्या वस्तूंना शुभ समजण्याच्या श्रद्धेला मुदत कधी नव्हतीच, आणि असूही शकत नाही, श्रद्धा अमर्यादच असते हे सगळं सगळं आपण मान्य करू. पण शिल्पा गुप्ताची कलाकृती दोन-तीन र्वष इंटरनेटवर होती.
गुजरातमध्ये २००२ साली कशानंतर काय झालं आणि कोणी किती कोडगे खून केले याच्या तपशिलांबाबतचे मतभेद आजही आहेत. पण एक नक्की की, नंतर सगळा फायदाच फायदा, विकासच विकास झाला. आणखीही एक नक्की की, कुणीतरी आधीपासून दोषीच होतं. हा दोष ज्याचा त्याला देता यावा, यासाठी शिल्पानं एक प्रॉडक्ट बनवलं, त्याचं नाव ‘ब्लेम’. ही एक लहानशी बाटली होती. चौकोनी आकाराची, छोटय़ा फिरकीच्या झाकणाची. त्यावर लालभडक लेबल- ब्लेम! त्याखाली लिहिलंय- मी तुझ्या धर्मासाठी, जातीसाठी तुला दोष देत आहे.
या बाटल्या घेऊन शिल्पा गुप्ता मुंबईच्या लोकल गाडय़ांत फिरली होती. अनेक जणींना, जणांना भेटली.
म्हणाली- मला वाद घालायचाच नाहीये. मला फक्त हा ‘ब्लेम’ तुम्हाला द्यायचाय. घ्या नं.. तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता हे..
‘संकल्पनावादी कला’, ‘कलाघटित (हॅपनिंग)’ आणि ‘क्षणसत्य-जीवी कला (आर्ट परफॉर्मन्स)’ या प्रवाहांची सरमिसळ शिल्पाच्या कामांत आढळते, असं अभ्यासक म्हणतील. म्हणू देत. कलाभान या सदरातून पुन्हा चर्चेत आलेला ‘समाजचित्रं’ हा मराठी शब्द दृश्यकलेत किंवा आंतरशाखीय कलेत अर्थाच्या कितपत उंचीला जाऊन पोहोचू शकणार आहे, याचा शोध घेण्यासाठी शिल्पा गुप्ताची ही कामं उदाहरण म्हणून आपल्या उपयोगी पडतील. ‘समाजचित्र म्हणजे समाजाचं चित्र नव्हे. पाहणाऱ्याला, समाजाबद्दल प्रश्न पाडणारी कलाकृती म्हणजे समाजचित्र’ असा एक अर्थ निघतो. त्या अर्थानं शिल्पा गुप्ताच्या कलाकृतींची ही उदाहरणं पाहता येतीलच, पण ‘समाजचित्रं म्हणजे समाजातल्या प्रश्नांना, थेट समाजात घुसूनच मांडणाऱ्या कलात्म कृती’ असाही अर्थ तिच्या या कामांमधून लक्षात येईल. आपल्याला तेवढय़ावर थांबायचं नाही. चित्रकला किंवा एकंदर हल्ली चित्रकलेच्या नावाखाली जे प्रकार चालतात ते म्हणजे नुसती विकावीक, असं जर कुणा मराठी भाषक बंधुभगिनींना वाटत असेल तर त्यांनी जरा शिल्पा गुप्तासारख्यांच्या अशा कामांचाही विचार करावा. समाजचित्रातले ‘फटकारे’ थेट समाजाला लगावण्याची धमक चित्रकाराकडे असावी लागते. तशी ती स्वत:कडे आहे, हे शिल्पा गुप्ता यांनी गेल्या १६ वर्षांत वारंवार दाखवून दिलेलं आहे, म्हणून ते उदाहरण महत्त्वाचं.