येचुरी यांच्यानिमित्ताने माकपला सुसहय़ आणि संवादी चेहरा मिळाला आहे. बहुश्रुत आणि खुल्या आचारविचाराच्या येचुरींना पक्षाची गेलेली पत पुन्हा मिळवताना ज्या वर्गसंघर्षांला सामोरे जावे लागणार आहे त्याची जातकुळी नवी आहे..
राजकीय विचारधारेच्या उजवी-डावीकडे असलेले भाजप, काँग्रेस आदी प्रमुख राजकीय पक्ष नव्याने गरिबीच्या शोधात निघालेले असताना आद्य गरीबवादी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी सीताराम येचुरी यांची निवड होणे हा एक विचित्र राजकीय योगायोग. आपण किती गरीबवादी आहोत हे दाखवण्याची कर्कश अहमहमिका सध्या भाजप आणि काँग्रेस यांच्यात सुरू आहे. अशा वेळी माकपच्या सरचिटणीसपदी मात्र येचुरी यांच्या रूपाने सुसहय़ चेहरा येणे हे बदलत्या राजकीय परिस्थितीचे द्योतक मानावयास हवे. माकपच्या ९१ सदस्यांच्या मध्यवर्ती समितीने बऱ्याच चर्चा-परिसंवादांनंतर येचुरी यांच्या नावास अनुमोदन दिले. प्रकाश करात यांची जागा आता येचुरी घेतील. करात सलग तीन वेळा या पदावर निवडले गेले होते. माकपच्या नियमानुसार चौथ्यांदा हे पद कोणालाही मिळत नाही. तेव्हा करात यांच्या जागी नवा चेहरा दिला जाणार हे नक्की होते. या पदासाठी येचुरी यांच्याप्रमाणे एस रामचंद्र पिल्लई हेदेखील उत्सुक होते. ते केरळचे. त्यामुळे माकपचे जे काही मोजके बालेकिल्ले आहेत त्या केरळ शाखेने पिल्लई यांच्यासाठी आग्रह धरला होता असे म्हणतात. ते ७७ वर्षांचे तर येचुरी ६२. त्यात पिल्लई यांचे िहदी केविलवाणे, तर येचुरी बहुभाषाकोविदच. त्यामुळे पिल्लई यांच्या तुलनेत येचुरी यांना अधिक पािठबा मिळाला आणि डाव्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांची अखेर बिनविरोध निवड झाली. डाव्यांच्या काही चालीरीती उजव्यांसारख्याच असतात. बिनविरोध निवडीचा अट्टहास ही त्यातील एक. तेव्हा जे काही मतभेद असतील ते निवड प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यापर्यंत मिटवले जातात आणि एकमुखाने नवी निवड होते. त्यामुळे स्पर्धा असूनही येचुरी बिनविरोध निवडून आले, यात आश्चर्य नाही. सध्या डावे पक्ष झपाटय़ाने आकसत आहेत. ते रोखायचे असेल तर पक्षाची सूत्रे येचुरी यांच्यासारख्या सभ्य, सुसंस्कृत व्यक्तीकडेच हवीत. सध्याच्या उपलब्ध गणसंख्येत त्यासाठी फक्त येचुरीच लायक होते. येचुरी पोथीत बांधले गेलेले नाहीत. फुटबॉल, टेनिस आदी खेळांची आवड असणे म्हणजे काही बुझ्र्वा असे ते मानत नाहीत. त्यांचे संगीतावर प्रेम आहे आणि धूम्रपान ही त्यांची आवड आहे. एकाच वेळी नव्या पिढीशी प्रचलित विषयांवर चर्चा करीत असताना भारताचा प्राचीन इतिहास हादेखील येचुरी यांच्या अभ्यासाचा विषय आहे. रामायण, महाभारत आदी भारतीय महाकाव्यांचे त्यांचे अध्ययन आहे. संसदेतील अनेक भाषणांत ते पुराणातील दाखले देऊ शकतात ते यामुळेच. आपल्याकडे बऱ्याचदा डाव्यांची पंचाईत ही असते की त्यांना रशिया, चीन आदी देशांतील इतिहास मुखोद्गत असतो. परंतु ज्या भूमीत राजकारण करावयाचे त्या भूमीच्या इतिहासाशी ते अनभिज्ञ असतात. येचुरी यांचे तसे नाही. खेरीज, गृहस्थ मोकळाढाकळा आणि गप्पिष्ट. सारे तत्त्वज्ञानाचे ओझे आपल्याच खांद्यावर आहे आणि ऱ्हासाकडे निघालेला हा चंगळवादी समाज घडवण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे, असे ते मानत नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी सहज संवाद होऊ शकतो. येचुरी यांचे पूर्वसुरी करात हे हेकेखोर होते. आत्यंतिक काँग्रेसविरोध हा त्यांचा राजकीय स्वभाव होता. त्याबाबत ते त्यांचे पूर्वसुरी दिवंगत हरकिशन सिंग सुरजित यांची परंपरा चालवत. या टोकाच्या काँग्रेसविरोधामुळे दिवंगत ज्योती बसू यांना पंतप्रधान करण्याची चालून आलेली संधी सुरजित यांनी लाथाडली. असला कपाळकरंटेपणा येचुरी निश्चितच करणार नाहीत.
परंतु तशी वेळ पुन्हा येईल का, हा खरा प्रश्न येचुरी यांच्यासमोर असेल. आज संसदेत त्यांच्या पक्षाचे जेमतेम नऊ खासदार आहेत. पश्चिम बंगालसारखे राज्य हातातून गेले आहे आणि केरळमध्येही विरोधी पक्षातच बसायची वेळ त्यांच्या पक्षावर आली आहे. त्रिपुरा या राज्यातील सरकार हीच काय ती त्यातल्या त्यात त्यांच्या पक्षाची जमेची बाजू. सत्ता नसणे हा डाव्यांपुढील समस्येचा एक भाग. परंतु त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे पक्ष वैचारिक, राजकीय क्षितिजावर कालबाहय़ ठरू लागणे. ही कालसापेक्षता गमावणे हे डाव्यांपुढील खरे आव्हान आहे. येचुरी यांनाही याची जाणीव आहे. तिचा उल्लेख त्यांनी सरचिटणीसपदी नेमणूक झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना केला. खरे तर डाव्यांची ही कालबाहय़ता वैश्विक आहे असे नाही. भांडवलशाहीची गंगोत्री असणाऱ्या अमेरिकेच्या आसपास अनेक देशांत आज डावे वा समाजवादी सत्तेवर आहेत. परंतु भारतात मात्र त्यांची घसरण सुरू आहे. ही जनतेशी तुटलेली नाळ पुन्हा जोडणे हे येचुरी यांना जमणार असेल तर आणि तरच माकपचा विस्तार सोडा पण निदान आहे ते कार्यक्षेत्र तरी राखता येईल. त्याआधी आपले हे असे का झाले, याचा विचार येचुरी यांना करावा लागेल. त्यांनी तो अर्थातच केलाही असेल. प्रस्थापितविरोध हेच भागधेय असणाऱ्या पक्षाचे प्रस्थापित होणे हेच माकपच्या अस्तित्वास नख लागणारे ठरल्याची जाणीव येचुरी यांना एव्हाना झाली असेल. हे माकपचे नैसर्गिक प्रस्थापितविरोधी स्थान हिरावून घेण्यात दोन पक्षांचा वाटा मोठा आहे. एक म्हणजे ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस आणि दुसरा पक्ष म्हणजे अलीकडेच जन्माला आलेली आम आदमी पार्टी. हे दोन्हीही पक्ष एके काळी डावे जी भाषा बोलत तीच भाषा बोलतात. डाव्यांच्या तुलनेत जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनांची क्षमता या दोन पक्षांनी अधिक सिद्ध केली. खेरीज, १९९१ नंतर देशात झालेल्या नवमध्यमवर्गाच्या उदयाकडे डाव्यांनी दुर्लक्ष केले. कालचा कामगार वर्ग आज नामशेष होत असताना आजचा उगवता मध्यमवर्ग अर्थविचाराने कालच्या कामगार वर्गाची जागा घेऊ लागला आहे, हे डाव्यांनी ध्यानातच घेतले नाही. ते या वर्गाकडे बुझ्र्वा म्हणूनच पहात राहिले. त्याचा त्यांना चांगलाच फटका बसला. त्याच वेळी उदयास येत असलेला ‘आप’ वा पश्चिम बंगालमधील तृणमूल हे पक्ष या नव्या मध्यमवर्गाची भाषा बोलू लागले होते. मध्यमवर्ग असला तरी तो आíथक आघाडीवर कालच्या कामगार वर्गाइतकाच पिचलेला होता आणि आहे. कालचा कामगार वर्ग आर्थिक हलाखीच्या बरोबरीने संवेदनशून्य व्यवस्थेने गांजलेला होता. आजचा मध्यमवर्ग आर्थिक आघाडीवर काही अंशी बरा असेल परंतु भ्रष्टाचार आदी कारणांमुळे तो व्यवस्थेकडून नाडला जात आहे. त्यांच्याकडे डाव्यांनी लक्ष दिले नाही. परिणामी हा वर्ग डाव्यांपासून दूर गेला. त्याच वेळी धर्म नावाच्या अफूच्या गोळीने भाजपने कालच्या मध्यमवर्गातून विकसित झालेल्या आजच्या उच्च आणि निम्न मध्यमवर्गीयास आकर्षति केले. हे दोन्ही वर्ग मोठे होते आणि धर्माधिष्ठित खोटय़ा अस्मितांनी वाहून जाण्यास ते तयार होते. त्यामुळे तो वर्गही डाव्यांपासून दूर गेला. उरलेला उच्च आणि अतिउच्च वर्ग डाव्यांकडे कधी नव्हताच. त्यामुळे त्या आघाडीवरही डावे मागे पडले.
अशा तऱ्हेने डावे मोठय़ा प्रमाणावर मागे पडत गेले. त्यांना पुढे आणणे, ते कालबाहय़ झालेले नाहीत हे सिद्ध करणे हे येचुरी यांच्यासमोरील कडवे आव्हान असणार आहे. मानवी संस्कृतीला काही भविष्य असेल तर ते फक्त समाजवादातच असेल, असा ठाम विश्वास येचुरी यांनी आपल्या निवडीनंतर व्यक्त केला. तो सार्थ ठरवण्यासाठी आपल्या संकुचित राजकारणाची लक्ष्मणरेषा या सीतारामास ओलांडावी लागेल.