चिनी कम्युनिस्ट पक्षातील सर्वोच्चपदी आल्यापासून अध्यक्ष जिनिपग पद्धतशीरपणे आपल्या विरोधकांना, संभाव्य आव्हानवीरांना संपवू लागले आहेत.  प्रचंड आर्थिक ताकद आणि सर्वाधिकार  फक्त अध्यक्षांकडेच असल्याने जागतिक राजकारणात काळजी व्यक्त होत आहे.
संघनायक हा एकच हवा, हे मान्य. तसा तो नसेल तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते आणि नक्की कोणाचे काय ऐकायचे याबाबत व्यवस्थेत संभ्रम पसरतो, हेही मान्य. परंतु म्हणून संघनायकाने सर्व स्तरातील सर्वाधिकार स्वत:कडेच ठेवणे अपेक्षित नसते. कारण अधिकाराचे विकेंद्रीकरण हा कोणत्याही व्यवस्थेच्या कार्यक्षमतेचा आणि सत्ता संतुलनाच्या चलनाचा पाया असतो. या तत्त्वाकडे दुर्लक्ष केल्यास काय होते याचे भयावह, ढळढळीत उदाहरण चीनच्या रूपाने समोर आले असून प्रत्येक विचारी भारतीयाने ते समजून घेणे अत्यावश्यक आहे.
चीनमधील एका किरकोळ न्यायालयाने गेल्याच आठवडय़ात त्या देशाचे माजी अंतर्गत सुरक्षाप्रमुख झू योंगकॉँग यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या निकालाने केवळ चीनच नव्हे तर जगभरातील चीन अभ्यासक हादरले असून आता पुढे त्या देशात काय वाढून ठेवले असेल या विचाराने अस्वस्थ झाले आहेत. याचे कारण हे योंगकॉँग ही त्या देशातील अगदी अलीकडेपर्यंतची बडी असामी. ते जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांच्या हाती चीनमधील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेच्या जोडीला न्यायव्यवस्था आणि चीनमधील प्रचंड तेल कंपन्यांचे नियंत्रण होते. या तेल कंपन्यांच्या नियंत्रणातूनच योंगकॉँग यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे आणि तो सिद्धही झाला आहे. आपल्या मर्जीतील कंपन्यांना तेलासंबंधी विविध कंत्राटे देणे, पत्नी आणि चिरंजीवांची वर्णी अशा लाभधारी कंपन्यांत लावणे आणि आपला सत्ताधिकार वापरून यातील कशाचाही बभ्रा होऊ न देणे हे त्यांच्यावरचे आरोप. या असल्या भ्रष्ट उद्योगांतून योंगकॉँग यांनी जमवलेली माया स्तिमित करणारी आहे. योंगकॉँग आणि कुटुंबीयांची एकूण मालमत्ता १४५० कोटी डॉलर इतकी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला तेव्हा सामान्य चिनी नागरिक ते चीन अभ्यासक यांपकी कोणालाही आश्चर्य वाटले नाही. कारण हा साम्यवादी इतिहास आहे. जनतेच्या नावाने राज्य करावयाचे, कष्टकऱ्यांच्या हक्कांची भाषा करायची आणि प्रत्यक्षात मात्र स्वत:चीच धन करायची हा जगभरातील अनेक लालभाईंचा उद्योग. साम्यवादाची गंगोत्री असलेल्या तत्कालीन सोविएत रशियातही हेच सुरू होते आणि आहे. या लालभाईंकडून देवघरात बसवले गेलेल्या स्टालिन, क्रुश्चेव यांच्यापासून ते ब्रेझनेव यांच्यापर्यंत हीच परंपरा जोमाने वाढली. चीन त्यास अपवाद नाही. तेव्हा चीनचे सर्वोच्च नेते भ्रष्ट होते वा आहेत यात नवीन काही नाही. त्यातल्या त्यात नवीन असलाच तर योंगकॉँग यांच्यावर सिद्ध झालेला आरोप. हे योंगकॉँग दोषी सापडले ते फक्त १ लाख १८ हजार डॉलरची लाच घेतल्याच्या आरोपात. तो त्यांनी मान्य केला. आपण त्यास आव्हान देणार नाही असेही त्यांनी जाहीर केले आणि लगेच या ७२ वर्षीय नेत्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली. परंतु या सगळ्यापेक्षाही नवीन आहे तो यातून तयार झालेला सत्ताकारणाचा नवा आकृतिबंध.
त्याच्या केंद्रस्थानी आहेत चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग. चिनी कम्युनिस्ट पक्षातील सर्वोच्चपदी नियुक्ती झाल्यापासून अध्यक्ष जिनिपग पद्धतशीरपणे आपल्या विरोधकांना, संभाव्य आव्हानवीरांना संपवू लागले असून योंगकॉँग यांच्यावर झालेली कारवाई ही याच योजनेचा भाग आहे. याआधी गतवर्षी बो झिलाई यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना असेच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली नाहीसे केले गेले. बो यांच्यावर कारवाई झाली आणि पाठोपाठ योंगकॉँग  हे जनमानसातून गायब झाले. त्यानंतर योंगकॉँग यांचे जे दुय्यम सहकारी होते त्यांना वेचून तुरुंगात डांबण्यात आले. हे सर्व सुरू होते आणि आहे ते व्यापक भ्रष्टाचार निर्मूलनाच्या नावाखाली. या अधिकाऱ्यांना शिक्षा झाली, ते समाजजीवनातून दिसेनासे झाले आणि मग योंगकॉँग यांच्यावरील कारवाईची वातावरणनिर्मिती केली गेली. या कारवायांतील समान धागा म्हणजे त्यात सापडलेल्यांचा राजकीय विचार. बो काय किंवा योंगकॉँग काय. हे दोघेही राजकारणात आघाडीवर होते. त्यातील बो यांच्याकडे तर चीनचा उगवता तारा याच नजरेतून पाहिले जात होते आणि आज ना उद्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी ते विराजमान होणार हे स्पष्ट दिसत होते. परंतु जिनिपग यांच्याकडे सत्ता आली आणि त्यांनी बो यांचा काटा काढला. त्यांच्यानंतर योंगकॉँग यांच्यावर हीच वेळ येणार अशी भीती व्यक्त केली जात होतीच. अखेर तसेच झाले. वास्तविक बो यांच्याप्रमाणे योंगकॉँग हे काही जिनिपग यांना आव्हान नव्हते आणि ते सत्ताकारणातून निवृत्तही झाले होते. परंतु तरीही त्यांचा दोष हा की त्यांना सर्व चिनी उच्चपदस्थांची अंडीपिल्ली माहीत होती. अंतर्गत सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख या नात्याने योंगकॉँग यांच्या हाती सर्व नेत्यांच्या सर्व उद्योगांचा तपशील होता. जोडीला जमवलेली अमाप माया. त्यामुळे प्रसंगी हातातील पशाच्या आणि गुप्त माहितीच्या आधारे ते प्रस्थापित व्यवस्थेविरोधात काही उद्योग करणारच नाहीत याची खात्री अध्यक्ष जिनिपग यांना नव्हती. त्याचमुळे त्यांचा अडथळा दूर करणे हे जिनिपग यांना आवश्यक वाटले. परंतु तसे करणे त्यांना वाटते तितके सहजपणे शक्य झाले नाही. याचे कारण निर्णयाच्या कोणत्याही टप्प्यावर योंगकॉँग आपले तोंड उघडण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांच्यावरील खटला अत्यंत गुप्तपणे चालवला गेला आणि निकालानंतरच त्याची वाच्यता झाली. या मधल्या काळात जिनिपग यांनी योंगकॉँग यांच्याशी सरळ सरळ संधान बांधले आणि त्यांना जिवे न मारण्याच्या आश्वासनाच्या बदल्यात त्यांच्याकडून मौनाची कबुली घेतली. त्याचमुळे योंगकॉँग यांनी आपला गुन्हा मुकाटपणे मान्य केला आणि शिक्षेविरोधातही काही कुरकुर केली नाही. योंगकॉँग यांच्याप्रमाणेच त्यांच्या कुटुंबीयांनाही अभय देण्यात आल्याची वदंता आहे. या सगळ्याचा अर्थ इतकाच की भ्रष्टाचार खोदून काढण्याच्या नावे ही सारी कारवाई होत असली तरी तो केवळ बुरखा आहे. कारवाईमागील खरा उद्देश आहे तो आपल्या विरोधकांना संपवणे हाच. त्यामुळे योंगकॉँग यांच्यानंतर दुसरे माजी पॉलिट ब्युरो सदस्य लिंग जिहुआ यांच्यावरही अशीच अज्ञातवासाची वेळ येणार असे चीन अभ्यासक मानतात. जिनिपग यांचे एकंदर राजकीय चलनवलन लक्षात घेता हा अंदाज खोटा ठरणार नाही. चिनी राज्यकर्त्यांच्या असहिष्णूपणाची दंतकथा बनून गेलेले माओ त्झे डॉँग यांच्या पावलावर पाऊल टाकून जिनिपग निघाले असून ते उत्तरोत्तर असेच हुकूमशाही वर्तन करतील अशी भीती व्यक्त केली जाते.
जागतिक राजकारणात काळजी व्यक्त होते ती नेमकी याचबाबत. याचे कारण अजस्र आíथक ताकद कमावून बसलेला हा चीन नावाचा प्राणी यापुढे काय करेल याचा अंदाज बांधणे कोणासही शक्य नाही. गतसाली आपल्या चलनाच्या दरात एकतर्फी कपात वा वाढ करून याच चीनने अनेकांची डोकेदुखी वाढवली. आपल्या आसपासची स्वतंत्र बेटे गिळंकृत करून हाच चीन जपानी शांततेस नख लावत आहे. ब्रह्मपुत्रेवर अचाट धरण बांधून आपल्या ईशान्य प्रदेशांचे पाणी पळवण्याचा घाट याच चीनचा आणि हत्तींचे सुळे असो वा देवमासे वा भारतीय वाघ यांच्या जिवावर उठलेला चीनही तो हाच. तेव्हा या चीनचे काय करायचे हा प्रश्न समस्त विश्वासमोर आ वासून उभा ठाकला असून त्या देशात जिनिपग यांच्याखेरीज अन्य कोणालाही कसलेही अधिकार नसणे हे अधिक धोकादायक मानले जात आहे. चीनमध्ये शासन म्हणून कोणतीही व्यवस्था नाही. सत्ता संतुलनासाठी अशा व्यवस्था तयार होणे गरजेचे असते. त्यास चीनने कधीही महत्त्व दिले नाही. त्या काळात चीनचा हा ब्रह्मराक्षस तयार होत असताना चीनच्या एकमुखी नेतृत्वाचे अनेकांनी गोडवे गायले. परंतु संतुलन व्यवस्थांच्या अभावी एकमुखी नेतृत्व किती धोकादायक ठरते हे आता चीन दाखवून देत आहे.