‘नुसतं पाहूनच ओळखलं मी’ हे वाक्य आपण कितीतरी वेळा म्हणतो.. वेगवेगळय़ा संदर्भातही म्हणतो. नसलो म्हणत, तरी पाहून कळतंच आपल्याला! या पाहून कळण्याच्या प्रवासात काही जण चित्रकलेचाही एक थांबा आवर्जून घेतात.. बरेच जण हा कलापूर्ण टप्पा विसरतात. आपण भले कोणतंही चित्र कळतच नाही असं कितीही ठरवलं, तरी पाहून कळणारच की आपल्याला.. हेच, जरा नीटपणे सांगणारं नवं पाक्षिक सदर..

प्रत्येक समाज पाहणे, संवेदना ग्रहण करणे, अर्थन करणे, प्रतिसाद देणे याबाबतीत पाहण्याच्या काही सवयी निश्चित करतो. पाहणे, जाणीवपूर्वक लक्ष देऊन पाहणे, दुर्लक्ष करणे, न पाहाणे अशा या सवयी आहेत. या सवयींचा वापर करताना गरजेनुसार त्यांचा पोत, प्रकार हळूहळू विकसित होतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये लहानपणापासून होणाऱ्या संस्कारांतून या सवयी, वृत्ती झिरपतात.
दृश्यकलेसाठी पाहणे-जाणीवपूर्वक लक्ष देऊन पाहणे ही सवय अत्यंत महत्त्वाची आहे. अशा पाहण्याच्या पायावरच दृश्यकला अस्तित्वात येते. हे पाहणं दृश्यकलेचा गाभा आहे. आपण सोबत छापलेलं चित्र जाणीवपूर्वक लक्ष देऊन पाहू या.. तांत्रिक कारणांनी हे चित्र कृष्ण-धवल व छोटय़ा आकारात छापलंय. पण गुगल इमेजेसमध्ये जाऊन David Hockney-Bigger splash असं सर्च करा. रंगीत मोठय़ा आकाराची प्रतिमा पाहता येईल! चित्र लक्षपूर्वक पाहा.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच

चित्रामध्ये जे दिसतंय ते अगदी थेट आहे. स्विमिंग पूल, त्याच्या समोरची एक इमारत, समोर ठेवलेली फोल्डिंगची खुर्ची, दोन खजुराची झाडं आणि पाण्यामध्ये उडी मारल्याने उडालेलं पाणी- पाण्याचा फवारा! बऱ्याच वेळेला असं वाटेल की या चित्रात इतकं काय विशेष आहे? या चित्रात विशेष असं आहे की बऱ्याच sam04वेळेला निसर्ग चित्र-परिसर चित्र असं दिसतं की ते प्रत्यक्षातलं एका विशिष्ट ठिकाणचं नसून कुठच्या तरी, काल्पनिक ठिकाणचं वाटावं. बऱ्याच वेळेला अशीच चित्रं आपल्याला आकर्षक वाटतात, लक्ष वेधतात, आवडतात. या खेरीज डेव्हिड हॉकनी भर दुपारी, कोणी तरी स्विमिंग पूलमधे उडी मारल्याने उडालेलं पाणी- त्याचा फवारा, त्याचा आकार त्याने पाहिला. मानवाने केलेली कृती- पाण्यामध्ये मारलेली उडी यापेक्षा त्याचा परिणाम त्याने लक्षपूर्वक पाहिला. त्यातलं नाटय़ अनुभवलं व त्यातून हे चित्रं घडलं. फवाऱ्याचा निश्चित आकार पाहणं, चित्रित करणं ही कठीण गोष्ट आहे. कारण ती काही क्षणांत घडते-पूर्ण होते. ही क्षणार्धात घडणारी घटना त्याने लक्षपूर्वक पाहिली व त्यातली मजा त्याने अनुभवली, जी आपणही अनुभवू शकतो.
याखेरीजही या चित्राबाबत असंही म्हणता येईल की, हे चित्र भर दुपारी पोहोण्याच्या तलावातील पाण्याचा स्पर्श व त्या बरोबर पाण्यात उडी मारल्यामुळे, उडालेल्या फवाऱ्यामुळे होणारा धप् स्स्स् असा आवाज या अनुभवांचाही आहे. पोहू शकणाऱ्यांना तलावातील पाण्याचे तापमान, स्पर्श कळू शकेल, पाण्याचा आवाज तर सर्वाना ऐकू येईल. तुम्हाला आला का?
आपण हे काय करतोय? चित्र पाहायला शिकतो आहे का? प्रत्येक सदरात एकेक चित्र, चित्रकार यांची चित्रं पाहून चर्चा करणार का? तर थेट उत्तर ‘नाही’ असं आहे.
सुशिक्षित, मध्यमवर्गीय-सुसंस्कृत व्यक्तीवर चित्रकला-दृश्यकलेचे संस्कार झाले नसतील तर त्याला वैचारिक पातळीवर हे बोचतं की, वरवरच्या प्रतिसादापलीकडे चित्र ‘समजत’ नाही. परिणामी चित्रकार, दृश्यकलेतील जाणकारासमोर उद्गारवाचक प्रश्नात्मक विधान करतो, की तुमची चित्रकला किंवा मॉडर्न आर्ट, अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग समजत नाही बुवा!..

असं ऐकलं की कुपोषणाने बळी जात आहेत अशी बातमी वाचल्याने जसा धक्का बसतो तसं होतं. एकीकडे समकालीन दृश्यकला अनेक अंगांनी विस्तारत आहे असं वाटत असताना कलेबाबत आवश्यक ल.सा.वि.- रसग्रहण-प्रतिसाद क्षमता कमी आहे, तिचा अभाव आहे हे लक्षात येतं. परिणामी चित्र पाहणं समजण्याकरता, कलेचा इतिहास; परंपरा, शैली यांची माहिती, समज असणं गरजेचं आहे. त्याखेरीज चित्राची, दृश्यकलेची समज निर्माण होणं कठीण आहे अशी भूमिका घेणं योग्य ठरणारं नाही.

‘कळण्याची दृश्यं वळणे’ या सदरात असा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, की प्रत्येक व्यक्ती, समूह, समाजात, सार्वत्रिक-सामायिक पातळीवर दृश्य संकेत-भाषा वापरण्याच्या कोणत्या वृत्ती, सवयी असतात. या वृत्ती, सवयी चित्रं, दृश्यकला समजणे, रसग्रहण करणे यासाठी उपयोगी पडू शकतात का?

कारण प्रत्येक व्यक्ती, समाज दृश्य संकेत-भाषा वापरून सामाजिक अर्थाचा वापर करत, वैयक्तिक अर्थ निर्माण करत असते. दैनंदिन जीवनात हे सतत घडत असते. कलाकार हा शेवटी अशा समाजाचा भाग असतो व कलानिर्माण करत असतो. परिणामी वरवर कलेशी संबंधित न वाटणाऱ्या वृत्ती ह्य़ा दृश्यकला रसग्रहण उलगडून दाखवण्यास मदत करू शकतात. याचं एक दृश्यकलेबाहेरचं उदाहरण पाहू.

गेल्या दोन-तीन वर्षांत भारतीय समाजात बऱ्याच मोठय़ा प्रमाणावर राजकीय-सामाजिक घडामोडींना समाजातून मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. अण्णा हजारेंचं दिल्लीमधील भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, त्यातून आम आदमी पार्टीचा झालेला उदय ही घटना पाहू. या घटनेमुळे समाजात गांधी टोपी या वस्तूचा, प्रतिमेचा अर्थ बदलला व तो समाजाने स्वीकारला. खादीची पांढरी टोपी मूळ काँग्रेसी, काँग्रेसचे नेते काही विशिष्ट वेळीच ती वापरतात. अगदी परवाच झालेल्या काँग्रेस स्थापना दिवसाचे फोटो पाहा. अनेक नेते जे नेहमी टोपी वापरत नाहीत ते टोपीत दिसतील. गंमत अशी की आर.एस.एस. अशीच टोपी वापरत, फक्त रंग वेगळा. तर ही टोपी अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे, भूमिकेमुळे पुन्हा एकदा उजळली. विशेष करून तरुणांनी ती मोठय़ा पातळीवर स्वीकारली. नाही तर गणपतीची मूर्ती आणण्यावेळीही, डोक्यावर टोपी घालायची सवय नसलेले अस्वस्थ होऊन पुरोगामित्वाचा आव आणत ती घालायला नकार देतात. अशा अर्थी एक गांधी टोपी पुन्हा प्रस्थापित झाल्यावर, त्याच्यावर लिखित मजकूर ‘मैं हू आम आदमी’ आला. इतरही बऱ्याच प्रकारचा मजकूर आला. समाजातील एका चळवळीने नवीन प्रतिमा, तिचा अर्थ व त्यानुसार नवा दृश्य संकेत निर्माण केला; झाला, वापरला, प्रस्थापित केला. अशी टोपी घालून आम आदमीपणा ‘मिरवणे’ हा एक कलानिर्मितीसारखाच प्रकार होता.
*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.
महेंद्र दामले – mahendradamle@gmail.com