ही जनावरे दिवसाला फारतर दीड ते दोन लिटर दूध देतात! पण म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही..
या वाणांची उपयुक्तता फक्त दूध देण्यापुरती आहे की बदलत्या काळात, संकराचे प्रयोग करणे शक्य आहे, याचा विचार होणे आवश्यकच आहे..
गेल्या काही दशकांमध्ये देशी गोवंशाची पिछेहाट झाली. त्यातही सर्वात वाईट स्थिती आहे विदर्भातील गवळाऊ गायी-बैलांची! अलीकडच्या प्राणिगणनेनुसार महाराष्ट्रात त्यांची संख्या ३६ हजार २५५ पर्यंत खाली आली. त्याच्या पाच वर्षे आधीचा आकडा पाहिल्यावर ही संख्या जास्त चिंताजनक वाटते, कारण आधीच्या गणनेत त्यांची संख्या सव्वा लाखाच्या आसपास (१ लाख २२ हजार २४२) होती, ती आता एक-तृतीयांशापेक्षाही कमी झाली आहे. हा झाला अधिकृत आकडा. या गायींचा अभ्यास करणारे सांगतात की प्रत्यक्षात शुद्ध गवळाऊ गायींची संख्या केवळ पाच ते सात हजार इतकीच उरली आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचा शुद्ध वंश पूर्णपणे नष्ट झाला तरी आश्चर्य वाटणार नाही..

पण काय फरक पडतो, गायीची एक प्रजाती नष्ट होण्याने? त्याच्या बदल्यात कितीतरी संकरित गायी उपलब्ध आहेत की, जास्त दूध देणाऱ्या आणि माणसाची दुधाची वाढती भूक भागविणाऱ्या! मग एकटय़ा गवळाऊची इतकी चिंता कशासाठी? मात्र, असा विचार करून चालणार नाही, कारण गवळाऊचा संबंध तिच्या एकटय़ा प्रजातीपुरता नाही, तर ती अनेक घटकांशी एकजीव झाली आहे, त्यामुळे गवळाऊ जाणे म्हणजे या गोष्टीसुद्धा आपल्यापासून दूर जाणं! या गायीची कहाणी अतिशय रंजक आहे, ती काही हजार वर्षांपर्यंत मागे जाते. दंतकथांनुसार तर ती अगदी महाभारत काळापर्यंत जाऊन भिडते. ही प्रजाती विदर्भातली, मुख्यत: वर्धा जिल्ह्यात आढळणारी! टोकदार नाकपुडी (रोमन फेस), सहा ते नऊ इंचांपेक्षाही आखूड शिंगं, स्वच्छ पांढरा रंग, वजनदार धुष्टपुष्ट शरीर अशी तिची वैशिष्टय़. दूध कमी देत असला तरी मेहनतीसाठी आणि सामान वाहून नेण्यासाठी हा वंश उपयुक्त! विशेष म्हणजे विदर्भातील असह्य उन्हाळा झेलूनही काम करणारी ही जात, तेसुद्धा कोणतीही विशेष काळजी न घेता. त्यामुळेच तर त्या उकाडय़ात इतर कोणत्याही जनावरांपेक्षा गवळाऊच्या बैलालाच प्राधान्य दिलं जातं. दिसायला पुष्ट आणि कामाला दणकट.. मग आणखी काय हवं? तिथच्या यादव अहिर अर्थात नंद गवळी समाजाने काळजीपूर्वक राखलेला हा वंश. त्यांना तिथं सोबत करण्यासाठी गवळाऊ अतिशय फायद्याची, कारण तिच्या खुरांची रचना अशाप्रकारे आहेत की अशा डोंगराळ प्रदेशात त्यांच्याइतक्या सहजपणे इतर कोणतेच जनावर वावरू शकत नाही. त्यामुळे मग सामान लादून न्यायचं असलं तर गवळाऊच उपयुक्त ठरते.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

ही गवळाऊ वध्र्यातच का? त्याबाबत कृष्णाने रुक्मिणीचे हरण केले त्या काळातील एक कथा सांगितली जाते. रुक्मिणी मूळची कौण्डिण्यपूरची म्हणजे आताच्या अमरावतीजवळची राजकन्या. तिचे हरण केल्यानंतर कृष्ण त्या राज्यात (वर्धा जिल्ह्य़ातील आरवी) राहिला आणि सासऱ्याने दिलेल्या दुधारू गायी राखण्यासाठी मथुरेहून काही लोक बोलावले. त्यांनी इथे या गायी जपल्या आणि टिकवल्या. त्यांनी या वंशाच्या चांगली जनावरे निवडून तो वंश पुढे वाढवला. याच गवळाऊ गायी. या गायींचे इतरही ऐतिहासिक संदर्भ आहेत. महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अरुण सिरोठिया यावर आणखी प्रकाश टाकतात. शिवाजी महाराजांनीही या गायी-बैलांचा उत्तम उपयोग करून घेतला. या काळात रसद आणण्यासाठी, पुरवण्यासाठी घोडय़ाऐवजी वापर केला. कारण या कामासाठी घोडे वापरले तर शत्रूला संशय यायचा, पण या वंशाची ही क्षमता ओळखून त्यांनी खुबीने उपयोग करून घेतला. खुद्द गांधीजींनी सेवाग्रामजवळ पिंपरी (वर्धा) येथे गोशाळा उघडून गवळाऊचे बीज जोपसले. काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही या गायींच्या चांगल्या प्रजेसाठी विदर्भात फार्म तयार केल्याचे उल्लेख आहेत.

गवळाऊ ही नंद गवळी समाजाची श्रद्धा आणि ओळखच! याशिवाय अनेक गोष्टी गवळाऊशी संबंधित आहेत. तिच्या दुधापासून बनलेली विदर्भातील ‘दहेगावची राजमलाई’ हे त्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण. तिची चव आजही जुन्या लोकांना आठवते. गवळाऊ टिकली नाही, तर या सर्वच गोष्टी इतिहासजमा होतात.. ती का टिकवायची? याची ही उत्तरं आहेत.

एकेकाळी अशाप्रकारे कृष्णाशी, महाराजांशी संबंधित असलेल्या गवळाऊची वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांची पिछेहाट सुरू झाली आहे. त्यांच्या शुद्ध वंशात भेसळीचं प्रमाण वाढलं आहे. नंद गवळी समाज त्यांचे पालन करतो खरे, पण आता या जनावरांची संख्या कमी झाली आहे. गवळाऊचे अभ्यासक डॉ. सिरोठिया यांच्या मते, या गायींच्या प्रजननासाठी चांगले सांड मिळत नाहीत, त्यामुळे अनेकदा अंतप्रजननही (इनब्रिडिंग) होते. त्याचा परिणामही जनावरांच्या संख्या घटण्यावर होत आहे. या जनावरांचा सामान वाहण्यासाठी उपयोग वाढल्यामुळे त्याच्या दूध देण्याच्या क्षमतेकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही, त्यामुळे सध्या ही जनावरे दिवसाला फारतर दीड-दोन लिटर दूध देतात. चांगल्या फार्ममधील गायींचे दुधाचे प्रमाण साडेतीन लिटपर्यंत जाते. मात्र, डॉ. सिरोठिया यांच्या माहितीनुसार १९५० च्या दशकात गोपुरी (वर्धा) आणि यवतमाळ येथील या प्रजातीच्या फार्ममध्ये ८-९ लिटर दूध देणारी कपिला गाय आणि १०-११ लिटर दूध देणारी मधुबाला गाय यांचा उल्लेख सापडतो. याचाच अर्थ या गायी दुधासाठी उपयुक्त होत्याच, पण दुर्लक्ष आणि योग्य प्रमाणात आहार न राखल्याने त्यांची ही क्षमता टिकली नाही.
सध्या कमी दूध देतात म्हणून या गायींकडे दुर्लक्ष परवडणारे नाही. कारण हे नुकसान केवळ गवळाऊचं नाही, तर त्याच्याशी जोडलेल्या सर्वच गोष्टींचे आहे. आपल्या आरोग्याचेसुद्धा आहे. कारण आपल्याकडील गायींचे (ज्यांच्या पाठीवर वशिंड आहे आणि गळ्याखाली पोळी आहे) दूध माणसाच्या शरीरासाठी अनुकूल व फायदेशीर आहे, त्याच वेळी होस्टन फ्रीजन यासारख्या संकर करण्यासाठी आणलेल्या गायींमधील प्रथिनं माणसासाठी त्रासदायक असल्याचे संशोधन आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे नुसतेच पोट भरेल, पण आपण ‘दुधा’ कडे परिपूर्ण अन्नघटक म्हणून पाहतो, ती गरज इतर दुधाने भागवली जाईलच असे नाही. विशेष म्हणजे काही पाश्चात्य देशांनीही भारतीय गोवंश नेऊन त्यांचा उपयोग करून घ्यायला सुरुवात केली आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
या पाश्र्वभूमीवर गवळाऊची उपयुक्तता व महत्त्वसुद्धा अधोरेखित होते. सध्या ‘दुधाचा महापूर’ आलेला असताना कमी दूध देणाऱ्या सर्वच प्रजाती हळूहळू नामशेष होत आहेत. या स्थितीत पुरेसा आहार, चांगला वंश राखण्यासाठी लक्ष दिले आणि संशोधन केले तर त्यांची दुधासाठी उपयुक्तता वाढवणे शक्य असल्याचे सिरोठिया यांच्यासारखे अभ्यासक सांगतात. तसे झाले तर ही उणीवही या गायी भरून काढतील. स्थानिक वंश टिकण्यासाठी या गायी महत्त्वाच्या आहेतच, शिवाय त्यांच्या वैशिष्टय़ांसाठीसुद्धा! म्हणूनच त्यांच्या ५ ते ७ हजार या आकडय़ाची चिंता करायची.. कारण त्या संपल्या तर जनावरं व शेतीतील विविधता कमी होईलच; त्याचबरोबर एक सांस्कृतिक ओळख पुसली जाईल