व्हेनेझुएलाचे दिवंगत अध्यक्ष चावेझ हे विरोधकांशी अत्यंत निर्घृणपणे वागत. मात्र सर्वसामान्य जनता आपल्या बाजूला राहील याची व्यवस्थित काळजी ते घेत. अशा राजकारणाची आणि घातक अर्थकारणाची एक किंमत चुकवावी लागते..

महासत्तेच्या कुशीत राहून सतत त्या सत्तेस आव्हान देत राहायचे असेल तर बराचसा वेडपटपणा आणि राजकीय चातुर्य दोन्ही असावे लागते. बुधवारी दिवंगत झालेले व्हेनेझुएलाचे अध्यक्ष हय़ुगो राफेल चावेझ फ्रायस यांच्याकडे हे दोन्ही गुण होते. वेडपटपणा वाटावा अशी मस्ती आणि आंतरराष्ट्रीय धटिंगणपणा या दोन्हींचा समुच्चय चावेझ यांच्यामध्ये होता. जगातील सर्व विद्यमान वा भावी हुकूमशहा आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जनकल्याणाच्या भाषेनेच करतात. चावेझ यास अपवाद नव्हते. परंतु अन्य हुकूमशहा आणि चावेझ यांच्यातील फरक हा की अन्यांच्या तुलनेत त्यांची राजवट ही बऱ्याच अंशी कल्याणकारी होती आणि हिंसकही नव्हती. चावेझ यांच्या व्हेनेझुएलास एक इतिहास आहे आणि प्रचंड तेलसाठय़ाचे वर्तमानही आहे. हा इतिहास दाखवतो की ज्या ज्या देशांत निसर्गाने खनिज संपत्तीची मुक्त हस्ते उधळण केली आहे ते ते देश त्या प्रसादावरच जगू लागतात आणि अप्रगत राहतात. खनिजसंपन्न असूनही अत्यंत मागास राहिलेले पश्चिम आशियातील देश याचे साक्षीदार आहेत. जवळचेच उदाहरण या संदर्भात पाहायचे झाल्यास बिहारचे देता येईल. उद्यमशीलतेचा अभाव असेल तर नैसर्गिक साधनसंपत्ती हा शाप ठरतो. १९६० साली युआन पाब्लो पेरेस अल्फान्सो या व्हेनेझुएलाच्या मंत्र्याने पहिल्यांदा हे ओळखले आणि जमिनीखालील तेलसंपत्तीच्या जिवावर लंडनच्या नाइट क्लब्समध्ये रात्रीचा दिवस करीत दौलतजादा करण्यात मश्गूल असणाऱ्या अरब शेखांना त्यांनी बजावले की योग्य प्रकारे हाताळले नाही तर तेल हा परमेश्वराचा प्रसाद न ठरता दैत्याची विष्ठा ठरेल. याच पाब्लो पेरेस यांनी मग पुढे जाऊन तेलसंपन्न देशांची ऑर्गनायझेशन ऑफ ऑईल एक्स्पोर्टिग कं ट्रीज, म्हणजेच ओपेक, ही संघटना जन्माला घातली. इतके दिवस अमेरिकी तेल कंपन्यांनी टाकलेल्या डॉलर तुकडय़ावर समाधान मानून मौज करणाऱ्या समाधानी अरबांना त्यामुळे आर्थिक भान आले आणि १९७४ साली तेल हे अस्त्र म्हणून वापरले गेले. त्या वेळच्या तेल संकटात पश्चिम आशियातील सौदी आदी देश आणि लॅटिन अमेरिकेतील व्हेनेझुएला यांनी अमेरिकेवर तेलाचा बहिष्कार घातला होता आणि त्यामुळे अमेरिकेची आणि त्यामुळे अर्थातच जगाचीही, अर्थव्यवस्था संकटात आली होती. इतिहासाची पुनरावृत्ती ही की त्याच तेलाचा चावेझ यांनी अस्त्र म्हणून वापर केला आणि अमेरिकेविरोधात आघाडी उघडण्याचा प्रयत्न केला. हे धाडसी होते. परंतु अशा धाडसासाठी जो अगोचरपणा लागतो तो चावेझ यांच्याकडे होता. त्याचमुळे अमेरिकेच्या अध्यक्षपदी धाकटे जॉर्ज बुश असताना चावेझ यांनी त्या महासत्तेला थेट आव्हान दिले होते आणि इराणचे महंमद अहमदीनेजाद आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन यांच्या मदतीने व्यापारी संघ तयार करण्याचा प्रयत्न केला होता. तो अर्थातच अयशस्वी झाला. परंतु त्यामुळे एकमेव महासत्तेच्या विरोधात जगभर किती नाराजी आहे ते उघड झाले. चावेझ यांनी तर पुढे जाऊन पुतिन यांच्या साहय़ाने आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या डॉलरची मक्तेदारी मोडण्याचाच प्रयत्न केला. दुसरे महायुद्ध संपत आलेले असताना डॉलर या चलनास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. त्यामुळे जगातील सर्व देशांचे एकमेकांशी असलेले व्यवहारही डॉलरमधूनच होतात. त्यामुळे अमेरिकेस त्याचा थेट फायदा मिळतो. तेव्हा या डॉलरचे कंबरडे मोडले तर अमेरिकेची मिजास मोडून काढता येईल असे मानणारा एक मोठा गट जागतिक राजकारणात आहेत. त्यातील बरेचसे आपले अमेरिकाविरोधी उद्योग छुपेपणाने करीत असतात. पण चावेझ यांचे तसे कधीही नव्हते. त्या देशाच्या शेजारी राहून ते अमेरिकेस सतत आव्हान देत राहिले. ब्राझील, क्युबा, बोलिव्हिया, निकाराग्वा, होंडुरास, इक्वेडोर आदी देशांना घेऊन अमेरिकेविरोधात आघाडी उघडायची, आपला स्वत:चा नाटोसारखा, पण अमेरिकाविरोधी असा, व्यापारगट तयार करायचा हे त्यांचे ध्येय होते. किंबहुना अमेरिकेच्या सर्व शत्रूंना एका व्यासपीठावर आणावे आणि आपण त्यांचे नेतृत्व करावे अशी खुमखुमीच त्यांना होती. दक्षिण अमेरिकेचा स्वातंत्र्यसेनानी व्हेनेझुएलातील सिमॉन द बोलिव्हिए या नेत्याने दोन शतकांपूर्वी या परिसरात समाजवादी विचारांचे बीज पेरले होते. त्यास पुढील काळात अनेक फळे लागली. जगभरातील क्रांतीचा रोमँटिक प्रतीक बनलेला चे गव्हेरा हा त्यापैकी एक. सिमॉन द बोलिव्हिए आणि चे गव्हेरा हे चावेझ यांचे आदर्श. त्यांच्या प्रेरणेने अमेरिकाविरोधी काही संघटना जन्माला आल्यादेखील. त्या अर्थाने त्यांची काही प्रमाणात का होईना ध्येयपूर्ती झाली. खेरीज आज अमेरिकेस वेढा असलेल्या देशांत समाजवादी म्हणवून घेणारी आणि अमेरिकेच्या भांडवलशाहीस विरोध करणारी सरकारे सत्तेवर आहेत, याचे o्रेय चावेझ यांच्यासारख्यांना जाते, हे मान्य करावयास हवे.
 वस्तुत: चावेझ यांचा राजकारणोदय झाला तो बंडखोर म्हणूनच. मूळचे ते लष्कराधिकारी. या परिसरातील अनेक देशांना लष्कराने राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा इतिहास आहे. व्हेनेझुएलात तो चावेझ यांनी रचला. १९९२ साली त्यांनी त्या वेळचे व्हेनेझुएलन अध्यक्ष कालरेस पेरेझ यांची सत्ता उलथून पाडण्यासाठी उठाव केला. बिकट आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी अध्यक्ष कालरेस यांनी काही कडक उपाययोजना जाहीर केल्या होत्या. त्यामुळेच जनतेत रोष होता आणि क्रांती करून त्यास तोंड फोडण्याचा चावेझ यांचा प्रयत्न होता. तो फसला. साहजिकच अध्यक्ष पेरेझ यांनी चावेझ यांना लष्करी तुरुंगात डांबले. या वेळी चावेझ यांच्या काही समर्थकांनी पुन्हा एकदा उठावाचा प्रयत्न केला. त्या वेळी चावेझ यांच्या समर्थकांनी टीव्ही केंद्र ताब्यात घेतले, त्यावरून चावेझ यांच्या भाषणाची ध्वनिचित्रफीत आणि अध्यक्ष कालरेस यांचे सरकार उलथून पाडण्यात आल्याची घोषणा प्रसारित करण्यात आली. तो प्रयत्नही अयशस्वी ठरला. त्यानंतर मात्र चावेझ सरळ राजकारणी बनले आणि सरकारविरोधात त्यांनी आघाडीच उघडली. सत्ता ही निवडणुकीच्या मार्गाने नव्हे तर बळावर हिसकावूनच घ्यायला हवी, असे त्यांचे मत होते. पुढे ते त्यांना सोडावे लागले आणि १९९८ साली निवडणुकीद्वारेच त्यांना सत्ता मिळाली. त्यानंतरचे चावेझ यांचे सगळे राजकारण हे आत्मकेंद्री राहिले. आपल्याला विरोध म्हणजे भांडवलशाही बगलबच्च्यांना पाठिंबा अशीच त्यांची मांडणी होती आणि त्यास त्यांनी चतुरपणे अमेरिकाविरोधी राजकारणाची किनार दिली होती. त्यामुळे व्हेनेझुएलात त्यांना विरोध करणारा हा थेट अमेरिकी हस्तक समजला जाऊ लागला. ही अशी मांडणी करणाऱ्यांची वाटचाल कळत नकळतपणे हुकूमशाहीच्या रस्त्यानेच सुरू असते. चावेझ हे त्याच मार्गाला लागले होते. परंतु तरीही अद्याप त्यांना व्हावा तितका विरोध मायदेशात होत नव्हता, याचे कारण त्यांच्या राजकीय चातुर्यात होते. आपल्या विरोधकांशी अत्यंत निर्घृणपणे वागणाऱ्या चावेझ यांनी सर्वसामान्य जनता आपल्या बाजूला राहील याची व्यवस्थित काळजी घेतली होती. तसे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे इंधनांच्या किमती कमी राखणे. सर्वसामान्य जनतेस व्यापक अर्थकारणात गम्य आणि इच्छा नसते. आपल्याला महिन्याला किती चिमटा बसणार यातच त्यांना रस असतो. याचे भान चावेझ यांना होते. म्हणूनच आजच्या काळातही व्हेनेझुएलात पेट्रोल हे फक्त दोन रुपये प्रतिलिटर या दराने विकले जात होते.
अशा राजकारणाची आणि घातक अर्थकारणाची म्हणून एक किंमत चुकवावी लागते. चावेझ जिवंत होते तोपर्यंत या किमतीची चर्चा झाली नाही. कारण ती करणाऱ्यांचा आवाज दाबण्याची ताकद त्यांच्याकडे होती. परंतु चर्चा झाली नाही तरी दुष्परिणाम थांबविता येत नाहीत. व्हेनेझुएला या देशास ते आता जाणवेल. त्यांच्या निधनाने समाजवादाचा एक अत्यंत मस्तवाल असा आविष्कार संपुष्टात आला आहे. समाजाच्या व्यापक संतुलनासाठी समाजास अशा असंतुलितांची गरज असते.