आपली व्यवस्था ही कमअस्सलांनाच डोक्यावर घेणारी असल्यामुळे अस्सलांना अन्य मार्ग शोधावे लागतात. ते कोणते हे अमेरिका वा अन्य देशांत स्थलांतरित होऊन झळाळती कामगिरी करून दाखवणाऱ्या भारतीय तरुणांनी दाखवून दिले आहे..
हे भारतात कधी तरी शक्य होईल काय? सुंदर पिचई हा चेन्नईत जन्मलेला तरुण मुलगा आयआयटी शिकून २००४ साली गुगल कंपनीत रुजू झाला आणि अवघ्या ११ वर्षांच्या सेवेनंतर त्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्याची नेमणूक झाली. गुगल ही केवळ कंपनी नाही. माहिती महाजालापासून आजही दूर राहणाऱ्यांना सांगावयास हवे की गुगल हे एक विश्व आहे. केवळ आभासात्मक वास्तवातून प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या गुगलने महाजालातल्या मदतनीसाच्या अवतारात कंपनीरूप घेतले आणि आज चालकरहित मोटारी ते त्रिमिती चित्रपट ते वैद्यकीय संशोधन ते चालकरहित ड्रोन विमाने अशा वाटेल त्या क्षेत्रात मुशाफिरी केली. आपल्याला समजणाऱ्या, परिचित अशा रुपयाचाच आधार घ्यावयाचा तर सांगता येईल की आज बाजारपेठेत साधारण २२ लाख कोटी रुपये इतके या कंपनीचे एकत्रित मूल्य आहे. अशा या कंपनीची सूत्रे सुंदर नावाच्या भारतीय तरुणाकडे वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी आली. यावरून त्याचा आणि असा निर्णय घेणाऱ्या व्यवस्थेचा मोठेपणा लक्षात यावा. मुदलात गुगलचेच वय १७ वष्रे इतके आहे. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी विद्याíथदशेत असताना या कंपनीची स्थापना केली. आज वयाच्या या कोवळ्या टप्प्यात ती जगातल्या अव्वल तीन नावांत गणली जाते. तरीही ती जगातली सर्वात मोठी कंपनी नाही. तो मान अॅपल या कंपनीचा. गुगलच्या दुप्पट, म्हणजे साधारण ४३ लाख कोटी रुपये इतके तिचे एकत्रित बाजारमूल्य आहे. परंतु माहिती क्षेत्रात अॅपलच्या पाठोपाठ मानाचे दुसरे कोणते पान मांडले जात असेल तर ते गुगलचे असते. याचे कारण नवीन स्वप्ने पाहण्याची आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याची या कंपनीची ताकद. गुगल मॅप असो अथवा अॅण्ड्राइड प्रणाली. हे सर्व गुगलचेच. तर या अशा अतिबलाढय़ कंपनीच्या प्रमुखपदी एक भारतीय तरुण निवडला जाणे हे नक्कीच अभिमानास्पद.
आणि तितकेच व्यवस्था म्हणून आपल्यास लाज वाटावी असे. अभिमान याचा की भारतीय शिक्षणव्यवस्थेतून पुढे आलेला एक तरुण आज जागतिक आघाडीच्या कंपनीचा प्रमुख बनू शकला. आणि तरीही लाज वाटावी अशी बाब म्हणजे तो भारतात होता तोवर काहीही करू शकला नाही. इंटरनेटचा जन्मच अवघा १९८९ सालातला. त्याच्या आधी संगणक आले होते. िवडोज ही बिल गेट्स या द्रष्टय़ाने विकसित केलेली प्रणाली त्याआधीच बाजारात आली होती. १९८४ साली राजीव गांधी यांचा राजकीय क्षितिजावर उदय होईपर्यंत संगणक हे काय आहे हे भारतीय समाजमनास तितकेसे समजलेले नव्हते. त्याआधी संगणक आयात करू पाहणाऱ्या टाटा समूहास त्याची परवानगीदेखील सरकारने नाकारली होती. का? तर संगणकास यंत्र मानण्यास आपले सरकार तयार नव्हते. संगणकाच्या आत काही सामग्री नसते आणि त्यातून बाहेरही काही पडत नाही, तेव्हा त्यास यंत्र कसे म्हणणार, असा सरकारचा प्रश्न होता. तरीही जे संगणक आयात करू इच्छित होते त्यांच्यावर मूळ किमतीच्या ३०० टक्के इतका प्रचंड कर आकारला जात असे. हा असला सरकारचा भिकार दृष्टिकोन आणि गुणवत्तेस रोखणारी तितकीच भिकार सामाजिक, राजकीय कारणे यांमुळे भारतीय तरुणांनी अमेरिकेचा रस्ता धरला. ते दुर्दैवी, तरीही योग्य होते. दुर्दैवी अशासाठी की त्यामुळे प्रचंड प्रमाणावर गुणवत्ता भारताबाहेर गेली. आणि तरीही ते योग्य अशासाठी की त्यामुळे तरी आपले- आणि जगाचेही- भले झाले. ही पिढी भारतात राहिली असती तर राखीव जागांपासून ते मागास आíथक धोरणांपर्यंत प्रत्येक सरकारी दगडावर डोके आपटून कपाळमोक्ष करून घेण्याचीच वेळ त्यांच्यावर आली असती. हे कितीही कटू असले तरी सत्य आहे. याचे कारण आपली सामाजिक आणि बौद्धिक मानसिकता. गुणवतांची कदर करणे आपणास समाज म्हणून जमत नाही. तो गुणवंत कोणत्या जातीचा आहे, त्याची पोटजात काय, वर्ण कसा, भाषा कोणती आदी मुद्दय़ांची खात्री पटल्याखेरीज भारतीय व्यवस्था त्याचे कौतुक करू शकत नाही. त्यात पुन्हा आपल्याकडे गुणवंतांस वाटून घ्यावे लागते. म्हणजे कौतुक होणारा गुणवंत एखाद्या विशिष्ट जातीचा, प्रदेशाचा असेल तर आपल्याला अन्य जाती, प्रदेशास समन्यायी पद्धतीने गुणवंतांची वाटणी करावी लागते. याच्या जोडीस राजकीय वास्तव पाहू गेल्यास त्या आघाडीवर तर अधिकच अंधार. कोणासाठी तरी अमुक इतक्या तरी राखीव जागा मिळवून दिल्या म्हणजे आपले काम संपले असे या राजकीय सूत्रधारांना वाटते आणि त्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न आपापल्या समाजातल्यांना राखीव जागा मिळवून देण्यापुरतेच असतात. परंतु इतिहास असे दर्शवतो की केवळ राखीव व्यवस्था निर्माण केली म्हणून भले होत नाही. त्या जोडीस समांतर पाठराखी व्यवस्था उभी करावी लागते. या अशा समांतर व्यवस्थेच्या अभावी नुसत्याच राखीवतेचा िडडिम वाजवला की काय होते ते कार्य सिद्धीस जाण्याआधीच श्वास लागलेल्या दलित चेम्बर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या उदाहरणावरून समजून घेता येईल. हे वास्तव समजून घेण्याइतका प्रामाणिकपणा आपल्याकडे नसल्यामुळे अंतत: त्याची परिणती एकाच गोष्टीत होते. सपकांनाच सुगीचे दिवस येतात. आपली व्यवस्था ही कमअस्सलांनाच डोक्यावर घेणारी असल्यामुळे अस्सलांना अन्य मार्ग शोधावे लागतात.
ते कोणते हे अमेरिका वा अन्य देशांत स्थलांतरित होऊन झळाळती कामगिरी करून दाखवणाऱ्या भारतीय तरुणांनी दाखवून दिले आहे. सुंदर भारतात असता तर एखादी छोटी-मोठी कंपनी काढली असती किंवा बडय़ा कंपनीत रुजू होऊन जमेल तितका वर गेला असता. परंतु त्याने तसे न करता गुगलसारख्या कंपनीत काम करणे स्वीकारले. ते किती योग्य होते हे पाहावयाचे असेल तर गुगलच्या संस्थापकद्वयीने- लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी- सुंदरविषयी काय उद्गार काढले ते मुळातूनच वाचावे. गुणवंतांची कदर करण्याचा आपल्याकडचा अमोल गुण त्यातून तर दिसतोच. परंतु त्याचबरोबर अमेरिका ही गुणवंतांना का आकर्षति करते हेदेखील समजून येते. गुगल जे करू शकली ते करण्याचे धर्य आणि मनाचा मोकळेपणा भारतीय कंपन्यांनी दाखवल्याची उदाहरणे फारच मोजकी आहेत. इन्फोसिससारख्या शुद्ध भारतीय कंपनीलादेखील गतवर्षीपर्यंत असे करून दाखवण्याची िहमत नव्हती. अडचणीत सापडल्यावर ती कंपनी पुन्हा प्रवर्तकांचेच- म्हणजे नारायण मूर्ती वा तत्सम- बोट धरू पाहत होती. तसे करूनही त्या कंपनीचे दुष्टचक्र काही संपले नाही. अखेर विशाल सिक्का या अमेरिकी नागरिकाच्या हाती इन्फोसिसवाल्यांना कंपनी द्यावी लागली. त्या पाश्र्वभूमीवर गुगलचे मोठेपण समजून येईल.
तरीही या सगळ्याच्या मुळाशी एक वेदना उरतेच. ती म्हणजे माहिती क्षेत्रातले एकही उत्पादन भारतीय नाही, याची. जगभरातल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील साधारण १५ टक्के इतक्या प्रचंड प्रमाणावर अभियंते भारतीय आहेत. तरीही भारतीयाच्या नावावर गुगल, ट्विटर, फेसबुक वा अन्य एकही उत्पादन नाही. परिणामी आहे त्या उत्पादनांची कंपनी चालवण्यातच भारतीय आनंद मानताना दिसतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र असो वा पेप्सी वा मास्टरकार्ड वा अन्य काही. कोणाची ना कोणाची सेवा करीत राहणे हेच भारतीयाचे प्राक्तन दिसते.
आज ना उद्या तेही बदलेल अशी आशा करावयास हवी. आज भारत जगास कंपनी चालवणारे पुरवीत आहे. उद्या कंपनी काढणारे पुरवील. २०१४ साली मायक्रोसॉफ्टची सूत्रे सत्या नाडेला या भारतीयाच्या हाती आली. आज गुगलची सुंदरकडे. परंतु आपल्या देशातील हे सत्य, सुंदर.. आपण आणखी किती काळ बाहेर पाठवत राहणार हाच एक प्रश्न आहे.