यंदा विजयादशमीच्या दिवशी सरसंघचालकांचे भाषण दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपित करून प्रसारभारतीने  जेव्हा  सीमोल्लंघन केले तेव्हाच  या स्वायत्त संस्थेत आगामी काळात बदल होणार याची चाहूल लागली होती. मृणाल पाण्डे यांची मुदत संपल्याने प्रसारभारतीचे अध्यक्षपद गेल्या मेपासून रिक्तच होते.  या पदासाठी  डॉ. ए. सूर्य प्रकाश ,ओ.पी. केजरीवाल, बलबीर पुरी,सपन दासगुप्ता अशी काही नावे चर्चेत असली तरी अपेक्षेनुसार सूर्य प्रकाश यांच्याच नावावर उप राष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने  मोहोर उमटवली.
 इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांचा प्रदीर्घ अनुभव सूर्य प्रकाश यांच्याकडे आहे. झी न्यूजचे संपादक,, पायोनियरचे कार्यकारी संपादक , बॅंकॉक आणि सिंगापूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या एशिया टाइम्सच्या भारतीय आवृत्तीचे संपादक, ईनाडू वृत्तसमूहाचे राजकीय संपादक तसेच द इंडियन एक्स्प्रेसच्या दिल्ली आवृत्तीत ब्यूरो चीफ अशी विधिध पदे त्यांनी भूषविली आहेत. गेल्या तीन दशकांतील अनेक राजकीय घडामोडी त्यांनी जवळून पाहिल्या असून त्यातील अनेक घटनांवरील त्यांचे भाष्य बुद्धिजीवींमध्ये आवर्जून वाचले जाते. अनेक वृत्तपत्रांत त्यांचे स्तंभ सुरू आहेत. १९९८ मध्ये सूर्य प्रकाश यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाचा मुद्दा प्रथम पायोनियरमधून  समोर आणला. या विषयावर त्यांनी  सातत्याने लिखाण केल्याने सोनिया गांधी यांची देशाच्या सर्वोच्चपदी निवड व्हावी की नाही यावर देशपातळीवर विचारमंथन सुरू झालेच, पण नंतरच्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हा प्रचाराचा मुख्य मुद्दा विरोधकांनी बनवला. नंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे.  मग या विषयाचा चहू अंगाने वेध घेणारा  ‘सोनिया अंडर स्क्रुटिनी- इश्यू ऑफ फॉरिन  ओरिजीन’ हा ग्रंथ त्यांनी संपादित केला.
उजव्या विचारसरणीचे असलेल्या सूर्य प्रकाश यांनी भाजप तसेच रा.स्व. संघाच्या बडय़ा नेत्यांबरोबर काम केले असून आपल्या संकेतस्थळावरही तसा उल्लेख त्यांनी केला आहे. नवी दिल्लीतील उच्चभं्रूच्या वर्तुळात विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचा वेगळा दबदबा आहे.  विभिन्न क्षेत्रांतील दिग्गज या फाउंडेशनशी संबंधित असल्याने देशातील ‘थिंक टॅँक’अशी त्याची ओळख बनली आहे.  काही  महिन्यांपूर्वी  या फाउंडेशनचे माजी संचालक अजित दोव्हल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती झाली. आता याच विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनशी संबंधित सूर्य प्रकाश यांच्याकडे प्रसारभारतीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  प्रसारभारती  ही संस्था स्वायत्त  आहे. त्या वरील अन्य सदस्य नेमल्यानंतर खऱ्या अर्थाने सूर्य प्रकाश यांची कारकीर्द सुरू होईल. दूरदर्शन आणि आकाशवाणीला ते नवा ‘प्रकाश’ दाखवतील का हे लवकरच कळेल.