जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाचं जीवन कर्ममयच आहे, किंबहुना पूर्वकर्मानुसारच माणसाला जन्म मिळाला आहे. समर्थही सांगतात, ‘जिवां कर्मयोगें जनीं जन्म झाला।’ जसं कर्म केलं होतं त्यानुसार, त्या कर्माच्या योगानुसार जन्म मिळाला. जन्म तर मिळाला, पण त्याला अंतही आहेच. ‘परीं शेवटीं काळमूखीं निमाला।’ कर्मानुसार जन्म लाभला, पण शेवट काळाच्याच तोंडात आहे. याला अपवाद कोणाचाच नाही. ‘महा थोर ते मृत्यूपंथेंचि गेले। कितीयेक ते जन्मले आणि मेले।।’ सामान्य माणूस जसा त्याच्याच पूर्वकर्मानुसार जीवन प्राप्त करतो आणि मरतो, तसंच जग ज्यांना थोर मानतं, श्रेष्ठ मानतं अशा लौकिकार्थानं दिग्गज असलेल्यांनाही त्यांच्या पूर्वकर्मानुसारच जन्म लाभलेला असतो आणि त्यांची अखेरही मृत्यूतच होते. जन्मापासून मरेपर्यंत कर्म दोघांनाही सुटत नाही. गीतेत भगवंत सांगतात, ‘‘न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्।’’ (अध्याय ३, श्लोक ५चा पूर्वार्ध). म्हणजे कोणीही क्षणभरदेखील कोणतेही कर्म न करता कदापि राहू शकत नाही! श्वासोच्छ्वासापासून ते काहीच न करता बसून राहण्यापर्यंत सर्वच गोष्टी कर्मात मोडतात! तेव्हा कर्म तर सुटत नाही आणि कोणत्याही कर्माचं फळ भोगल्यावाचूनही सुटका नसते, तर मग र्कम करावीत तरी कोणती? त्यावर ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ज्या ओवीचा आपण विचार करीत आहोत, ती ओवी सांगते की, आम्ही समस्त ही विचारिलें। तंव ऐसें चि हें मना आलें। जे न सांडिजे तुवां आपुलें। विहित कर्म।।११।। (अध्याय २, ओवी २६५) याच ओवीच्या आशयाशी अगदी चपखल अशी ओवी याच नित्यपाठात आहे ती म्हणजे, ‘‘म्हणौनि जें जें उचित। आणि अवसरेंकरूनि प्राप्त। तें कर्म हेतुरहित। आचरें तूं।।’’ त्या ओवीकडेही आपली वाटचाल सुरूच आहे आणि आताचे चिंतन त्या ओवीलाही लागू आहे. असो. थोडक्यात कर्म अटळ आहे, कर्माशिवाय आयुष्यातला एक क्षणही सरत नाही. मग कर्म कोणतं करावं? तर ‘विहित’ कर्म म्हणजे वाटय़ाला आलेलं कर्म, ‘अवसरेकरूनि’ म्हणजे प्रसंगानुसार वाटय़ाला आलेलं कर्म आहे ते करावं. आपण निव्वळ वाटय़ाला आलेलं कर्म करतो का हो? नाही! समर्थ सांगतात, ‘‘जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले। परी जीव अज्ञान तैसेचि ठेले। देहेबुधिचें कर्म खोटें टळेना। जुनें ठेवणें मीपणें आकळेना।।’’ (मनाचे श्लोक, क्र. १३७). श्रेष्ठ असं आत्मज्ञान माणसाला आजवर अनेकानेक महापुरुषांनी सांगितलं तरी जीवाचं अज्ञानातलं रमणं थांबलंच नाही. त्या अज्ञानावरच देहबुद्धी पोसली गेली आणि त्या तिच्याच ओढीतून खोटय़ा कर्मात माणूस अडकला. ही खोटी र्कम का? कारण ती भ्रामक देहबुद्धीच्या ओढीतून व मोहातून केली जात असतात. त्यात खोट असते. त्या खोटय़ा कर्मामुळं परमात्मलयतेची जी मूळ ठेवण होती तीच अहंलयतेमुळे माणसाला शब्दांनीदेखील उमगेनाशी होते! तेव्हा देहबुद्धीनुसार नव्हे तर जे विहित आहे, वाटय़ाला आलेलं आहे, माझ्यासमोर उभं ठाकलं आहे, ते कर्मच मी फळाची इच्छा न राखता अर्थात निष्काम भावनेनं केलं तरच सुटका आहे.