मग अपेक्षित जें आपुलें। तेही सांगती पुसिलें। जेणें अंत:करण बोधलें। संकल्पा न ये ।। या ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ५०व्या ओवीच्या विशेषार्थाचं विवरण आपण पाहाणार आहोत. आता ‘नित्यपाठा’तील ‘‘तें ज्ञान पैं गा बरवें..’’ या ४७व्या ओवीपासून ते या ५० ओवीपर्यंत, अशा चारही ओव्या म्हणजे गीतेच्या चौथ्या अध्यायातील ३४व्या श्लोकाचा विस्तार आहेत. हा मूळ श्लोक असा – ‘‘तद् विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन:’’ हा श्लोक काय सांगतो? तर सद्गुरूंकडून ज्ञान कसं मिळवावं, हे सांगतो. ज्यांना सद्वस्तूचं ज्ञान झालं आहे, जे खरे यथार्थ सद्गुरू आहेत त्यांना प्रणिपात करून, त्यांची सेवा करून, त्यांना अत्यंत विनयानं प्रश्न विचारला की हे अर्जुना ते तुला यथार्थ ज्ञान देतील, असं भगवंतांनी या श्लोकाद्वारे सांगितलं आहे. साईबाबांचे एक अत्यंत घनिष्ट भक्त होते श्री. नानासाहेब चांदोरकर! एकदा बाबा मशिदीत पहुडले होते. नानासाहेब त्यांचे पाय चेपत असताना गीतेचा चौथा अध्याय स्वत:शी पुटपुटल्यागत म्हणत होते. ३३ श्लोक म्हणून झाले तोवर बाबा काही बोलले नाहीत. ३४वा श्लोक जसा सुरू होणार तोच बाबा म्हणाले, ‘‘नाना, काय गुणगुणतोस रं? जरा मोठय़ानं म्हण की.’’ नाना मोठय़ा स्वरात तो श्लोक म्हणू लागले. ‘‘तद् विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन:’’ नानांचे उच्चार अगदी स्वच्छ, शुद्ध. मनात भाव मात्र आलाच की, बाबांना संस्कृतचा गंध तो काय असणार? जो अनंतकोटीब्रह्माण्डनायक आहे असं मी म्हणतो त्याच्या आणि माझ्यात या भौतिक जगातलं शाब्दिक ज्ञानही कसा अडसर निर्माण करतं पाहा. तोच पूर्णस्वरूप मला मुसलमान फकिर वाटू लागतो! त्याला गीता कळेल का, अशी शंका ते ज्ञानच निर्माण करतं. असलं वेदोक्त ज्ञान म्हणजे अज्ञानच नाही का? स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांना अनेक उलटसुलट प्रश्न विचारत असत. ठाकूरांच्या अवतारसमाप्तीनंतर एका तपानंतर शारदामाता जेव्हा सक्रीय झाल्या, त्यावेळी त्यांच्यासमोर मात्र ते अगदी नम्र भावानं मौनात राहात. माताजी एकदा त्यांना हसून म्हणाल्या, ‘‘तुझ्या ज्ञानानं तू मलाही एकवेळ उडवून देशील.’’ स्वामीजी पटकन् म्हणाले, ‘‘जे ज्ञान तुम्हाला नाकारेल, ते ज्ञान काय कामाचं?’’ तेव्हा नानासाहेबांना हा श्लोक म्हणायला सांगून बाबांनी याच ज्ञान आणि अज्ञानाच्या मुद्दय़ाला विलक्षण स्पर्श केला. नानासाहेबांनी तो श्लोक म्हटला. नाना मोठे बहुश्रुत होते आणि गीताभाष्यात पारंगतही होते. संस्कृतवर प्रभुत्वही होतं. त्यामुळे शांकरभाष्यापासून अनेक तत्त्वज्ञांचा अर्थ त्यांनी बाबांना सांगितला. बाबांनी श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांच्या अर्थावर मान डोलावली मात्र तिसरा चरण म्हणजे, ‘उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं’ त्याचा अर्थ सुरू होताच बाबांनी चांदोरकरांना थांबविलं. बाबा म्हणाले, ‘‘नाना, तृतीय चरण। पुनश्च लक्षांत घेई पूर्ण। ‘ज्ञान’ शब्दामागील जाण। अवग्रह आण अर्थास!’’ ज्ञान शब्दामागे अवग्रह आहे, तो जाणून या श्लोकाचा अर्थ लक्षात घे! काय आहे हा अवग्रह?