स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘चित्त हे नेहमीच आपल्या शुद्ध स्वरूपापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत असते, पण इंद्रिये त्याला बाहेर खेचीत असतात.’’ आता याचा थोडा विचार करू. आपलं शुद्ध स्वरूप कोणतं आहे? सनातन तत्त्वज्ञान सांगतं की, आनंद हेच आपलं खरं शुद्ध स्वरूप आहे. आपणही विचार करून पाहा, आपली सगळी धडपड एका आनंदासाठीच सुरू असते ना? मासोळी पाण्याबाहेर तडफडते आणि पाण्यात निवांत होते, कारण ती पाण्याशिवाय जगूच शकत नाही. त्याप्रमाणे आनंदाविना आपली तडफड होते, कारण आनंद हेच आपलं स्वरूप आहे, आनंदाशिवाय आपण जगूच शकत नाही. चित्त सदोदित त्या आनंदाकडेच जाऊ इच्छिते पण पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं ज्या अकराव्या इंद्रियाच्या ताब्यात असतात ते मनच हा आनंद बाहेरच्याच जगात, भौतिकातच मिळेल, या भावनेनं सतत बाह्य़ाकडेच चित्ताला खेचत असते. तेव्हा या चित्ताचा, मनाचा, बुद्धीचा संयम करून तिला मूळ स्वरूपाकडे वळवण्यासाठी सद्गुरूचाच आधार लागतो. आता सुरुवातीला हा आधार भौतिकाच्याच ओढीनं घेतला जातो. स्वामी स्वरूपानंद यांच्या संपर्कात जे जे आले त्यांना प्रथम या भौतिक आधाराचंच अप्रूप होतं, त्या भौतिकाच्या सुरळीतपणातच अनेकजण स्वामींची कृपा शोधत होते आणि मानत होते. यानंतरही जे स्वामींच्या अधिक जवळ गेले, म्हणजेच स्वामींचा विचार, स्वामींचा जीवनहेतू, स्वामींची कळकळ ही ज्यांना जाणवली त्यांनाच स्वामींच्या बोधाचा खरा हेतू उकलला आणि त्यांना भौतिकापलीकडचाही शाश्वत लाभ झाला. हा शाश्वत लाभ म्हणजे एकरसता! ती साधण्याचे टप्पे आपण पाहिलेच. ते म्हणजे क्षिप्त (विखुरलेलं), मूढ (अज्ञानानं व्याप्त), विक्षिप्त (गोळा झालेलं) आणि एकाग्र! आज आपली आंतरिक स्थिती विखुरलेली आहे. त्यात भर म्हणजे ती अज्ञानानं व्याप्तही आहे! अनेक ठिकाणी विखुरलेलं मन एका जागी गोळा होण्यासाठी सद्गुरू बोधाचाच आधार हवा. कारण याच आधारातून अज्ञानही ओसरेल. तेव्हा अज्ञानाच्या पकडीतून मन जितकं सुटत जाईल तितका भ्रम, मोह, आसक्ती कमी होत जाईल. मग मनाचं विखुरणं कमी होईल. मग ते मन हळुहळू बोधात केंद्रित होईल. जेव्हा त्या बोधानं ते पूर्ण जागृत होईल, सजग होईल आणि अन्य गोष्टींच्या भ्रामक प्रभावातून मुक्त होईल तेव्हाच ते त्या बोधात एकाग्र होईल, तन्मय होईल. तेव्हाच एकरसता, ऐक्यता अनुभवता येईल. मागे सुशीलाबाई देसाई यांची मृणालिनीताई जोशी यांनी सांगितलेली आठवण आपण पाहिलीच होतीत. त्यांचीच आंतरिक स्थिती पाहा ना! ‘अनंत आठवणीतले अनंत निवास’ पुस्तकात सुशीलाबाई देसाई म्हणतात, ‘‘स्वामींच्या चाळीस वर्षांच्या सहवासात मी कधी दु:खाने त्रासले नाही किंवा चांगल्या गोष्टीने हुरळून गेले नाही. ही पुष्कळशी मानसिक स्थिती  स्वामींमुळे झाली असे मला वाटते’’ (पृ. २६). अहो दु:खात एकवेळ मन स्थिर राहील, पण सुखाच्या प्रसंगातही ते जेव्हा स्थिर राहाते तेव्हा ती स्थितप्रज्ञाचीच स्थिती असते, नाही का?