इलेक्ट्रॉनिक वाद्यांवर वाजवले जाणारे संगीत, ही आज अजिबात नवलाई राहिलेली नाही; परंतु इलेक्ट्रॉनिक गिटार वगळता, सिंथसायझरसारख्या वाद्यांचा उपयोग भारतात अद्यापही दुसऱ्या कुठल्या तरी वाद्याचा आवाज काढण्यासाठी सोयीचे वाद्य, एवढय़ापुरताच राहिला आहे. तालवाद्य, तंतुवाद्य, सुषिरवाद्य यांची आपापली खासियत असते, त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वाद्यांचीही खास त्यांचीच अशी वैशिष्टय़े नसतात का? असतातच, हे पहिल्यांदा ओळखणाऱ्यांपैकी एक संगीतकार म्हणजे एडगर फ्रॉसे. या फ्रॉसे यांचे निधन व्हिएन्नात २० जानेवारीस झाल्याची बातमी काहीशा उशिरानेच, २३ रोजी प्रथम फेसबुकवर आणि मग प्रसारमाध्यमांत आली आणि पाश्चात्त्य संगीतप्रेमी हळहळले.
एडगरचे संगीत इलेक्ट्रॉनिक होते, त्यातील ध्वनी नवे होते आणि त्या सुरावटींमध्ये व्हायोलिन, चेलो किंवा पियानो यांपैकी कोणत्याही एका वाद्याची ‘नक्कल’ नव्हती. मात्र या पारंपरिक वाद्यांनी जशी अभिजात पाश्चात्त्य संगीतात भर घातली, तशी भर आपण इलेक्ट्रॉनिक वाद्यांनिशी घालू शकतो का, हा एडगर यांचा ध्यास होता. त्यांचे संगीत पाश्चात्त्य अर्थाने ‘पॉप’ नव्हते. विशीत, एडगर रॉक संगीत-समूहात होता. त्या समूहाची फाटाफूट झाल्यावर त्याला खरा सूर सापडला. इलेक्ट्रॉनिक सूर! सन १९६७ मध्ये इलेक्ट्रॉनिक सिंथसायझरवर, त्या वाद्याची बलस्थाने ओळखत एडगरचा प्रवास सुरू झाला. त्याने ‘सिंफनी’ रचल्या नाहीत, पण त्याच्या संगीताचा सांधा जुळला तो तारकोवस्की, स्ट्राव्हिन्स्की अशा रशियन संगीतकारांशी.
रशियाच्या ताब्यात असलेल्या ज्या प्रदेशात नाझींनी संहार घडवला होता, त्या कालिनिन्ग्राड- तिल्सित येथे अगदी ‘डी-डे’च्या – म्हणजे दुसरे महायुद्ध नर्ॉमडीत दोस्त राष्ट्रांच्या फौजा उतरल्या, त्याच- ६ जून १९४४ या दिवशी एडगर जन्मला. वडील त्याच्या जन्माआधीच मारले गेले होते. पश्चिम जर्मनीत तो वाढला, संगीत शिकला. तोवर ‘इलेक्ट्रॉनिक संगीताचा जन्मदाता’ अशी फ्रान्सचा एडगर व्हारेस (१८८३-१९६५) याची ख्याती पसरू लागली होती. हा फ्रेंच एडगर नवी वीजकीय वाद्ये तयार करून घेई. तेवढे जर्मनीत वाढलेल्या एडगर फ्रॉसेने केले नाही, परंतु वीजकीय संगीत त्याने पुढे नेले आणि या संगीताच्या शक्यता निराळय़ाच असू शकतात, हेही दाखवले. वास्तवातीत चित्रे काढणारा साल्वादोर दाली हा चित्रकार एडगर फ्रॉसेचा मित्र होता आणि काही प्रमाणात प्रेरणास्थानही. ‘दालीची चित्रे जर ‘ऐकायची’ असतील, तर एडगर फ्रॉसेचे संगीत ऐकाच’ असे जाणकार सांगतात. अर्थात, दालीखेरीज अन्य अनेक बडय़ा व्यक्तींशी एडगरची मैत्री पुढल्या काळात झाली, त्यांत ‘व्हर्जिन रेकॉर्ड्स’चे रिचर्ड ब्रॅन्सन यांचाही समावेश होता.