व्हिएतनामचा सेनापती जनरल नग्युन जिएप यांचे  वयाच्या १०२ व्या वर्षी ४ ऑक्टोबरला  निधन झाले. अमेरिकन वर्तमानपत्रांनी या बातमीला चांगलीच प्रसिद्धी दिली. अमेरिकेच्या सैन्याला व्हिएतनाममधून घालवण्याचे श्रेय जगाने जिएपला दिले आहे. त्याआधी फ्रेंचांविरुद्धही त्याने हीच कामगिरी बजावली होती. सेनापती कारकिर्दीत अनेक लढाया लढतो. अनेक विजयही मिळवतो. पण एखादाच विजय असा असतो, ज्यात त्याचे सर्व गुण दिसतात व आगळेपण झळाळून उठते आणि त्या विजयाने राजकीय कलाटणीही मिळते. इतिहासातल्या अशा काही गाजलेल्या लढाया आणि त्यातल्या सेनापतींची नावे एकमेकांशी पक्क्या निगडित आहेत. पालखेडच्या संग्रामासाठी पहिला बाजीराव ओळखला जातो. ऑस्ट्रेलिझची लढाई ही नेपोलियनची म्हणून प्रसिद्ध आहे. वाटर्लू म्हटले की वेलस्लीचे नाव घेतले जाते. दुसऱ्या महायुद्धातल्या स्टॅलिनग्राडच्या लढाईसोबत मार्शल झुकाव्ह व आफ्रिकेतल्या लढायांसाठी रोमेलचे नाव कायमचे जोडले जाते. याचप्रमाणे दिएन बिएन फूच्या विजयाचा शिल्पकार म्हणून जिएपचे नाव आहे. व्हिएतनामच्या स्वातंत्र्यलढय़ावर अमेरिकन सैनिकी अधिकाऱ्यांची अनेक अभ्यासपूर्ण पुस्तके प्रसिद्ध आहेत. व्हिएतनाममधल्या लष्करी कारवायांसंबंधी बर्नाड फॉल या फ्रेंच युद्धपत्रकाराची ‘स्ट्रीट विदाऊट जॉय’ व ‘हेल इन व्हेरी स्मॉल प्लेस’ ही दोन पुस्तकेही लष्करी अभ्यासकांनी नावाजलेली आहेत. गेली ५० वर्षे ती सतत बाजारात आहेत. ‘पीपल्स वॉर, पीपल्स आर्मी’ ही खुद्द जिएपने स्वत:च्या सैनिकांसाठी लिहिलेली पुस्तिकाही त्याच्या लढण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकते.
ज्या सैन्याकडे साधनसामग्रीची वानवा असते, जे स्वदेशाच्या मुक्ततेसाठी स्वत:च्या प्रदेशात, जो जंगले व डोंगरांनी व्यापलेला आहे त्यात लढत असते, ते साहजिकच गनिमी काव्याकडे वळते. औरंगजेबाच्या वेळचे मराठे, अमेरिकेतले रेड इंडियन, चीनमधील माओचे सैन्य, क्युबामधील कॅस्ट्रोची दले आणि व्हिएतनाममधील जिएपचे सैन्य ही आधुनिक इतिहासातील याची ठळक उदाहरणे आहेत. अशा सैन्यांचे मनोधैर्य अत्यंत उच्च असते. जीएपने या प्रकारच्या युद्धाचे शास्त्र बनवले. केवळ संख्याधिक्य व शस्त्रांची अत्याधुनिकता म्हणजे विजयाची हमी नसते असे अनेक सेनापतींप्रमाणे जिएपनेही म्हटले आहे. दिएन बिएन फू या ठिकाणी जनरल जिएपने फ्रेंच सैन्याचा जो पराभव केला त्यात त्याचे प्रत्यंतर येते.  लढवलेल्या डावपेचांची चर्चा जिएपने आपल्या ‘पीपल्स वॉर, पीपल्स आर्मी’ या पुस्तकात केली आहे.
दिएन बिएन फूची लढाई ही निर्णायक होती. इतिहासातल्या निर्णायक लढायांतल्या सैनिकांची संख्या व दिएन बिएन फूच्या लढाईतल्या सैनिकांची संख्या यातही खूप अंतर आहे. स्टॅलिनग्राडला वेढा घातलेल्या जर्मन सैनिकांची संख्या ही ३,५०,००० होती. नंतर त्यांना वेढा घातलेले रशियन सैनिक संख्येने १०,००,००० होते. याउलट दिएन बिएन फूच्या लढाईत जिएपच्या हाताखाली केवळ ५५,००० सैनिक होते. त्यांनी ज्यांना वेढा घातला होता अशा फ्रेंच सैनिकांची संख्या १३,००० होती. हे प्रमाण १:४ असे पडते. असे असले तरी या लढाईला व्हिएतनामच्या स्वातंत्र्यलढय़ात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, असे बर्नाड फॉल या युद्धपत्रकाराने लिहिले आहे. विजयाचे राजकीय परिणाम दूरवर झाले. फ्रान्समधले सरकार कोसळले व अर्धा व्हिएतनाम लगेच मुक्त झाला. युद्ध हे राजकारणाचे दुसरे अंग असते हे जर्मन अधिकारी क्लाऊजविचचे वचन जिएपने कायम ध्यानात ठेवले.
दिएन बिएन फू हा भाग व्हिएतनामच्या पश्चिमोत्तर दिशेला येतो. टेकडय़ा व घनदाट जंगले यांनी हा भाग व्यापलेला आहे. गनिमी पद्धतीने लढणाऱ्या व्हिएतनामी सैन्याचे पुरवठामार्ग बंद करावेत व त्यांना निर्णायक लढाई देण्यास भाग पाडावे आणि त्यात त्यांचा पराभव करावा या हेतूने टेकडय़ांमधल्या सपाट प्रदेशात फ्रेंचांनी सैनिकी तळ उभारला. पुरवठय़ासाठी विमानांवर अवलंबून राहण्यात आले. त्यांना उतरता यावे म्हणून लोखंडाची धावपट्टी अंथरण्यात आली. रणगाडे, विविध पल्ल्यांच्या तोफा, हॉस्पिटल यांनी हा तळ सुसज्ज करण्यात आला. एवढेच नव्हे तर सैनिकांच्या सेवेसाठी स्त्रियाही आणण्यात आल्या. असा तळ अभेद्य असल्याच्या समजुतीत फ्रेंच सेनापती होते.
फ्रेंचांना अपेक्षित असलेली लढाई जनरल जिएपने त्यांना दिली, पण त्याचा निर्णय जिएपने त्याच्या पद्धतीने लावला. त्याने लिहिले आहे, ‘दिएन बिएन फू वर हल्ला करावा वा करू नये असे दोन पर्याय आमच्या पुढे होते. कारण तळ अभेद्य असल्याची शत्रूची समजूत अगदीच चुकीची होती. आम्ही हल्ला करावा व तो निर्णायक करावा या मताला आलो.’ त्यासाठी टेकडय़ांच्या जंगलांमधून शेकडो मैल लांबीचे खंदक खणण्यात आले. जंगलातली झाडे पार करून रस्ते बनवण्यात आले. तोफा आणण्यात आल्या. जेथे हे शक्य नव्हते तेथे तोफांचे सुटे भाग आणून जागेवर ते जोडण्यात आले. जंगलातून रस्ते काढून पुरवठामार्ग बनवण्यात आले. त्यासाठी १५,००० वेगळे सैनिक तैनात करण्यात आले. शत्रूचा पुरवठा विमानावर अवलंबून आहे हे ओळखून विमानविरोधी तोफा टेकडय़ांवर चढवण्यात आल्या. असा वेढय़ाचा फास पक्का बसताच १३ मार्च १९५४ रोजी जिएपने दोरी खेचली. जीवितहानीची पर्वा त्याने केली नाही. ‘विजयासाठी सर्व काही’ ही जिएपची घोषणा प्रेरणा देणारी ठरली. ही लढाई ५४ दिवस चालली. जिएपने फ्रेंचांना लक्षात राहील असा धडा दिला.
दुबळ्या जनतेने समर्थावर मिळवलेला तो पहिला सर्वात मोठा निर्णायक असा सैनिकी व राजकीय विजय होता. दिएन बिएन फूच्या लढाईत आधी गनिमी काव्याचा अवलंब करून व्हिएतनामी सैन्याच्या फ्रेंचांबरोबरच्या लढाया चालूच होत्या. पण जिएपने गनिमी काव्याच्या मर्यादा ओळखल्या. या प्रकारचे युद्ध हे निर्णायक नसते.  पुढे अमेरिकन सैन्याबरोबर लढताना त्याने अशा प्रकारचे निर्णायक युद्ध अंगावर घेतले नाही. व्हिएतनाममध्ये राजकीय ढवळाढवळ करण्याची अमेरिकेची राजकीय इच्छाशक्ती कशी संपुष्टात येईल हे त्याने पाहिले. अलीकडच्या एका मुलाखतीत तो म्हणतो, ‘महासत्ता असली तरी तिच्या शक्तीला मर्यादा असतात. स्थानिक लोकांच्या इच्छेविरुद्ध कोणतीही सत्ता राबवता येत नाही.. गनिमी कावा हे केवळ लोकयुद्धाचे छोटे असे सैनिकी अंग आहे. लोकयुद्ध ही अधिक व्यापक संकल्पना आहे. हे युद्ध सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा अनेक आघाडय़ांवर लढले जाते. ते लोकांनी चालवलेले युद्ध असते. गनिमी काव्याचे युद्ध हे लोकयुद्धात परिवर्तित करता यायला हवे.’ हा विचार केवळ सेनापतीचा नाही, तो एका लोकनेत्याचाही आहे हे लक्षात येते.
जपान, फ्रेंच, अमेरिका आणि चीन यांच्या सैन्याला जिएपने यशस्वी तोंड दिले. स्वत:च्या सैनिकांच्या प्राणांची पर्वा त्याला नसे, असा आरोप अमेरिकन अधिकारी विल्यम वेस्टमोरलॅण्ड यांनी केला आहे. जिएप गरीब व साधनसामग्रीची वानवा असलेल्या सैन्याचा सेनापती होता. लोकांची इच्छाशक्ती हे एकमेव हत्यार त्याच्याकडे होते. ते त्याने यशस्वीरीत्या वापरले. विसाव्या शतकातल्या महान सेनापतींमध्ये जिएपचा समावेश करणे अजिबात वावगे ठरू नये.